#पन्या:
आमची पन्या खेळायला येते ती मात्र मास्क,शूज सगळं व्यवस्थित घालून. कोरोना आलाय आपल्याइथे इंड्यात- माहिते? मास्क आणला का तुम्ही? दाखवा मला... अशी आमची झाडाझडती चालू.
तर त्या दिवशी तिने एक नवीन मास्क घातला. सुंदर डिझाइनचा. आल्या आल्या काकांसमोर उभे राहून मला नवीन मास्क आणला, तुम्हाला नाही असं वेडावून दाखवत नाचून झालं. हा म्हणाला- तू टीव्ही वर पाहिलं नाहीस का? असले मास्क चीन मधून घाणेरड्या कापडाचे येतायत. आम्ही नाही घालत बाबा असले मास्क. पहिल्यांदाच विचारात पडली ती. माझा मास्क चांगला आहे असं क्रमाक्रमाने उतरत्या आवाजात सांगून झालं तिचं काकांना. पण काका चिडवत बसला तिला. तशी सरळ उठली आणि दुसरा मास्क घालून आली. आम्ही म्हटलं हा कोणता? तर म्हणाली तो दिला टाकून. मी पप्पाना नवीन घ्यायला लावला . आम्ही खिडकीतून पाहिलं तर मुकेश- आमचा मित्र- तिचा पपा आमच्याकडे- काय राव खर्चात पाडलं मला असा पहात होता
इकडे हिचं उड्या मारणं चालूच होतं. तिचे केस इतके सुंदर , मुलायम,रेशमी आहेत की बास. मी म्हटलं, केस किती छान आहेत पन्या तुझे... तर लगेच थांकू म्हणून आपल्याकडे एक फ्लाईंग किस.
हा म्हणाला तुझा हेअरकट कोणता आहे ग?
पन्या: डोक्याला हात लावून- अहो काका- बॉयकट आहे हा. काय हो, इतकं पण नाही माहीत तुम्हाला...
काका- पण तुझा हेअरकट करत कोण आता? लॉकडाऊन आहे ना?
इथं एक सांगायचं राहिलं. तिच्या पप्पाचं सलून आहे. आमच्या घरातली मेम्बरं अर्थातच तिकडे असतात कटिंगला.
पन्या: अहो, पप्पा. त्यांनीच केला. तुम्हाला नाही माहीत? ते कटिंगर आहेत.
आम्ही दोघे एकदम: काय आहेत?
पन्या: दोन्ही हात पोटाशी घेऊन, जोरात किंचाळून.. अहो कss टिं ss ग ss र. जो माणूस आपली कटिंग करतो त्याला कटिंगर म्हणतात. काय हो तुम्ही? इतकं पण नाही माहीत.
आम्ही प्रचंड हसलो, पन्याही आम्हाला एक नवीन शब्द शिकवला म्हणून तेवढीच हसली. असलं गोड आहे ना सगळं...
आमच्या परिसरात कुणी कोरोना बाधित अजून तरी नाही सापडलं. पण आमच्या इथल्या 3 शाळा कवारंटाईन केलेल्या लोकांसाठी वापरत आहेत त्यामुळे घरासमोरून सतत ambulance आणि pmpml च्या या लोकांना घेऊन येणाऱ्या बसेस ची वर्दळ आहे. मग ही पन्या आम्हाला ब्रेकिंग न्यूज देते.
आत्या- 5 positive निघालेत आज कोरोना चे. मेलोच आता आपण.
माझे वडील- बघ मग पन्या, घरात बस तू आता. लॉक डाऊन आहे ना...
पन्या- आजोबा, मी घरातच आहे की.
आजोबा भडकून- अग, हे माझं घर आहे.
पन्या शांतपणे- माहीत आहे मला. लॉक डाऊन म्हणजे घरात बसा. कुणाच्या ही चालतं. मला माहीत आहे.
आम्ही तिघे- अर्थात निःशब्द. नवीन अर्थ कळला ना..
पन्या मॅडम विजयश्री साजरा करत त्यांच्या घराकडे...
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा