मंगळवार, ३० जून, २०२०

 

गुलाबकळी आणि नथीची गोष्ट:

काय बाई चॅलेंजेस तरी फेसबुकवर.. कुठं साडयाच नेसा, मग काळेपांढरे फोटो टाका, मग मेकप नसलेले फोटो टाका, मग नथ घातलेले फोटो टाका... करा करा, सगळं करा पण ती नथ घालण्यासाठी नाक टोचायला काय काय करायला लागतं माहिते का?

खरं तर नथी सारखा अतीव सुंदर, घडीव दागिनाच नाही. तिचे सगळे झळाळणारे टप्पोरे मोती, तो मधला एकच हिऱ्यासारखा चमकणारा पांढराशुभ्र खडा, खाली लुकलूकणारे लाल, हिरवे खडे आणि तो सुंदर बाकदार दांडा. तशी तर मला कुठलीही नथ आवडतेच. सोन्याची छोटी आवडते तशी खड्यांचीही. ब्राह्मणी पद्धतीची खाली थोडीशी ओठांवर वळणारी आवडते तशी तुळजाभवानी ची सरळ ओठाखाली येणारी भलीमोठी नथ पण आवडतेच. अगदी लमाणी बायका घालतात ती चांदीची नथ पण मोठी असली तरी आवडतेच.आपल्याला चापाची नथ, चमकी हा प्रकार पटतच नाही. नाक टोचलेलंच पाहिजे नथीकरता. मला तर लहानपणापासून नाक टोचायचं होतंच. शाळेच्या गॅदरिंग मध्ये कुणी नऊवारी, कुड्या, चंद्रकोर, नथ अशी दिसली की असूयाच वाटायची मला.पण ते नाक टोचणे हे प्रकरण काही जमलंच नाही . मग तोवर चापाच्या नथी घालणे हे प्रकार केलेच नाईलाजाने. का टोचलं नाही ? तर टोचतांना दुखेल याची अफाट भीती.

आम्ही लहान असताना दारावर नाक टोचून देणाऱ्या बायका यायच्या. माझ्या काही मैत्रिणींनी टोचूनही घेतलं त्यांच्याकडून. पण मग नंतरची रडारड पाहून तो बेत मीच हाणून पाडला.

अहो पण मग चमकीचं काय? नथीच काय? ती बिचारी माझ्या नाकात बसायला मिळालं नाही आणि माझा रुबाब वाढवला नाही म्हणून वर्षानुवर्षे हिरमुसून जात होती.

होता होता कॉलेज संपत आलं. तेव्हा माझी एक अगदी जवळची मैत्रीण नाक टोचून आली. आई ग... किती ते गोड दिसावं एखाद्या नाकाने? तेही फक्त चमकी च्या जिवावर? काळजात नुसती कालवाकालव.

मग तिची मोठी मुलाखत घेऊनच टाकली. बाई कुठे गेलीस? कुठून टोचलस? किती दुखलं? चमकीनेच टोचलस ना? किती वेळ लागतो? रडलीस का? किती? घरी काय म्हणाले? नाक दुखतंय का? यात सगळ्यात महत्त्वाचं चमकीने नाक टोचणे हाच प्रकार होता. नाहीतर ते सुंकलं म्हणजे सोन्याची तार आणि त्यात एक मोती हा प्रकार मात्र अजिबात च आवडला नाहीये मला. शेम्बूड आल्यासारखं दिसतं ते.

माझे भयाण प्रश्न ऐकून घेऊन (करते काय बिचारी? जवळची मैत्रीण ) ती म्हणाली अमक्या दुकानात गेले होते. तिथल्या माणसाचा हात सफाईदार आहे. दुखत नाही. फक्त डाव्या डोळ्यातून एक मोठा अश्रू बाहेर येतो. हुश्श. मग सोपं दिसतंय. असं ठरवून घरी गेले. आई- आजींसमोर आता परवाच नाक टोचणार म्हणजे टोचणार अशी भीष्मप्रतिज्ञा जाहीर केली. आजी म्हणाली- अग, पण नथ आवडते ते ठीक. नाक कसं चाफेकळी हवं. म्हणजे नथ कशी सुरेख दिसते. आणि गोरी मुलगी असेल तर सुरेखच.

आता हा जिव्हारी लागणारा अपमान करणं शोभतं का आजीला? मान्य आहे तुम्ही दोघी अगदी गुलाबी गोऱ्या आणि आम्ही पक्का कलर वाले...

पण इथं आईच आली धावून मदतीला. म्हटली नसुदेत ग चाफेकळी. गुलाबकळी तर आहे...

मला एकदम बरं वाटलं. चला, चालेल म्हणजे. तोवर आजी म्हणाली- रडारड नाही करायची. गुलाबकळी म्हणजे जाड पाकळ्या.

मग मात्र चिडून जाऊन आता न रडता टोचतेच नाक असं टिचचून सांगितलं आजीला आणि मामेबहिणीला फोन केला. तिचंही नाक टोचायचंच होतं.

ठरल्या मुहूर्ताला गेलो सराफाच्या दुकानात. माधुरीताईला म्हटलं, आधी तू. मोठ्याचा मान. ( तेवढंच तिचं काय होतंय ते बघू... ) पण बेटीने पटकन नाक टोचून घेतलही.

मग बसले त्या माणसासमोर. त्याने चमकीला मस्त टोकदार केली. इकडे माझी धडधड सुरू. मग त्याने माझा चेहरा उजेडाकडे धरला आणि ती चमकी नाकावर टेकवली की मी मारलीच मोठी किंकाळी. डोळे मिटून. किंकाळी प्रकरण आटोपतानाच मी त्या माणसाकडे पाहिलं. तो हसत म्हणाला- चमकी हातातच आहे. फक्त पहात होतो मी . आता टोचतोय नाक. काही होत नाही.

झाला एकदाचा तो सोहळा. आनंदाचे डोही आनंद तरंग!!

मग आली दिवाळी. लक्ष्मी पूजनाला एकदाची चमकी काढून आईची नथ घालून पाहिली आणि म्हटलं.. आजी- गुलाबकळी तर गुलाबकळी. छान काय आहे तर नथीचा नखरा. बघ. तिनेही येड ध्यान ग आपलं म्हणून जवळ घेतलं न जीव शांत झाला.

तरीही इथं एक फोटू तो मंगताच है.. तर हा एक जुना फोटो. नथ कशी सुंदर दिसते की नाही?


 

गुरुवार, १८ जून, २०२०

 

#टिल्लूहॉटेलच्याटिल्लूगोष्टी:

लॉक डाऊन नंतर आत्ता आत्ता जरा हॉटेल चालू होतंय. खूप गर्दी तर नसतेच. आम्ही कितीही सुरक्षेचे उपाय केले तरीही लोकांच्या मनात थोडीशी भीती तर असणारच. पण तरीही काही लोक येतातच. त्यातलेच एक काका आहेत. वृद्ध झालेत. तर फिरायला निघाले की येतात चहा प्यायला. आधी ते आले की मला हसू यायचं. कारण त्यांचे सिल्कचे झब्बे. गुलबक्षी, पिवळाधम्मक, गडद्द निळा असले रंग असतात. शिवाय बोराएव्हढ्या स्फटीकाची माळ अशी त्या रंगीत झब्ब्यावर रुळत असते. असो, तर चांगले गप्पा मारण्यात पटाइत आहेत हे काका. कुणी नसेल तर मस्त टाईमपास.

आज आले तर आम्ही निवांत होतो. कसे कोण जाणे गाडी लग्न ठरणे कसं महाकर्मकठीण आहे यावर आली. त्यातून मिळालेलं हे आज का ग्यान

अहो, लग्न ठरणं म्हणजे काय सोपं काम वाटलं का? महादेवाला नाही चुकला तो व्याप. महादेवाला महादेव का म्हणतात माहिते का?

देशपांडे ताबडतोब खुर्चीवर मांडा ठोकून आपल्या नावातच असलेल्या वतनदारी ला जागून म्हणाले- नाही माहीत हो काका. का बरं म्हणतात?

काका: आपण काय मनानी सांगत नसतोय. शास्त्रातच लिहिलंय.

नवरा: हो,पण काय?

काका: पूर्वी महादेवाचं स्थळ घेऊन नारद गेला पार्वतीच्या बापाकडं. तर तो म्हणाला की बाबा, बाप कोण या महादेवाचा? नीट चौकशी करायला पाहिजे का नको लेक द्यायची तर..

आता नारदाने दिलं सांगून की बाबा महादेवाचा बाप विष्णू.

आम्ही: ? हे कशात आहे?

काका: शास्त्रात लिहिलंय. मग पार्वतीचा बाप म्हणाला की आजा कोण?

तसा नारद आला विष्णुकडे, बाबा असं न असं झालंय, तर तुझा बाप कोण?

विष्णू म्हणाला आता दे सांगून माझा बाप ब्रम्हा.

नारदाने सांगितलं पार्वतीच्या बापाला जाऊन. तर पार्वतीचा बाप म्हणाला की मागच्या सात पिढ्याची माहिती पाहिजे.

आम्ही: हो?

काका: आन मग? लेक द्यायची म्हंजे खायचं काम आहे व्हय ते? पण इथं गंमत झाली. महादेव चिडला.

आम्ही: अरे बापर

काका: मग? महादेव आहे तो. काय साधं काम नाही. सरळ पार्वतीच्या बापाकडं गेला आणि म्हणाला- मी महादेव आहे. सगळ्यांचा बाप मीच. मला कुणी बाप नाही.

तेव्हा पार्वतीच्या बापाला त्याने सरळ सांगितलं ते आवडलं आणि म्हणून त्यांचं लग्न झालं. आहात कुठं महाराजा? महादेव आहे तो.

तर कळलं असेलच तुम्हाला आज का ग्यान.. शास्त्रातच लिहिलंय. आपण काय मनचं नाही सांगत

 


 

बुधवार, १७ जून, २०२०

 

#पन्या

गेले 7-8 दिवस पन्या मॅडम त्यांच्या मावशीकडे रहायला गेल्या होत्या. जाताना मानव आणि ओंकार या दोन्ही मित्रांना सांगून गेल्या होत्या- आत्या नाहीये घरात म्हणून तुम्हाला सांगतेय. त्यांना सांगा मी मावशीकडे चाललीये आणि नेहमीसारखं 4 वाजता खेळायला जा त्यांच्याकडे.

तिच्या सैनिकांनी बरोबर 4 वाजता येऊन हे सांगून 3 दिवस खेळायचं शेड्युल पाळलं आणि ते पण त्यांच्या मामाकडे गेले.

2 दिवस असेच गेले आणि पन्या मॅडम एके दिवशी अवतीर्ण झाल्या. त्या बघतात तर काय, मी माझ्या बाबांच्या डोक्याला तेल लावत होते, मग त्यांचं सगळं आवरून त्यांना पावडर लावत होते. ही प्रचंड आश्चर्याने पहात बसली शांतपणे. सगळं झाल्यावर म्हणाली- आजोबा, तुम्ही तुमची तुमची पावडर का नाही लावत? आणि आत्या का लावतेय तुमच्या डोक्याला तेल? ती का केस विंचरते तुमचे? हे तर सगळं माझं मीच करते. तुम्ही तर कित्ती म्हंजे कित्ती मोठ्ठे आहात...

मी काही बोलायच्या आधीच बाबांना हसू आलं. ते मला गप्प बसायला सांगून तिला म्हणाले, अग पन्या, मी पडलो ग घरात, हात मोडला माझा. मग डॉकटर नी माझं operation केलंय ना, म्हणून मला काही करता येत नाहीये हाताने म्हणून आत्या करतेय.

पन्या- मग ते हाताचं बँडेज कुठाय?

बाबा- आता काढलं ते.

पन्या- म्हणजे तुम्ही बरे झालाय आजोबा..

बाबा- हो ग, पण अजून हात दुखतो माझा

पन्या- लगेच उत्साहात- अहो पॅकटीस करायची आजोबा.. म्हणजे हात बरा होतो.

बाबा-तुला काय माहीत? उजवा हात नुसता दुखतो माझा.

पन्या- अहो, मागच्या वर्षी माझा पण मोडला होता. उजवाच हात.

मी- कसा गं?

पन्या- हे माझे पप्पा.. शाळेत सोडायला येत होते आणि मी मागे अजून नीट बसलेच नव्हते तर त्यांना कळलंच नाही. त्यांनी गाडी पुढे नेली. मी धडाम

मी- खूप लागलं?

पन्या- मग??? या आजोबांसारखाच हात मोडला माझा शिवाय पाऊस होता तर मी चिखलात पडले., नुसती मडी, मडी झाले होते. शी sssss!

मी- खूप रडलीस मग?

पन्या- हॅट. मला वेळच नव्हता रडायला.

मी- ?

पन्या- मग? हात हलत नव्हता आणि माझा ड्रेस मडी झाला होता आणि शिवाय मला उठतापण येत नव्हतं. रडू तरी कशी नं मी?

मी- मग?

पन्या- पप्पा पुढे गेले थोडेसेच( इथं एक वीतभर हात दाखवुन) हे एवढेच. त्यांना दिसलं मी पडले, मग तेच घाबल्ले आणि मला दवाखान्यात नेलं. तिथे माहिते.. माझ्या हाताचा एक फोटो काढला काळा काळा आणि मग माझ्या हाताला fracture घातलं.

मी- पनू, अग प्लास्टर घातलं म्हणायचं.

पन्या- अय... नाही काही, मला दंडापासून बोटापर्यंत fracture घातलं होतं. पिंक कलर चं.

मी- हो का? बरं

पन्या- होच मुळी

मी- मग काय केलंस तू?

पन्या- मी घरी आले ना, तेव्हा लल्ले खूप. मला आठवलं ना दुखतोय हात, मग सवय झाली.

त्यानंतर एकदम शिकवण्याच्या मूड मध्ये शिरत - पन्या मॅडम- डोळे मोठे, आवाज मोठा आणि हातवारे करत- पण आजोबा आता फॅकचर काढलं ना? मग हात फिरवा बरं.. हा असा गोल गोल..

बाबा- अग नको, माझा हात दुखतो.

पन्या- अहो पण ऑप्पेशन कशाला करायचं sss ? मी केलं का? माझा हात पहा किती मस्त आहे. आहे की नाही?

बाबा- मुकाटपणे हो हो.

पन्या- मला बघू तुमचा हात, दाखवा बरं, काही दुखत नाही

बाबा- गुपचूप हात दाखवतात तिला.

पन्या- फारच गांभीर्याने हात पाहून- अहो आजोबा, बरे झालाय तुम्ही. करा बघू असा हात (म्हणून हाताचा पंजा पालथा केला) बाबांनी गप करून दाखवला.

पन्या- गुड. आता असा करून दाखवा.. .....स ल ल

बाबांनी तेही केलं. मी आणि नवरा म्हणतोय जे दिवसरात्र सांगतोय आम्ही आणि डॉक्टर, बाबांना- ते ही ठकी 5 मिनिटांत करत होती.

आम्ही इतकं बोलतोय तोवर पन्या- आत्या, तुझे आजोबा बरे झालेत. बरं का आजोबा, घाबलायचं नाही. दुखलं म्हणून ललायचं नाही. अजून एक आयड्या सांगू?

बाबा- सांगा सांगा ती पण

पन्या- आजोबांचं counselling चालू-अहो आजोबा, चल्लस आठ आणि लुडो खेळा ना. त्यात ना एकदा अशा टाकायच्या कवड्या आणि मग मनगट फिरवून अशा टाकायच्या. मग पॅकटिस होते आणि हात बरा होतो. समझें?

बाबा- हो माझी आई. पळा आता.

पन्या आम्हा दोघांकडे पहात- मी चालले. कशी आयड्या केली मी.. तुम्हाला काही म्हणजे काही येत नाही. साधं चल्लस आठ येत नाही

पन्या जोरात आम्ही कोमात


 

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...