लहानपणी सगळीच मजा असते नाही? तेव्हाही टेन्शन असतंच त्या त्या वयानुरूप,पण एकूण जबाबदारी नसल्याने मजा जास्त![]()
तेव्हा नवरात्र आलं की आम्हाला वेध लागायचे तेच चतुः शृंगी जत्रेचे. तशीही ही देवी अगदीच जवळ आम्हाला. त्यामुळे कधीही जाऊ शकायचोच. पण जत्रा ती जत्राच.
पितृपंधरवड्यात या देवळाची मस्त रंगरंगोटी व्हायची, यावर्षी कसे कसे कार्यक्रम होणार मंदिरात याचे रकानेच्या रकाने वर्तमानपत्रामधून छापून यायचे. आजूबाजूची देवी मंडळे देवीला तोरण घेऊन कधी जायचं याच्या चर्चेत आणि तयारीत असायची. आम्ही चिल्ली पिल्ली यावेळी जत्रेत काय असेल आणि आपल्याला कसला हट्ट केला तर चालू शकेल या गहन चर्चेत गुंग असायचो आणि आमच्या आयाबाया कितव्या माळेला ओटी भरायला जायचं ते ठरवत असायच्या. अर्थात आयांबरोबरची ट्रिप पहाटे असायची. एकदम तीर्थयात्रा. पवित्र![]()
मग रोजच्या गप्पा- माझे आजोबा बघून आले सुद्धा. देवळाला रंग लावलाय. जत्रेतली सगळी मोठी मोठी खेळणी आली सुद्धा. खाली दुकानं तयार व्हायला लागली. मग दुसरा अजून काही सांगणार. मन त्या जत्रेतच सगळ्यांचं.
होता होता खरंच नवरात्र सुरू होई. पहिल्याच दिवशी पहाटे पासून दरवाज्यावरून तोरणं घेऊन जाणाऱ्या मिरवणुका दिसायला लागत. अंबाबाईचा उदो उदो, जगदंब, जय भवानी अशा ठराविक आरोळ्या, लेझीम आणि ढोल पथक, असं ठराविक असे. पण ते पाहिलं की नवरात्र अंगातच यायचं आमच्या. एकदा आई आणि नंतर बाबा यांच्यामागे टुमण लावायचं, कधी जायचं दर्शनाला ( जत्रेला म्हणायचं नाही. अपरंपार भक्ती, यू नो
)
एकदाचं आया मंडळींचं ठरायचं. उद्या पहाटे 4 वाजता जायचंय हं दर्शनाला, लौकर झोपा- ही घोषणा झाली की अर्धी लढाई- नाही पाव लढाई जिंकलीच. उरलेली पाऊण बाबांबरोबर .![]()
लै टेन्शनच काम त्यांना पटवायचं म्हणजे!!!
दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता आम्ही 10- 12 मुलं आणि त्यांच्या आया असे चालत निघायचो चतुः शृंगीला. 25 मिनिटे जास्तीत जास्त. आयाबाया ओटीच सामान, साडी, खण याबरोबरच एखादा बिस्किटचा पुडा, पाण्याची बाटली आमच्यासाठी घेऊन चालायच्या. आत्तासारख्या बांधीव पायऱ्या नव्हत्या तिथे. टेकडीसारखं रूप. त्यामुळे काही पायऱ्या अगदी उंच आणि काही अगदीच लहान होत्या. इतक्या पहाटेही रांग असायची बायकांची. खालची दुकाने हार, गजरे, वेण्या, साखरफुटाणे, पेढे नाहीतर साड्या, खण, नारळ विकत असायची. वर गेलो की मात्र मजा. सगळीकडे धुपाचा मस्त दरवळ, धूर सुद्धा असायचा. देवीसमोरच्या सिंहापुढे होम असायचा. तिथे कापूर लावून ठेवलेले. आणि त्याच्या बाजूने एक पुरुषांची, एक स्त्रियांची दर्शनरांग. आणि मध्ये अंगात येणाऱ्या बायका आणि पुरुष!! मी आणि आणखी एक मैत्रीण या प्रकाराला घाबरून भोकाड पसरायच्या बेतात आणि बाकीची मित्रमंडळी कौतुकानं कोण कसं घुमतंय हे पहाण्यात आणि त्याच्या चर्चेत मग्न. तेवढ्यात तिथले एक गुरुजी पुढे यायचे आणि अंगात आलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर हलकीशी चापट मारून- हं, बास. शांत व्हा म्हणायचे. ताबडतोब त्यांचं ऐकून देवी जायची आपली ![]()
. पण ते दिसायचे फार छान. सोवळं नेसून, गोरेपान, नारदमुनींसारखा डोक्यावर जटाभार, अत्यंत मितभाषी आणि सगळ्या देवी लोक्स ना एका टपलीत पाठवून देणारे प्रचंड शक्तिशाली![]()
आवडायचेच. पण ते नसतील तर आमची घाबरगुंडी. मग घरी आल्यावर काका -त्या बायका जशा घुमत तसा आमच्यापुढे घुमून विचारायचा- खेळतेस???? बाबो... रडून रडून पुरेवाट. असो.
चतुः शृंगी देवी पाहिली आहेत तुम्ही? फार गोड, प्रेमळ आजी दिसते ती. नवरात्रात तर अशी तेजाळते की बस, पहात रहावं. तिचं दर्शन घेऊन वर डोंगरावरून प्रदक्षिणा झाली की घरी.
आता वेध जत्रेचे. ते रात्रीच जायचं. आणि आपापल्या कुटुंबाबरोबर. कधीतरीच सगळे मिळून गेलो असू. मग जो कुणी पहिला जाऊन येईल त्याचा सोसायटीत भावच वाढायचा. त्याने घेतलेल्या वस्तू बघायच्या आणि घरी जोरदार हट्ट करायचा, इतकाच प्रोग्रॅम. तो मेरी गो राउंड मध्ये बसला, त्याने चंद्रावरचा फोटो काढला, त्याने बुढढी के बाल घेतले, त्याने पिसांची टोपी घेतली-- मला पण![]()
एवढाच हट्ट.
एकदाचे बाबा कुठून कुठून रस्ता काढून ऑफिसमधून यायचे. कारण बरेच रस्ते आमच्या घराकडे येणारे बंद असायचे दुपारपासूनच. ते आले की काय तो मस्का- बाबा चहा आणू? बाबा बिस्कीट देऊ? बाबा, तुमचे कपडे काढून ठेऊ कपाटातून? एक नाही दोन![]()
आई- बाबा एकमेकांकडे पहात हसत बसायचे आणि आम्ही ओल्या चेहऱ्यावर पावडर थापून, नवे कपडे घालून नमुना दिसत असायचो.
एकदाचे जत्रेत पोचायचो. जिकडे तिकडे पोलीस. कुठलातरी सोन्या/ सोनी हरवल्याच्या माईकवरून घोषणा असला माहोल. संध्याकाळच्या अफाट गर्दीत कधीच दर्शन घेतलं नाही. तेव्हा फक्त जत्रा. नुसता लोकांचा महापूर . त्यात आम्ही घेणार काय तर त्या टिकटिक वाजतात त्या पत्र्याच्या टिकटीक्या, रंगीबेरंगी पिसांची टोपी मला आणि जरीची- हे मुलांच्या भाषेत. खरी तर जिलेटीन पेपर लावलेली पुठ्ठ्याची टोपी- अगदी तुरा वगैरे असलेली भावाला, रबरी चेंडू, ज्यात रात्री लाईट चमकायचे, पुढे फुगा असलेल्या अशक्य वाजणाऱ्या पिपाण्या, पुढे कधीच घालणार नाही असे कानातले
, बुलेट वरचा अर्जंट कलर फोटो आणि वेगवेगळे खेळ. एकदाचं हे सगळं झालं की खालूनच देवीला नमस्कार आणि खादाडी चालू. कधी पावभाजी तर कधी भेळ वगैरे. हजारी खर्च नव्हतेच, पण समाधान लाख काय कोटीमोलाच होतं.
नंतर कोजागिरी पर्यंत याच साध्या खेळण्यांवरून भांडणं सोडवण्यात, नाहीतर त्या टिकटीक्या आणि पिपाण्या वाजवण्यापासून दूर करण्यातच आमच्या सगळ्यांचे आई बाबा वैतागून गुंतलेले असायचे.
दर वर्षी न चुकता हाच अजेंडा.
आज सकाळी गेले तर मंदिर बंद, खाली लाईव्ह दर्शनासाठी मोठा स्क्रीन, 4 पोलीस, 10 माणसं दर्शनाला.
काळजातली कालवाकालव म्हणजे काय ते सकाळी कळलं राव.
हरवलंच ते सगळं.![]()
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा