आजकाल हे पात्र आणि आम्ही, कमीच भेट होते. पण मध्ये एकदा भलताच ताण आलेला आमच्या मैत्रीत.
माझ्या वडिलांना वयोपरत्वे अजिबात गडबळ गोंधळ सोसत नाही. म्हणजे आधीपासूनच नाही आवडत त्यांना. आणि पन्या चं वागणं याच्या बिलकुल उलट. तिचं वयही लहान, ती तरी काय करणार?
एका दुपारी ती आणि तिचं मित्रमंडळ कर्कश्श आवाजाट किंचाळत, ओरडत खेळत होते. ते माझ्या बाबांना असह्य झालं आणि ते तिला भरपूर रागावले. बाकीची मित्रमंडळी गेली पळून. मग तिच्या पपांनाही माझ्या बाबांनी सांगितलं- ही किती दंगा करते ते. मग मुकेश ही घरी ओरडला तिला. झालं. तिचा इतका मूड गेला आणि आमच्याकडे बघेनासं झालं पाखरू. आम्हालाही करमेना. मी तिला एकदा समजावलं. की आजोबा आजारी असतात ना, त्यांना आपला आरडाओरडा सहन नाही होत. त्रास होतो त्यांना. आणि कधीकधी आजोबा ओरडले तर काय झालं? आपण असं चिडायचं नाही. ते विसरले सुद्धा. मला पण ओरडतात आजोबा, काकाला सुद्धा. पण आम्ही चिडतो का? वगैरे वगैरे. तेव्हा तिने ते छान ऐकलं. पण तिचं येणं कमीच काय- जवळ जवळ बंद्च झालं.
हे अगदी त्रासदायक झालं आम्हा दोघांना. कोंडी फोडायची कशी? ही ठकी खिडकीतून पहायची. बोलावलं तर नको, मी नाही येत म्हणून पळून जायची. आम्ही घरी जायच्या वेळी तिथे घुटमळायची, पण आम्ही आलो की धूम ठोकायची. नवरा म्हणायचा.. बोलेल गं. तिला तिचा वेळ देउ. लहान आहे ती. विसरेल.
माझी नुसतीच तगमग. मी बाबांनाही म्हणाले- तुम्ही खूप ओरडला असणार तिला एकटीला. फार दुखावली गेली ती. आता तेही गप्प.
अरे देवा.. पण नवरा अगदी शांत होता. तो म्हणाला, काही झालंय असं दाखवू नको ना. चेहर्यावर बारा वाजलेले पनीला कशाला दाखवतेस? जसं बाबा चुकलेत, तसं तिचंही चुकलं आहेच. भले ती लहान आहे. एक लहान आणि एक मोठं यात आपण पडायचंच नाही. नेहमीसारख्या हाका मारायच्या तिला, घरी नाही आली तर बाहेर गप्पा मारायच्या. खेळायचं. निदान तसा प्रयत्न करायचा. मी म्हणाले- अरे बरोबर आहे. पण मी किती समजावलं तिला- पण पठ्ठी आली नाही. तो म्हणाला येइल. म्हणजे येइलच.
तो मस्तपैकी आम्ही आलो की तिला हाक मारायचा- काय पन्या? कशी आहेस? काय करतेस? मग आधी छान आहे पासून दुसर्याच दिवशी काका, उशीर का झाला तुम्हाला आज? हॉटेल मध्ये खूप काम होतं? इथपर्यंत प्रगती झाली. तिसर्या दिवशी काकाच्या अंगावर उड्या मारुन मारुन खेळून झालं. पण हे घराबाहेर. घरात नाहीच ![]()
नवरा आपला खेळता खेळता तिला कान पिचक्या देत होता. आणि ही पण शहाणी त्याच्याबरोबर एकदम नीटच वागत होती. त्यात आजोबांवर मी चिडणार नाही. घरात सतत उड्या मारुन त्रास देणार नाही, ते आजारी असतात म्हणून झोपलेले असतात वगैरे सगळं सगळं मान्य झालं.
आता यात माझा रोल शून्य. मी आल्या आल्या घरात काही काम करायला जाणार आणि चुकून ते नसलं तरी मला नवर्या इतका पनीशी मोकळेपणाने संवाद साधता येइना. मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं.. ही इतकी दुखावली गेली की हिचा दुरभिमान आहे या वयातला? इतका १० दिवस अबोला ही ठेवू शकते? नवर्याशी बोललं की तो फक्त हसायचा. आता बोलतेय-खेळतेय ना माझ्याशी? येइल ती. अगं तिला एकटीला बाबा आणि तिचं घर दोन्हीक्डून ओरडा बसलाय. नको काळजी करूस.
मग दोन दिवसांत माझ्याशी पण बोलायला लागली. म्हणाली- काका छान आहे. पण तू कित्ती शिष्ट आहेस ग आत्या? म्हणून मी तुला शिक्षा दिली. कळलं? म्हटलं बरं बाई.
मग आली संक्रांत. त्या दिवशी लवकर घरी गेलो. संध्याकाळी ६ च्या सुमाराला पन्या नामक फुलपाखरू आलं तिच्या मैत्रिणीला घेउन. चक्क घरात. दोघी जणी छानशा डिझायनर सूट मध्ये. मात्र नटलेल्या स्वतःच्या स्वतः. ओल्या गोर्या चेहर्यावर थापलेली पावडर- म्हणून तिचे गोल गोल दिसत होते पांढरे चेहर्यावर. मम्मीची लिपस्टिक ओठांचे काठ सोडून गालापर्यंत धावली होती. तसंच काजळ मोठ्ठं फिसकटून डोळ्याबाहेर..
एकूण बघूनही इतकी मजा वाटत होती.. ते तिला कळालंच. म्हणाली, मी छान दिसतेय ना आत्या? मी अगदी आलिया भट सारखी दिसतेय. मी पाहिलं आरशात. म्हटलं अगं कतरीना होतीस ना तू? तर म्हणाली ते जुनं झालं. आता मी आलिया भट सारखीच दिसते सेम. मला माहीत आहे. आम्ही दोघे हसत बसलो. तिला आणि तिच्या मैत्रिणीला तिळ्गूळ दिला. मग अगदी खाली वाकून नमस्कार केला दोघींनी.
"तिळगूळ की वडी तो एक्दम खमंग बनायी है तुमने आत्या" असं सर्टिफिकेट मोठ्या मनाने मला देउन झालं. मग म्हणाली- आत्या- आजोबांना देउ का ग तिळ्गूळ? म्हटलं दे की गं.तर म्हणाली- तू सांगशील त्यांना मी आलीये? लगेच अॅक्टिंग करुन - पनू आलीये कित्ती दिवसांनी- हे मोठे डोळे करुन- असं सांग हं.
मी बरं म्हणून आत गेले. बाबांना सांगितलं आलिया भट आलीये हं तिळगूळ द्यायला तुम्हाला.. उठा. तर बाबा इतक्या गडबडीत उठले- आली का पनू? ये ये.
पन्या माझ्या कानात- अगं आत्या, ओरडले नाही आजोबा. देऊ तिळगूळ? मी काही म्हणायच्या आत बाबाच म्हणाले- पन्या, अगं मी मोठा ना? मी तुला देणार तिळगूळ. मग खूश. दोघींना बाबांनी तिळगूळ दिला- त्या जोशात बाबांना जोरात मी दंगा करणार नाही, ओरडणार नाही वगैरे हजार वचने स्वतःहून देउन झाली. बाबा हसत होते, म्हणाले पन्या- हुशार आहेस तू, छान वागायचं गं.. तर त्यांना एक फ्लाइंग किस देउन बाई हॉलमध्ये- माझ्या कानात- आत्या- आजोबा खरंच बोलले माझ्याशी आत्ता. मी म्हणाले- ते कुठे रुसले होते तुझ्यावर? तूच रुसली होतीस. मग गोड हसून झालं. तेवढ्यात तिचे दोन मित्र आले. आमच्या घरात तिला पाहून-जोरजोरात-
"आलिया रे आलिया, तुझको मिला कालिया, हम बजाये तालिया" असलं अगम्य गाणं टाळ्या वाजवत तालासुरात म्हणून तिला चिडवून झालं.
झालं, पन्यामॅडम ची सगळी वचनं गेली वाहून. खच्चून ओरडत मानव, ओंक्या, बघतेच तुमच्याकडे.आत्या, तिळगूळाची डबी नंतर नेते. इथंच राहूदेत म्हणून गेलं पात्र पळत.
बाबा म्हणाले- पनी रे पनी.... ही कधी सुधारणार म्हणून नाही. वादळ नुसतं. पण च्यायला आली तर किती छान वाटलं ना?
आम्ही दोघे- चला, झालं सुरळीत सगळं.