माझ्या वडिलांनाही एव्हाना कळलच होतं की 4 ते 6 धुडगूस टाइम आहे. त्या दिवशी माझे बाबा दुपारी
4 वाजायला 10 मिनिटं असताना मला सांगत होते- दरवाजा उघडून ठेव. आता येईलच ती चिमणी 10 मिनिटांत.
मी हो म्हणायच्या
आधी खिडकीतून आवाज- येईलच काय? आलेच मी. आमच्याकडे 4 वाजलेसुद्धा. उघडा आता दार
ती आली आणि पत्त्यांचा कॅट घ्यायला टीपॉय कडे गेली.तसा नवरा म्हणाला- पन्या,
आज नको ग पत्ते..
सारखा काय मुंगूस? मग म्हणाली आपण जोडपान खेळू. पंजीला पंजी, एक्क्याला एक्का असं जोडायचं फक्त. सोपं आहे. येईल तुम्हाला
नवरा म्हणाला- हो का? पण मला पत्त्याचा कंटाळा आलाय.
पन्या - मग दगड का माती, लंडन लंडन नाहीतर इष्टोप पालटी खेळूया.
नवरा- नको ग, तुला अजून काही येत नाही का?
पन्या: मला योगा येतो. करून दाखवू? आमच्या टीचर मला good girl म्हणतात. करू????
नवरा- yessss, सुखावून बेडवर पसरली स्वारी
पन्या: काका, उठून बसा. आत्या तुम्ही बसा त्यांच्या
शेजारी, आजोबा तुम्ही तुमच्या बेडवरून पाहिलं तरी चालेल.
झालं, बैठकीची व्यवस्था लावून मॅडम धडाधड आसनं करायला लागल्या. छोटी आहे, अंग सुंदर वळते. आसनं झाली,आम्ही पण गुड गर्ल म्हणून सर्टिफिकेट देऊन टाकले. मग कोलांट्या उड्या चालू झाल्या. टकळी या सगळ्यात चालू च. आलिया नुसती अभ्यासात हुशार आहे, तिला आसनं येत नाहीत, करिश्मा ला skipping rope येतच नाही इ.इ.
मग मीच म्हणाले- पन्या गोष्ट येते का सांगता तुला?
पन्या- हो ssss येते की. लाकुलतोल्या ची सांगू?
आम्ही मुद्दाम हो म्हणालो. पन्या डॉन उत्तम बोबडकांदा आहे. या गोष्टीत तर लाकूडतोड्या, कुर्हाड हे कितीतरी वेळा म्हणायला लागणार होतं, मग तिला चिडवायचे असा प्रोग्रॅम होता, तो बऱ्यापैकी सफल झाला. मग टोपीवाला आणि माकडाची गोष्ट मधेच चालू झाली आणि घोषणा झाली- बोअर आहेत या गोष्टी. मला नाही आवडत. मी तुम्हाला पिच्चर ची स्टोली सांगू?
आम्ही- चालेल. कुठला पिक्चर??
आम्ही तिची कोलांटी उडी संपताना जे ऐकलं ते असं काहितरी होतं- कंचनाट्रीमाम्हाकालिकाचिमिटका ssss
माझे वडील बाहेरच आले- पन्या, उठून बस, काय झालं? ठसका लागला का?
आणि आमच्याकडे वळून- नका रे तिला काहीतरी सांगू करायला..
पन्या कोलांट्या उड्या बास.
पन्या: आजोबा, मेरको कुछ नै हुआ.
बाबा बरं म्हणून आत गेले.
आम्ही विचारलं- हा कोणता सिनेमा?
पन्या- सांगितलं की वर.
आम्ही- अग नाव परत सांग.
पन्या- ओरडून- कंचना 3- मा महाकाली का चमत्कार
आम्ही दोघे: असा सिनेमा आहे?
पन्या- मग? भुताचा आहे. गूगल करा मग सापडेल.
आम्ही थक्क- तू भूतांचे सिनेमे पहातेस? भीती नाही वाटत?
पन्या- नाही. आपण नाई घाबरत कोणाला. पण पिच्चर पाहिला तर रात्री गादीत सू झाली मला
आमची हसून हसून मुरकुंडी वळली. तर हिने ताबडतोब सांगितलं- बच्चे ऐसा करते है, उसमे क्या इतना हसनेका?
मग गप्प बसलो आम्ही आणि मोठे डोळे करून स्टोरी चालू झाली.
त्या पिच्चर मधल्या गावात खूप हादसे होत असतात आणि खूप अनहोन्या होत असतात म्हणून लोक सदम्यात असतात.
आम्ही- अरे बापरे- डेंजर आहे
सदमा काय, हादसे काय...
पन्या- शू ssssss, भुताची गोष्ट सांगतेय मी.
क्रमशः
टीप: पन्या डॉन ने आवरलं नव्हतं म्हणून फोटो काढू देत नव्हती. शेवटी एक कसाबसा काढलाय. आपण नाही घाबरत कुणाला म्हणताना. पण त्याची क्वालिटी नका पाहू प्लीज.