Sept 27,2020
फोन आला कॅफेत: हॅलो, हा कोविड च्या पेशंट ना डबे देणाऱ्या देशपांडेंचा नंबर आहे ना?
मी शांतपणे- हो, बोला..
मग बाकी सगळं.
आता यात विशेष काय हो? तर सांगते ना..
दुसऱ्या लॉक डाऊन नंतर जेव्हा असा फोन यायचा तेव्हा मलाच खूप म्हणजे खूप राग यायचा. ही कसली ओळख? कॅफे आहे ना आपला? पण संत धनंजय (नवरा)खुश . मला कळायचंच नाही यात काय खुश होतो हा.. पण तो म्हणायचा, असूदे ग, जिथे कमी तिथे आम्ही. मलाच खूप दिवस झेपत नव्हती ही ओळख. पण आता अभिमान वाटतोय. त्याची सुरुवात झाली अशी-
मी नेहमीसारखी रविवारच्या मेनूची जाहिरात फेसबुक वर टाकली होती आणि ती आमच्या कॅफेच्या 2 किमी अंतरावरच्या एका काकूंनी वाचली. त्यांनी इतका घाबरत फोन केला आणि दुसऱ्या घाबरट ने- म्हणजे अर्थात मीच, तो घेतला. त्या काकू इतक्या टेन्शनमध्ये होत्या की बास. घरी ते तिघे. त्यात त्यांचे मिस्टर आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाले. या काकूना आपल्याला माहीत असलेले सगळे रोग. घरी काम करणाऱ्या बायका बंद झाल्या यायच्या. सोसायटीतले कुणी काहीच मदतीला येईनात घाबरून. डबे मागवायचे तर त्याही लोकांनी सपशेल नकार दिलेला. आता पुढे काय? हे न कळण्याची जी आपली तेव्हा अवस्था होती त्यात त्या अडकलेल्या. घरातच होते सगळे,त्यामुळे त्यांनी आमची जाहिरात वाचून फोन केला आणि धडाधड हे सगळं मला सांगून टाकलं. द्याल का हो आम्हाला डबा आणून? हे इतकं काकुळतीला येऊन विचारलं त्यांनी की मी एकदम गप्प झाले. एखादाच सेकंद. आणि मग म्हटलं, मी 2 मिनिटात फोन केला तर चालेल का? हो म्हणाल्या, पण त्या फोनमध्ये नाही नका म्हणू हो असं इतकं अजिजीने म्हणाल्या की बास. मी नवऱ्याला नुसतं सांगितलं आणि हा ताबडतोब- सांगून टाक देऊ आम्ही.
मी म्हणाले अरे कुणीच देत नाहीये त्यांना डबा, रिस्की असेल का खूप? आपण तरी कसं देणार? त्या म्हणत होत्या की सोसायटी छोटी म्हणून वॉचमन पण नाहीये.
नवरा- काही होत नाही. आपण करूया. कुणावरही अशी वेळ येऊ नये. पण आली तर काय वाळीत टाकायचं आहे का त्यांना? सगळी काळजी घेऊ. त्यांना सांगू, तुम्ही एक खुर्ची ठेवा फ्लॅट बाहेर. बेल वाजवून ठेवून येत जाईन. ऑनलाइन पैसे येतील. काय फरक पडतो? सॅनिटायझर, ग्लोव्हज, मास्क सगळं तर आहे. इतकं काय घाबरायचं त्यात?
मी म्हणाले- हॉटस्पॉट आहे त्यांचा एरिया. म्हणून कुणी जात नाही आणि तू चालला आहेस. हा म्हणाला- म्हणूनच मी जातोय. त्यांना द्यायला हवाय डबा. उद्या काय आजपासूनच देऊया.
मला पटलं नाही लगेच तरी हे काम सुरू केलंच आम्ही. हळूहळू या अशा पेशंट लोकांना डबे देण्याचं काम वाढतच गेलं. मग त्यात परदेशी प्रवास करून आलेल्या लोकांची भर पडली. मग आपोआप अशी एक ओळखच तयार व्हायला लागली. मग मी पण मनातून स्वीकारलं बहुतेक.
एका बाईंना प्रचंड ताप वगैरे सुरू झाला, सगळी लक्षणं घाबरवणारी. त्यांना डॉक्टरांनी घरीच वेगळं रहायला सांगितलं.झाला डबा चालू, तर बोलणंही व्हायचं. आज काय हवं, नको इ. काल त्यांचा फोन आला, अत्यानंदाने म्हणाल्या अहो, माझी टेस्ट निगेटिव्ह आली बरं. मला तुम्हाला सांगून इतकं बरं वाटलं की बास.
हे ऐकूनच खूप मस्त वाटलं. आम्ही आमचं कामच करत होतो/ आहोत, विशेष काही नाही त्यात. तरीही त्यांना मला हे सांगावंसं वाटलं हे फार म्हणजे फारच भारी वाटलं. मग आता आजचा डबा देताना एक कॅडबरी घेऊन जाणारे त्यांच्यासाठी..
चलो कुछ मीठा हो जाये..