शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

 

ऑर्डर आली म्हणून दोघे दणादण काम करत होतो.

तेवढ्यात मागून हाक आली.. काय मग मॅजिक.. कसं काय चाललंय?

नवरा म्हणाला छान. मस्त.

मी मागे वळून पाहिलं, तर एक पोलिसासारख्या खाकी गणवेषातला मनुष्य. मी पाहिल्या पाहिल्या म्हणाला.. काय मॅडम..?

मी: ठीक ठीक. (असं म्हणायचं कारण आमच्या इकडच्या भागात अजूनही बहुरुपी फिरतात. ते येतातच आमच्या इकडे. मग मी लक्ष दिलं नाही जास्त.)

नवर्याला विचारलं त्यांनी- काय सोशल डिस्टंसिंग वगैरे?

त्याने दाखवलं बोटानेच- ते काय- आडवं टाकलंय ना टेबल, इथे सॅनिटायझर आहे वगैरे आणि पार्सल सेवा आहे, इथे आम्ही दोघंच तर असतो.

तो मनुष्यः बरं बरं, मास्क?

नवर्याच्या चेहर्यावर होताच. माझ्या नाहीच. गॅस समोर तर मला शक्यच होत नाही नुसता अडकवणं सुद्धा. गरम गरम होत राहतो गळा. पण त्यांनी काही विचारलं नाही. फक्त सगळीकडे पाहिलं आणि मग म्हणाले:-खरंच आहे का मॅजिक पहायला पाहिजे एकदा..

नवरा: अहो, आत्ता घ्या, देउ का पार्सल?

ते: नाही, परत येइन मी घ्यायला.

नवरा: नक्की या

ते: येणार येणार. मॅजिक पहायला.

मी विचार करतेय, नवरा इतका का सांगतोय या बहुरुप्याला? नेहमीच तर येतात इकडे हे लोक.

त्या माणसाची पाठ वळल्या वळल्या मी काही बोलणार तेवढ्यात नवरा सुसाटत माझ्या दिशेने आला, डोळे वटारुन. मी आपली- 'आता मी काय केलं मोडमध्ये उभी'.

नवरा: ते बघ, बहुरुपी नाहीये तो. खराखुरा कॉर्पोरेशन चा इन्स्पेक्टर आहे. हुश्श. गेला बाबा, नाहीतर त्याच्यासमोर बोलली असतीस काहीतरी.

पाहिलं तर खरंच, नव्याकोर्या कारमधून कॉर्पोरेशन चे लोक खरंच फिरतायत तपासणीसाठी. आमच्या लेन मधली इतर दुकाने जी. एस. टी. विरोधात बंद. त्यामुळे त्यांना आम्हीच एकटे सापडलो. सगळ्या आयुधांसहित होतो, समोरच होतं सगळं सॅनिटायझर, साबण, एप्रन, एक नाही दोन.सारंच.. म्हणून गेले.

गंमत जाउदे... त्याहीपेक्षा हा कोरोना जाउदेत, नाही का?


 

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

 

#आजकाग्यान

एक महर्षी आले होते आज कॅफेत. नवीन चालू केला का व्यवसाय? आधी नोकरी करत होतात का? वा वा, स्वतःचा व्यवसाय केलाच पाहिजे- वगैरे झाल्यावर एक ब्रम्हवाक्य ऐकवलं मला त्यांनी-

"तसंही काय हॉटेल टाकायला (टाकायला????? अहो चालू करायला म्हणा ना. टाकायला काय? उचलून फेकायचं आहे का ते? (हे मनातल्या मनात मी)) लागतंच काय? घरी किराणा भरतो तो इथे भरायचा. चव मेंटेन केली की आहेच काय यात?"

मी- बरोब्बर आहे काका तुमचं. एकदम. (इथे काहीतरी पुढच्याच्या डोक्यात फेकून मारलंय असं दाखवणारी स्मायली नाहीये का हो?)


 

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

 

उगीच आपलं-

आज Maya Dnyanesh ची त्रिपुरसुंदरी ची पोस्ट वाचली. भन्नाट पाककृती. 👌👌त्यावरून मला काय आठवावं?

लहान असताना पेपरमध्ये बातमी आली होती. दक्षिणेकडे कुठल्यातरी राज्यात उत्खनन करताना एक मोठा चमचमणारा दगड सापडला. फार चर्चा झाली त्याची आणि नंतर तो तपासला तेव्हा कळालं की अतिशय मौल्यवान असा माणिक होता तो- आपल्या पाटा वरवंटा मधल्या पाट्याच्या आकाराचा आणि त्यातून मोठा होता तो. दैवी वगैरे अशी जाहिरात पण केलेली त्या माणकाची. पुढचं मागचं काही माहीत नाही मला😢.

पण असं वाटलं की ती अन्नपूर्णा महादेवाला जेव्हा काही करून वाढत असेल तर तो असाच त्रिपुरसुंदरी अशा अप्रतिम नावाचा आणि चवीचा पदार्थ असेल. सालंकृत अशी ती सौंदर्याची सम्राज्ञी माणकाचा पाटा, पाचूचा वरवंटा आणि त्यावर भिजवलेला सुकामेवा वाटून त्याची पुरणपोळी ती करत असेल आणि महादेव कसले खूष होऊन ती खाऊन तृप्त होत असतील ना...

जय सोमवार!!

जय महादेव!!

आणि जिच्यामुळे हे असलं काय काय आठवलं ती जय माया. तिच्या पोस्टची माया माझ्यावर पडल्याने ही पोस्ट😊


 

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...