रविवार, १९ एप्रिल, २०२०

 

#पिंपळपान:जुन्याच पण छान आठवणी

अशीच एक मे महिन्याची सुट्टी चाललेली आणि आमचा गोंधळ. दुपारच्या उन्हात मात्र बाहेर खेळायला परवानगीच नव्हती. मग कुणाच्याही घरी खेळत बसायचं.

त्यात एका दिवशी आईला माझया मावशी ने बोलावलं होतं. त्या दोघी कुठंतरी जाणार होत्या. म्हणजे 4 तासांची निश्चिती. मी 4 थीत होते म्हणजे तेवढी एकटी रहायचे. आजी आजोबा काकांकडे गेले होते, बाबा कामावर, म्हणजे मी आणि भाऊ घरात. आम्ही घर सोडून जायचं नाही म्हणजे सगळा मित्रमंडळींचा गोतावळा आमच्या घरी हे ठरलंच.

बराच धुडगूस घालून झाला. नवीन काय खेळायचं यावर मारामारी होऊन सुद्धा ठरेना.

मग आमचा तारणहार- म्हणजे मन्या बारीक डोळे करून म्हणाला- एक आयडिया आहे

आम्ही- सगळं विसरून- बोल बोल

मन्या- आपण प्लॅंचेट करू. नाहीतरी यांच्या घरात कोणीच नाही.

आम्ही- पण करायचं काय?

मग मन्याने आम्हाला प्लॅंचेट चा थरार सांगितला. सगळेच पाचवीपर्यंतचे. मी मन्याला विचारलं- पण येतं का तुला ते?

मन्या- नाही. आत्ताच करायचे आपण ते. आपोआप येईल. काही अवघड नाहीये. ते भूतच सांगेल सगळं आपल्याला.

भूत???? -आम्ही.

मन्या- आत्मा म्हणजे भूतच असतं. घाबरायचं काय? मेलेले असतात ते.

आमच्यातला एक- अरे भूत काहीपण करू शकतं

मन्या- जे घाबरत असतील त्यांनी घरी जा.

माझा भाऊ- ताई, मी आईला सांगणार , आपल्या घरी मन्या भूत घेऊन आला- इयत्ता पहिली

मन्या- बाईना सांगितलंस तर भोवरा खेळायला घेणार नाही तुला.(बाई म्हणजे माझी आई. ती क्लासेस घ्यायची)

भाऊ- नाही सांगणार आईला. मला घेणार ना भोवरा खेळायला?

मन्या- हो

झाली आमची तयारी. एका पाटावर A ते Z पर्यंत, दोन गोलात yes आणि no, 1 ते 0 आकडे, मध्ये एका गोलात उलटी वाटी. मन्याला सगळं माहीतच असायचं.

मग प्रार्थना करून आत्म्याला बोलवायचं ठरलं. शेजारच्या एक नुकत्याच गेलेल्या आजोबांना बोलवू असं एक मैत्रीण म्हणाली- ते आपल्याला ओळखत होते ना, सगळं बरोबर सांगतील

मन्या- ते? काही नको, आपले किती बॉल घेतले त्यांनी दुपारी खेळतो म्हणून? ते नको

मग पलीकडच्या आजी, आपले कुठले तरी गेलेले नातेवाईक असं सगळं आठवून झालं.

शेवटी मन्यानेच एक नाव फायनल केलं. - तुम्हीपण ओळखलंत ना????

बरोब्बर- महात्मा गांधी

ते आपले सगळ्या पोरांच्या प्लॅनचेट करता कायम हजर असायचे. शिवाय सत्यवचनी.

ठरलं. घरातले सगळे पडदे ओढून नीट अंधार करण्यात आला. आम्ही महात्मा यायच्या आधीच हादरलेलो. मन्या मात्र नीट डोळे बंद करून वाटीला बोट ठेवून गांधीबाबाना बोलवत होता.आम्ही मन्याकडे, मन्या वाटीकडे एकटक पहात होतो. फरक इतकाच, आम्ही घाबरून आणि मन्या - इतका का उशीर लावतायत यायला असा पहात होता.

2 मिनिटे गेली असतील. वाटी लागली फिरायला. आले बाबा गांधीजी.

मन्या- चला पटापट विचारा प्रश्न. गांधीजी कामात असतात. त्यांना उशीर होईल

आम्ही भीतीयुक्त आदराने- हो मन्या?

मन्या -मग?मला माहीत आहे

मी- गांधीजी, माझा पहिला नंबर येईल का हो या वेळेला?

मन्या- अग, असतो की पहिला नंबर तुझा. दुसरं विचार.

मग मी मला लाल रंगाचा फ्रॉक मिळेल का? अजून कुणी आई जिलबी आणेल का? इथपासून मन्याबरोबरच्या मारामारीत मी जिंकेन का? असलेही गंभीर प्रश्न विचारून झाले. गांधीजींना काहीही प्रॉब्लेम आला नाही. सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरे.

मग मन्या- तुम्ही बावळट आहात.

आता मी विचारतो.

विचार विचार- आमचा कोरस

मन्या- गांधीजी, आता शाळेत गेलो तर जांभळाच्या झाडाला किती जामभळ असतील? वाघू(शाळेचा एक शिपाई- भीती वाटायची याची) असेल का सुट्टीत पण शाळेत?

झालं. आता गांधीजी पण वाघूला घाबरले. त्यांना काही हे उत्तर येईना. कारण मन्याचे दोन्ही हात प्रार्थनेत.

तेवढ्यात आई आली माझी. राम लक्ष्मण वगैरे ठीक हो, इथे आमचा धाकटा भाऊराया ताबडतोब बाहेर गेला आणि आपल्या घरात मन्या पांचट का काहीतरी करतोय आणि ताई, तिच्या मैत्रिणी गांधीजींना प्रश्न विचारतात हे ताबडतोब सांगितलं.

बाकीच्या गोष्टी आई हसून सोडून द्यायची,पण हे तिला नाहीच आवडलं. ती घरात आली आणि ओरडली- मनू, काय हे? कुठे पाहिलेस? कुणी शिकवलं? बाई आल्या म्हटल्यावर सगळ्यांनी फटाफट आवराआवर केली आणि पोबारा पण.

त्या दिवशी मात्र आईची बोलणी खाल्ली. आम्ही सगळ्यांनीच.

दुसर्या दिवशी मन्या -सविता, तुमच्या घरात गांधीजी फिरताना सापडले का ग? काल??

मी- भयानक घाबरून -नाही नाही

मन्या- ओरडू नको ग, घाबरते काय? दिसले तर म्हणावं थोडे दिवस इथे थांबा.आई बाहेर गेली की परत एकदा प्लॅंचेत करतो आणि तुम्हाला घरी पाठवतो. तोवर त्यांना भूक लागली तर आपल्या तला खाऊ देऊ थोडा थोडा. काय?

मागून मन्याची आई- गाढवा..... अजून आहेच का तुझं?


 

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

 

#पिंपळपान:जुन्या पण खूप छान आठवणी

लहानपणी आमच्या शेजारी मन्या म्हणून आमचा एक लीडर होता. आम्ही सगळे मुलं मुली त्याच्या अधिपत्याखाली बिनबोभाट सगळं करत असू. बाहेरच्या दुनियेत एखादी गोष्ट चूक असेल तरी मन्या म्हणाला तर ते आम्हाला ताबडतोब पटायचं आणि बाकीची दुनिया वेडी ठरवून आम्ही मोकळे. चिंचा, बोरं, कैर्या असले पदार्थ विकत घेतले तर पाप लागतं. ते झाडावरून पाडायचेच असतात, तर ते छान लागतात हे दिव्यज्ञान त्याला जन्मतः होतंच. परत कुठल्या झाडाची काय परिस्थिती, उदा. कैर्या लागल्यात का, चिंचा पाडायला काय करायला हवं, एखाद्या बंगल्यात वोचमन आहे का असल्या गोष्टींवर हा अगदी बारीक लक्ष ठेवून. मग त्यावर उपाययोजना पण हाच सांगणार. आम्ही फक्त तो सांगेल तसं वागणार. त्याची वह्या पुस्तकं आमच्या दप्तरात कोंबून त्याच दप्तर रिकामं करायचं, तोवर हा त्या झाडावर चढणार, सगळीकडे बारीक लक्ष ठेवून फटाफट कैर्या, चिंचा, जे काय असेल ते भराभर खाली टाकणार तोडून. आम्ही ते त्याच्या दप्तरात भरणार आणि कुणी यायच्या आत पोबारा करणार. मग घराच्या आधी एक मारुतीचं देऊळ लागे. तिथे वाटावाटी करून मन्याची वह्यापुस्तक, त्याचा वाटा त्याच्या दप्तरात कोंबून आम्ही साळसूदपणे आपापल्या घरी. असे अनेक प्रोग्रॅम मन्याच्या अध्यक्षतेखाली व्हायचे. बरं, त्याला कसलीच भीती कधीच वाटली नाही.

एकदा शाळेच्या रस्त्यावर असलेल्या आंब्याच्या झाडावर हा चढला. आम्ही 7-8 जण झाडाभोवती नेहमीसारखे रिंगण करून. दप्तरं रिकामी करून मन्या आता कैर्या टाकणार खाली एवढ्यात रखवालदार येताना दिसला. हा जोरात ओरडला, पळा, पळा घरी. ते काका आले पकडायला. आम्ही- आणि तू? मन्या- मी येतो बरोबर. त्यांना इतक्या उंच चढताच येणार नाही. तुम्ही जा.

आम्ही पळतपळत घरी येऊन त्याची वाट पहातोय. सगळे चिंताग्रस्त. मन्यापेक्षा त्याचं दप्तर घरी कसं देणार? तो कुठाय म्हणून काय सांगणार? सगळे बाहेरच. मन्याची आजी आली. मन्या कुठाय? आम्ही- नाही माहीत. आम्हीपण त्यालाच शोधतोय

आजीला बरोबर माहीत होतं, काहीतरी घोळ आहे.

तेवढ्यात एकाला लांबून तो रखवालदार, अजून एक मनुष्य मन्याला घेऊन येताना दिसले. आम्ही घरी पळायच्या बेतात. पण आजींनी बरोबर थांबवलं आम्हाला.

त्या रखवालदाराबरोबरचा मनुष्य म्हणाला- हा तुमचा नातू का?

आजी- हो

तो मनुष्य- अहो, काय पोरगं भारी आहे... माझया बागेत आंब्यावर इतका उंच चढला होता, पडला बिडला तर काय म्हणून आधी फटके देईन म्हणून धमक्या देऊन आणि नंतर चक्क हातापाया पडून उतरवलाय खाली.

मन्या- नाही ग आजी, यांना कुणालाच यांच्याच झाडावर चढता येत नाही. हे काय उतरवणार? माझा मीच उतरलोय.

तो मनुष्य- अहो, कैर्या चोरतात ही मुलं. आम्ही काय यांच्यासाठी लावलेत का झाडं?

आजी कस्नुषा होऊन- हो रे मन्या? तू कैर्या चोरायला चढलास यांच्या झाडावर?

मन्या- हॅट.. चोरायला चढलो असतो तर घाबरून रडलो नसतो का? तोडायला चढलो होतो.

मालक चिडून- तुझं झाड आहे का?

मन्या- तुमचंच आहे. पण खूप कैर्या खाल्ल्या की पोट दुखतं. किती कैर्या आहेत झाडाला... मस्त मोठ्या आहेत. इतक्या काही कोण खात नसतात. मग वायाच जाणार ना? म्हणून चढलो. शिवाय तुम्ही आत मागच्या बाजूला का लावलं नाही झाड? स्वतः शाळेच्या वाटेत लावायचं आणि आम्हाला बोलायचं?

आजी- ए मन्या- काय बोलतोस?

आम्ही,- मन्याचं बरोबर आहे.

मालक- गुरू भेटलास. यापुढे निदान विचारून चढ. पडलास तर मला केवढ्यात जाईल?

मन्या- काही पडत नाही मी. मला येतच. पण म्हणजे आता या झाडावर कधीपण जाऊ शकतो आपण.

आजी आणि मालक एकमेकांकडे हताश होऊन पहातायत आणि शेवटी आजीकडे चहापाणी होऊन सुटला प्रश्न.

आम्हाला काय- एक अक्ख झाड मिळालं ना राव. अजून काय हवं?

जय मन्या।

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...