सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

 #पिंपळपान: जुन्या मस्त आठवणी

आत्ता कसला बेदम पाऊस पडतोय ना... मग माझं मनपाखरू लगेच उडत जातं कुठेही. त्याला काय.. मास्क लावता जायचं पटापट.

तर मी आणि माझी सिनिअर ( आणि मैत्रीण पण) गेलो होतो कॅम्प मध्ये एका ठिकाणी ऑडिटला. असलाच बेदम पाऊस यायला लागला. तोही वळवाचा. आमच्याकडची रेनकोट वगैरे शस्त्रास्त्रे अर्थात घरीच. 😊आम्ही जोवर त्या बिल्डिंगमध्ये आत होतो, तोवर काही कळालं नाही. नेहमीप्रमाणे पाहिले चार थेंब आल्या आल्या लाईट गेलेले होते. खूप अंधार झाला आणि आम्ही त्या जुन्या जिन्याने खाली आलो. पहातोय तर काय, सगळीकडे इतकं पाणी वहात होतं की बास. माझी लुना- ती अर्धी पाण्यात. तेव्हा तीही नवीन. ती पाण्यात बुडतेय म्हणून जीव वरखाली. पाऊस तर थांबेचना. शेवटी आम्ही भिजत जायचं ठरवलं😢. करता काय. त्यात आमच्या दोघींचंही त्या भागाचं ज्ञान केवळ अगाध होतं. गल्लीबोळ अजिबात माहीत नव्हते आणि खूप पावसाने एका बिल्डिंगचा भाग पडला म्हणून मेन रोड पोलिसांनी बंद करून टाकला होता. त्या इतक्याशा गल्लीत नुसता गोंधळ माजलेला ट्रॅफिकचा. त्यात पाऊस म्हणजे बदाबदा. निघालो दोघी त्यातच. लुना हातात घेऊन. ती चालू व्हायच्या शक्यताच संपल्या होत्या. रस्त्यावरचे लोक जसे जातील तशा आम्ही पुढेपुढे जात राहिलो. यात टेन्शन माझ्या गाडीचं आणि ऑफिसच्या फाईलचं. आम्हाला आमच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. सगळीकडे अंधारगुडुप, खूप गर्दी, कसाही जाणारा ट्रॅफिक, वरून कोसळणारा पाऊस आणि लुनासकट अडीच फूट पाण्यातून चालणाऱ्या आम्ही. वा.. काय सीन होता. एकदा मैत्रीण लुना धरणार आणि मी फाईल, तर एकदा ती असला कारभार. आईशप्पत, इतके हात भरून आले होते आणि दुखायला लागले होते की बास. दीड तास अशा चाललो. त्या ट्रॅफिकच्या असामान्य वेगात हेच होणार होतं. आणि अचानक मला एकदम युरेका.. झालं. एक नातेवाईक आणि ऑफिसमधला सिनिअर इथे जवळच तर रहात होता. बेस्ट, ताबडतोब नव्या जोमाने गाडी ढकलत गेलो त्याच्याकडे. तर हाय रे कर्मा.... त्याच्या घराला कुलूप. मग ठरवलं, शेजारच्यांची बेल वाजवून त्यांना सांगायचं, गाडी लावून निघायचं. तर त्या शेजारच्या काकूच बाहेर आल्या. आमचा अवतार पाहून त्यांनी आधी आत घेतलं आम्हाला, केस पुसायला टॉवेल वगैरे देऊन मस्त आलं घातलेला गरमागरम चहा बिस्किटे दिली. मग आमची गोष्ट ऐकून म्हणाल्या, लुनाची किल्ली पण दे, मी मिलिंदला सांगते, तो उद्या ऑफिसला येईल घेऊन ती. चालू पण करेल ना तो... आम्ही अत्यानंदाने ती दिली, लुना लावली आणि बाहेर आलो. चुकून एक रिक्षाही मिळाली आणि आलो घरी आम्ही.

दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो आणि सगळी गोष्ट, मिलिंदच्या शेजारच्या काकू किती छान वगैरे सांगून झालं. मिलिंद काही दिसेना. मग थोड्या वेळाने आला तोच रागारागाने बघत आला माझ्याकडे. " घ्या बाईसाहेब तुमची लुना. चांगली घासूनपुसून आणलीय." असं म्हणून वैतागून बसला. मी म्हटलं अरे काय झालं पण? तुला त्रास दिला मी, पण करू काय? तर म्हणाला अग, त्रास काय,तुला नेहमी सांगतो ना मी, आमच्या शेजारीच एक खडूस कुटुंब रहातं, त्यांच्याकडेच जाऊन चहा प्यायलीस होय? वर त्यांच्या कडेच किल्ली ठेवलीस. मी म्हटलं, त्या होत्या त्या??? तो ओरडला.. मग.. आता जन्मभर ऐकवतील त्या. बरं, मला सांग, ती लुना खेचत कशाला आणलीस? सायकल करायची ना तिची.. आम्ही दोघी प्रश्नार्थक...

परत ओरडला- अग बाई, लुनाला खाली बटन असतं ना, सायकल करायचं, ते दाबायची पद्धत असते आपल्यात. चक्रम पोरी- एवढी खेचत आणली खड्ड्यातून की 4 पंक्चर आहेत तिला. आणि कोण बघणार होतं तिकडे तुमची फाईल लगेच? ठेवायची ना तिथेच...

आम्ही दोघी बिच्चार्या...😢😢

बाकी सगळं ऑफिस खदाखदा हसत होतं..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...