लॉक डाऊन नंतर आत्ता आत्ता जरा हॉटेल चालू होतंय. खूप गर्दी तर नसतेच. आम्ही कितीही सुरक्षेचे उपाय केले तरीही लोकांच्या
मनात थोडीशी भीती तर असणारच.
पण तरीही काही लोक
येतातच. त्यातलेच एक काका आहेत. वृद्ध झालेत. तर फिरायला निघाले की येतात चहा प्यायला. आधी ते आले की मला हसू यायचं. कारण त्यांचे सिल्कचे
झब्बे. गुलबक्षी, पिवळाधम्मक, गडद्द निळा असले रंग असतात.
आज आले तर आम्ही निवांत होतो. कसे कोण जाणे गाडी लग्न ठरणे कसं महाकर्मकठीण आहे यावर
आली. त्यातून मिळालेलं हे आज का ग्यान
अहो, लग्न ठरणं म्हणजे काय सोपं काम वाटलं का? महादेवाला नाही चुकला तो व्याप. महादेवाला महादेव का म्हणतात माहिते का?
देशपांडे ताबडतोब खुर्चीवर मांडा ठोकून आपल्या नावातच असलेल्या वतनदारी ला जागून म्हणाले- नाही माहीत हो काका. का बरं म्हणतात?
काका: आपण काय मनानी सांगत नसतोय. शास्त्रातच लिहिलंय.
नवरा: हो,पण काय?
काका: पूर्वी महादेवाचं स्थळ घेऊन नारद गेला पार्वतीच्या बापाकडं. तर तो म्हणाला की बाबा, बाप कोण या महादेवाचा? नीट चौकशी करायला पाहिजे का नको लेक द्यायची तर..
आता नारदाने दिलं सांगून की बाबा महादेवाचा बाप विष्णू.
आम्ही: ऑ? हे कशात आहे?
काका: शास्त्रात लिहिलंय. मग पार्वतीचा बाप म्हणाला की आजा कोण?
तसा नारद आला विष्णुकडे, बाबा असं न असं झालंय, तर तुझा बाप कोण?
विष्णू म्हणाला आता दे सांगून माझा बाप ब्रम्हा.
नारदाने सांगितलं पार्वतीच्या बापाला जाऊन. तर पार्वतीचा बाप म्हणाला की मागच्या सात पिढ्याची माहिती पाहिजे.
आम्ही: हो?
काका: आन मग? लेक द्यायची म्हंजे खायचं काम आहे व्हय ते? पण इथं गंमत झाली. महादेव चिडला.
आम्ही: अरे बापरे
काका: मग? महादेव आहे तो. काय साधं काम नाही. सरळ पार्वतीच्या बापाकडं गेला आणि म्हणाला- मी महादेव आहे. सगळ्यांचा बाप मीच. मला कुणी बाप नाही.
तेव्हा पार्वतीच्या बापाला त्याने सरळ सांगितलं ते आवडलं आणि म्हणून त्यांचं लग्न झालं. आहात कुठं महाराजा? महादेव आहे तो.
तर कळलं असेलच तुम्हाला आज का ग्यान.. शास्त्रातच लिहिलंय. आपण काय मनचं नाही सांगत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा