रविवार, १४ मार्च, २०२१

 

आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट😊😊

मजा आली अगदी. ठरलेल्या वेळी सकाळी बरोब्बर साडेनऊ ला आल्या. खरंच सांगते, मलाच कुठेतरी किंचित अवघडल्यासारखं झालं होतं, एका मनस्वी, हुशार लेखिकेला भेटायचं म्हणून. पण त्या आल्या त्याच इतक्या सहजतेने की कुठलाही मी फार ग्रेट असा अभिनिवेशच नाही. आम्ही अगदी कोरोना (अर्थातच) पासून भाजीविक्री पर्यंत काहीsssही बोललो. आणि राजकारण? ते विसरून कसं चालेल बरं?? तोंडी लावायला हवंच की ते..

तर छान गप्पा मारल्या आणि जाताना त्यांनी आम्हाला मस्तपैकी एक अमूल्य भेटही दिली. तिचा फोटो जोडतेच आहे. एकूण काय तर रविवारची सकाळ अतिशय सुंदर, प्रसन्न झाली आज👍👍





 

शनिवार, १३ मार्च, २०२१

 

गूगलबाबा आपला इतका कल्याणासाठी झटत असतो की काय सांगू... मेल चेक करताना 'you may be interested in' म्हणून ज्या व्हिडिओज ची झलक होती ते जास्तीत जास्त - 'कणीक मळता फटाफट पोळ्या करा' या सदरातले होते. पाहूच म्हटलं काय करतात ते..

तर नेहमीप्रमाणे आधी सगळी नवी करकरीत भांडी घ्यायची. नॉनस्टिक चा निळा/लाल्/पिवळा तवा आणि लाल स्पॅच्युला मस्ट बरं का. पाण्यासाठी एक मोठा काचेचा सुंदर जग, तेलातुपासाठी एक सुबक ठेंगणी बरणी, तसाच सुरेख चमचा. मस्त गॅसची शेगडी आणि रेसिपी सांगायला एक तशीच फुल मेकप वाली सुबक ठेंगणी वगैरे..

एका काचेच्या वाडग्यात नाजुक पणे डाव कणीक, त्यात पावणेदोन कप अगदी मोजून पाणी, इतकुस्सं मीठ आणि तित्कुस्सं तेल्/तूप असं छानपैकी डोशासारखं बॅटर करून घ्यायचं. (पीठ भिजवायचं काय?????? श्शी.. सो डाउनमार्केट.) मग ते बॅटर दुसर्या सुंदरशा काचेच्या बोलमध्ये (परत तेच.. वाडगा काय???) एका मस्त निळ्या चाळणीतून गाळून घ्यायचं. (का म्हणजे? यू नो... टू मेक द्यॅट बॅटर लंप्स फ्री. कळ्ळं?)

मग किनी एक नॉनस्टिक चा निळा/लाल्/पिवळा तवा मंदाग्नीवर तापत ठेवायचा. त्यावर नॉन्स्टिक असला तरी लालचुटुक ब्रश ने सगळीकडे तेल्/तूप लावून घ्यायचं. (टू बी ऑन सेफर साईड हां). मग एक पळीभर पीठ ओतायचं त्यावर. खूप पातळ पोळी वगैरे मनात पण आणायची नाही. पराठा सारखं जाडसर पसरुद्या आपलं आपण. मंदाग्नीवरच. मग ते धिरडं (धिरडं तर काय हो) उलटा आणि परत मंदाग्नीवर भाजा. ती साईड झाली की परत उलटा आणि त्या लाल स्पॅच्युला ने धिरडं दाबत दाबत फुगवा.

किती सोप्पी आहे ना पोळीची रेसिपी? ती दाखवताना मस्त सुरीने तुकडे करुन दाखवली की झालं.

तर १३ मिनिटे ४५ सेकंदांचा हा व्हिडिओ पाहिला. यात एक पोळी तयार झाली.

मस्त आहे आयडियाची कल्पना. करुन बघूया का कधीतरी? असं डोक्यात यायच्या आत आईचा आवाज मनात घुमलाच. 'अगं- या फटाफट पोळ्या? १३ मिनिटाला पोळी तर नेहमीच्या १० पोळ्यांना किती वेळ? तुमच्या शाळेच्या वेळात झाला असता का स्वयंपाक?'

आणि त्यावर आजीचाही आवाज आला असता- 'अगो- धिरडीच हो ही. आम्हाला चार पदर नीट सुटलेली खरपूस पोळी लागते पानात. असले रोठ आम्ही नाही हो केले कधी...'

आयडिया कॅन्सल.


 

 

महाभोचक आजी रिटर्न्स😢😢

माझ्याकडे समोरच्या बिल्डिंगमधली एक ताई नियमित काहीतरी घ्यायला येते. आता छान ओळख झालीये तर इथे कुणी नसेल तर 2 मिनिटे गप्पा पण मारते. तर ती 4 दिवसांपूर्वी पोळी भाजीचे पार्सल घेऊन गेली. आता जाताना या . भो. आजींनी पाहिलंच. तिला थांबवून काय घेतलंस, किती, केवढ्याला, इथूनच का वगैरे सगळं विचारलं. तिनेही सांगितलं . ऑफिसमधून उशीर झालाय यायला म्हणून घेतलं. मग दुसर्या दिवशी ती परत आली आमच्याकडे. तिने मला सांगितलं ही की काल जाताना गाठलंच मला आजी नी. मी असं असं सांगितलंय. तुलाही माहीत असूदे. मी म्हणाले मला नाही विचारणार त्या. पण ठीक आहे. आम्ही बोलतोय तोवर टाळ्या पिटून, अग, इकडे वरती बघ, मी हाक मारतेय- आज पण पार्सल का? आज तर वेळेवर आलीयेस असा आवाज दिलाच तिला आजींनी. तर ही म्हणाली- आजी, आमच्या घरी इथलं जेवण आवडतं म्हणून नेतेय. तर तेव्हा बरं म्हणाल्या आणि नंतर तिला परत गाठून घरी चार पोळ्या लाटायला काय होतं तुला? असं भर चौकात विचारलं. तरी तिने फार गांभीर्याने नाही घेतलं. काल परत ती माझ्याकडे आली तेव्हा तिच्या छोट्या मुलीला घेऊन आली. कुणी फारसं नव्हतं तर बोलत बसली होती. तिच्या छोट्या मुलीला एक कागद ,पेन दिलं होतं मी चित्र काढायला. तर या समोरून- झालं तिचं चित्र काढून. कंटाळली असेल ती आता. 10 मिनिटं होऊन गेली की. माझी मैत्रीण म्हणाली- थांबलीये हो आजी ती. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही जेवा आता. दीड वाजलाय. तर म्हणे मी जेवलेय पण आता तुम्ही जा घरी. रोज रोज हॉटेलमध्ये काय घ्यायचं?

आता रोज हॉटेलमध्ये जेवायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. योग्यायोग्यतेत मी जाणार नाही कारण मी जाणूनबुजून सुरू केलेला व्यवसाय आहे हा आणि मला खूप आवडतो तो.

या माझया तोंडावर हे म्हणतायत म्हटल्यावर मला इतका राग आला, इतका राग आला...😢😢 संपलं, पुढे बोलता कुठे येतंय? पण त्याच वेळी रस्त्यावरून या . भो. आजींना व्यवस्थित ओळखून असणार्या दुसर्या एक आजी चालल्या होत्या. त्या सरळ म्हणाल्या- अहो घेणारी ती आणि देणारी ती- दोघींना पटतंय ना? मग तुमचं काय आहे मध्ये? तुम्ही एक रुपयांच्या कस्टमर आहात का? कशाला पहाटेपासून गॅलरीत असले उद्योग करता?

यावर .भो. आजी लगेच आपल्या कानांवर हात ठेवून बोलल्या- काय म्हणालात? अलीकडे ऐकू कमी येतं मला.

त्या दुसर्या आजी मान वळवून मला म्हणाल्या- बोल उलट त्यांना. काही होत नाही. नुसती संतापून गप्प बसली आहेस. असं नको करुस.

आम्ही दोघी गप्पच आणि महाभोचक आजी घरात गायब.

खरंच काही जणांना तरी उलट बोलायला यायलाच हवं मला 😢😢😢


  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...