मंगळवार, २४ मार्च, २०२०

 

#पन्या:

लॉक डाऊन च्या काळात मिळालेला एक फ़ुलटू टाईमपास.

ही आमच्या घराजवळ रहाणारी प्रणिता-पनू ... म्हणजे पन्या डॉन . वय 7 वर्ष. पण डायलॉगबाजी ऐकायची नुसती. घाबरणं, लाजणं वगैरे भानगडी माहीत नाहीत तिला. ओळख तर लागतच नाही. मला वाटलं, मी आले, मला पाहिजे ते केलं, आता चालले. असला attitude. पण मॅडम दिसायला एकदम मस्त. गोरीगोमटी, मोठे डोळे ज्यात अपार कुतूहल, अचाट खोड्या करण्याचा उत्साह आणि डॅमबिसपणा खचाखच भरलेला. सिल्की बॉयकट चे केस उडवत सतत नाचत अफाट बडबड करणे हेच काम. तिच्या मते ती सेम कतरिना कैफ आहे.

आमच्या सोसायटीतल्या आमच्या एका मित्राची मुलगी हे पात्र. आम्ही दोघे दुपारी पत्ते खेळत बसलो होतो. दरवाजा उघडाच होता, तेव्हा आल्या या मॅडम आत. पत्ते खेळताय? हा गेम झाला की मला पण वाटा पत्ते. ओ काकू.. आपलं .. आत्या सरका न थोड्या, मला जागा पाहिजे. आम्ही बघतोय कोण ही तोवर स्वतःची ओळख स्वतःच करून दिली. तुमचा मित्र नै का मुकेश- तो शेजारी रहातो?? ते माझे पप्पा आहेत.

मी- हो, नाव काय तुझं?

मी? माझं नाव नाही माहीत तुम्हाला? मी प्रणिता. पन्या म्हणा मला. - सगळं आज्ञार्थी.

मी- बरं. मला माहीत नव्हतं.

पन्या: असं कसं माहीत नाही? हे तुमचे आजोबा (माझे बाबा) ओरडतात की आम्हाला रोज दुपारी.. आम्ही उन्हात खेळतो म्हणून.

हे सांगता सांगता अखंड उड्या मारणे चालू. दिवाणावरून उडी मारून खुर्चीवर, तिथून खाली, मग खिडकीवर, तिथून उड्या.. अखंड टकळी.

मी अजिबात गोंधळ न चालणार्या अतिशिस्तप्रिय वडिलांकडे एक कटाक्ष टाकला. पुढचा घोळ लक्षात आलाच कारण ते आतून उठून हिच्याकडेच येत होते. आम्ही दोघे आता पुढे काय... वाटेतो हीच माझया वडिलांना - या ना बाबा, तुम्ही आम्हाला कसे ओरडता त्याची acting करून दाखवू?

आणि ते काही म्हणायच्या आत खिडकीपाशी जाऊन दोन्ही हात मागे बांधून माझया वडिलांची अकटिंग करत- काय ग चिमणे- काये उन्हात? पळ घरी.. ऊन उतरल्यावर खेळायचं.. असं म्हणून वरती- असंच करता ना तुम्ही?? हे पण विचारून वडिलांना चारी मुंड्या चीत करून झालं.

मग आम्हाला पत्त्यांमध्ये मुंगूस मी शिकवणार म्हणाली. तिचे नियम. जोरजोरात ओरडून, नाचून, धुडगूस घालून ती अर्थातच जिंकली. नवरा ओरडतोय- असा खेळतात होय मुंगूस?

पन्या- हो. असाच खेळतो आम्ही. आणि मीच जिंकत असते.

आम्ही दीड तासात घराची झालेली अवस्था आता नीट करायला लागणार असं बोलतोय तोवर- छान आहे की हे. असाच असतं घर. आता उद्या चार वाजता येईन मी परत. तेव्हा काकू- आपलं .. आत्या- एक पाण्याची बॉटल आणि ग्लास आणून ठेवा इथं. म्हणजे खेळताना उठायला नको. काय??

मी- बरं हो मॅडम. पण काकू... आपलं ते आत्या म्हणजे काय?

पन्या- फुसस्स.. ते होय? मला काकू म्हणायची सवय आहे आणि तुम्ही पप्पाची मैत्रीण आहे ना, तर तुम्ही आत्या असं आजीने सांगितलंय, पण लक्षात रहात नाही ना, लहान आहे ना मी..

नवरा- बरं झालं सांगितलंस. आम्हाला माहीतच नव्हतं.

पन्या- काकांचा हात स्वतः पुढे करून त्यावर टाळी देऊन उद्या येते म्हणून पसार.

आम्ही तिघेही त्यानंतर रोज 6 वाजता थकून कान धरून बसलेलेच सापडलो असू

क्रमशः


 

गुरुवार, १९ मार्च, २०२०

 #टिल्लू हॉटेलच्या टिल्लू गोष्टी:

हॉटेल मध्ये पेस्ट कंट्रोल अति आवश्यक, तसं ते आमच्याकडेही होते च. त्यामुळे एकही कीटक नाही, झुरळ उंदीर नाही म्हणून आम्ही आमच्यावरच खूष बरका. कसं आपण छान ठेवलंय सगळं असं वाटून. मग पचका नको? आम्ही शेफारलो तर कसं होईल? असं एका उंदराच्या मनात आलं. आणि रस्ता क्रॉस करून लेकाचा आमच्या हॉटेलात इतका पटकन शिरला आणि घाबरवलं मला. माझी रीतसर आरडाओरड ऐकून नवरा धावलाच. काठी बिठी घेऊन तो त्या उंदरामागे आणि मी नुसतीच त्याच्यामागे पळापळ करत. असा भर दुपारी अर्धा तास सीन झाला आणि नवर्याने त्याला हुसकावला. आम्ही निवांत.

दुसर्या दिवशी हॉटेल उघडून पाहिलं- सगळं नीटनेटकं दिसताय ना, नक्की परत नाही न आला? तर काही नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं? तर हेच ते ,हेच ते, हेच ते... असं गुणगुणत परत खूष झालो.

थोड्या वेळात एक माऊ आमच्या हॉटेल समोरून संशयास्पद हालचाली करताना दिसली. तसा नवर्याच्या अंगात परत करमचंद आला. परत सगळं हॉटेल शोधून झालं, कुठे खुसफूस ऐकू येतेय का, दिसतोय का कुठे? तर नाहीच. मग ही माऊ का अशी फेऱ्या मारतेय? कळेचना.बरं तिला हाकलायला गेलं तर ठीक आहे बच्चा, नंतर घेईन बघून असा पवित्रा घेऊन तात्पुरती जायची आणि परत आपली दारात . आमची अवस्था याड लागलं याड लागलं रं अशी. शोधतोय उंदीर.

शेवटी पार दमून खुर्चीत टेकलो आणि...

माऊ ने पाहिलं हे, शांतपणे आत आली, फ्रीजमागे गेली, उंदीर घेतला आणि आमच्याकडे- बावळट नुसते.. एक उंदीर पकडता येईना यांना असा क्षुद्र कटाक्ष टाकून गेलीही.. शून्य सेकंदात


रविवार, ८ मार्च, २०२०

 

आज सुचिकांत वनारसे यांची पोस्ट वाचली त्यांच्या लाडक्या नेपच्याची. आणि मग रहावेचना. म्हटलं लिहूयाच आता आपल्याला भेटलेल्या वाघाच्या मावश्या आणि मामांबद्दल

सगळ्यात मोठी गोष्ट ही की आम्ही कधीच, कुठलाच प्राणी पाळला नाही. पण ते मात्र नेमाने आम्हाला शोधतात आणि आम्हालाच पाळतात. आता त्यांनी आम्हाला पाळलं की आम्ही त्यांचं ऐकणं हेच काय ते आमच्या हातात उरतं. मालकच ते.

तर आमच्या शेजारच्या आजींनी एक मांजर पाळली. मग तिला आपोआप कळालं की शेजारच्या घरातले लोक बरे आहेत गिऱ्हाईक बनवायला. एक तर आपण सुंदरच आहोत त्यामुळे त्यांनी आपले लाड हे केलेच पाहिजेत. नो ऑप्शन. आणि नसतोच सुंदर तरी लावले असतेच करायला. कारण हक बनता है भाई पडोस के घर पे. तर या न्यायाने ही पांढरीशुभ्र विठी आमच्याकडे यायला लागली. आम्ही आपले दूध दे तिला, पोळी घाल इथवर होतो. मग या मॅडम सोफ्यावर ऐसपैस पसरायच्या आणि आपल्याला जर बसायचं असेल तिथे तर- काय कटकट लावलीये... झोपतेय ना मी इथे अशी बघायची. हो, सवयीने समजतंच आपलयाला. मग आपण आपल्याच घरात दुसरी जागा शोधायची. बरं इतकी भारी की घरी पाहुणे आले आणि जर सोफ्यावर ती बसायची त्या कोपऱ्यावर बसले तर सरळ येऊन त्या पाहुण्यांच्या डोळ्यांत आपले हिरवे हिरवे डोळे रोखून बघत बसायची- एकटक. या टेरर प्रकारामुळे तो पाहुणा हललाच पाहिजे जागेवरून इतकी दहशत. परत जागा मिळाली की प्रेमळ हसायचं. आपण खल्लास हसतात हो मांजरं)मग आई पोळ्या करायला लागली की तिच्या या पायातून त्या पायात अशी अखंड म्याव म्याव करत ळ च्या आकारात हिंडत बसे. का? तर तव्यावरची पहिली गरमागरम पोळी मलाच मिळाली पाहिजे. आधीच केलेली पण ताजीच जर डब्यात असेल आणि ती दिली ताटलीत तर 'खा तूच' असा एक तुच्छ कटाक्ष टाकून जायची मान वेळावून. असली हिम्मत आम्ही केली असती तर फटके पडले असते. पण या मॅडमचा तोराच फार. तिला पिल्लं होणार हे कळल्यावर माझया बाबांचा उत्साह पहाण्यासारखा. आईला सूचना त्यांच्या- तिला जास्त पोळी दे ग, दूध पण दे. आजी चवताळून म्हणायची- हो, बारशाला कुणाकुणाला आणि कुणाकुणाच्या मांजरांना बोलवायचंय तशा पत्रिका छाप आता. पण हे विठी ला ही माहीत होतं. सगळी 4 पिल्लं दाखवायला आधी बाबांकडे आली ती. एक एक करून दाखवायचं, बाबांनी तिला अरे वा, छान आहे हं तुझं बाळ म्हटलं की ते ठेवून दुसरं आणायचं. धमाल असायची. कळतंच त्यांना सगळं.

मग थोड्याफार फरकाने अशीच खूप मांजरं, बोके मिळाले आम्हाला मालक म्हणून आमच्या घरात एक उंदीर, पाल, चिचुंद्री असलं काही नसायचं मात्र या पाहुण्यांमुळे. शिवाय मांजरांना स्वतःला माहीतच असत आपण अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आहोत. अंघोळ बिंघोळ हे मर्त्य मानवाचे चोचले आपल्याला अजिबात आवश्यकच नाहीत.

मागच्या वर्षी आम्ही आमच्या फूड जॉईंट ला सुरुवात केली. पूर्ण दुकानांच्या लायनीत हॉटेल. त्यात मांजराच काय काम? पण तिथंही एक मांजर आलीच. मग नवर्याने आलीये ती म्हटल्यावर दूध दिलं. खल्लास. पाळलं तिने आम्हाला लगेच. आणि तिचा आवाज म्हणजे- खरोखर गोड. तिचं ते म्याव म्याव अतिलाडीक आणि मंजूळ. मग तिला तेही कळालं की हे दोघे वेडे आहेत. एकदा का अशी मान वेळावली, तशी मान वेळावली, झुपकेदार शेपूट फुलवून दाखवली आणि गोड लाजरं पाहिलं की हे पार प्रेमातच पडतात आपल्या. मग काही हवं असेल की हुकमी हत्यार.

तिला एक पिल्लू झालं. त्या येड्याला आम्ही काय म्हणतोय - ते काय करतंय हे काही कळायचंच नाही. कित्ती छान छान नावं ठेवली त्याला पण बघेचना. मग एकदा नवरा म्हणाला- 'ए पप्पू....' आणि आलं न बाळ धावत . तेव्हापासून तो पप्प्या झाला.

आता या मनीला माहीत होतं की आपला भाव आता कमी झालाय. आपल्या बाळाचा भाव आहे. मग ती दोघे हॉटेल उघडताना एक उजवीकडे आणि एक डावीकडे बसलेलीच असायची. शटर उघडलं की हा पप्या अशक्य घोगर्या आवाजात म्याव म्याव करून आम्हाला काही करूच द्यायचा नाही. मला आधी दूध. मग मायलेकरांचा नास्ता झाला की आई उंडारायला बाहेर आणि हा गधडा आईसबॉक्सवर झोपायला कूच करायचे. आपल्याला बर्फ हवाय म्हणून आपण बॉक्स ला हात लावायचा अवकाश- याचा आरडाओरडा चालू. माझा बॉक्स आहे. मी इथंच झोपणार. माझया झोपेच्यावेळी हॉटेलमध्ये काम कसं करू शकता? माणसं आहात की कोण? हे सगळं असायचं त्यात.

त्यातून सापडलेला प्रत्येक उंदीर, कबूतर मारायचं आणि आपल्यापुढे आणून आधी दाखवायचं हा खाक्या. तुम्हाला कसंतरी झालं ते पाहून, नको वाटलं तरी - it's your problem, not mine असं पाहून मी दाखवलंय तुला, मग नको म्हणू माहीत नाही असा चेहरा करून आपली शिकार उचलून चालू पडायचं.

दुपारी 3.30 ला आम्ही जरा निवांत झालो की आपल्याजवळ यायचं, खूप मस्का मारायचा. आपल्याकडून लाड करून घ्यायचे आणि आपला मूड बदलला की सरळ मांडीवरून खाली उतरून चालू पडायचं. हो मग, झालं की माझं काम - हाच attitude.

काही म्हणा, स्वार्थीपणात यांचा कुणी हात नाही धरणार पण देवाने देखणेपणासाठी काही ठेवलं नाही हो बाकी यांच्यात. कसली दिसतात एकेक....

सुचिकांत च्या नेपच्यामुळे इतकं सगळं आठवलं आज


 

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...