सोमवार, २५ मे, २०२०

 

#पन्या

तर अशी ही आमची पन्या डार्लिंग रोज खेळायला यायलाच लागली . बरं बिनधास म्हणते कशी- बरं झालं तुम्ही दोघे मोकळेच आहात. नाहीतर मला खेळायला कोण ना?

हा वैतागून तिला म्हणाला, अग पण तुझे मित्र मैत्रिणी कुठे आहेत? त्यांच्या बरोबर खेळ की..

तर ठसक्यात सांगून झालं की ही वेळ तुमच्या बरोबर खेळण्यासाठी ठेवलीये मी.

लगेच हाताची बोटं उघडून 10 बोटं दाखवून- हे बघा काका सकाळी टेन वाजले की उठते मी. मग फटाफट अंघोळ करून काहीतरी नाश्ता करते आणि मारवाडी गॅंग मध्ये खेळते. मग ट्वेलव वाजले की घरी येते. मग दीदी आणि बाळाशी खेळते. मग जेवते आणि मम्मी आणि आजीबरोबर खेळते. मग फोर वाजले की तुमच्याकडे, सिक्स वाजले की समोरच्या मुलांबरोबर खेळते. मग घरी येऊन जेवायचं आणि पप्पांबरोबर खेळायचं, टीव्ही पहायचा आणि इलेव्हन वाजलेकी झोपायचं. बिझी असते मी. हे सांगताना मोठे डोळे, फार गंभीर काहीतरी सांगितल्याचा भाव आणि धावतपळत घड्याळाकडे जाऊन किती वाजले ते दाखवायचा हट्ट. एकूणच भारी. मधेच विचारायचं- आज माझा पफ काढलाय मम्मीने. केस चांगले आहेत ना अजून? आमची हसून हसून पुरेवाट. हो. खूप मस्त दिसतोय पफ म्हटलं की खूष.

नवर्याने विचारलं- मारवाडी गॅंग म्हणजे कोणती ग पनू?

पनू- अहो- ते शेजारचे दुकानदार नाहीत का? त्यांची मुलं. वो सब मारवाडी है (हिंदी झाडायला आवडतं तिला)

नवरा- तू तुम्हारे घर नही बुलाती क्या उनको?

पन्या- अरे उनको बुलातीच थी, पर वो मुझे टेरेस पे आने नही देते उनके. फिर मैने कॅन्सल किया. हे दोन्ही हात अजिबात नाही सारखे दाखवून- मी घेणार नाही त्यांना घरात.

नवरा- सगळ्यांच्या घरी तूच जाणार म्हणजे...

पन्या- मग? तुम्हाला दोघांना घरी न्यायचं तर मी एकटीच आले. काकू.. नाही आत्या पाणी द्या नं, तुमचे काका खूप प्रश्न विचारतात बाबा. घसा सुकून गेला अगदी.

मग पाणी पिऊन- चला मुंगूस खेळायला. काका चिडके आहेत. तुम्ही छान आहात. पण काकांबरोबर खेळायला मज्जा येते. ते पण चिटिंग करतात. मी पण . असं म्हणून स्वतःच पोटभर हसायचं.

मग ठणाणा ओरडत, नाचत, हसत मुंगूस चालू होतो. आपण हरणार असा अंदाज एव्हाना डॉनला आलेला असतो. मग सगळे पत्ते एकत्र करून, चला हा गेम बोअर झालाय. आता मी स्कीपिंग रोप आणते.

काका- तू अर्ध्यात डाव बंद केलास. मी काही उड्या मारणार नाही.

पन्या- ? नाही मारणार? बरं मग इथे बसा आणि मोजा माझया उड्या.

बसला काका उड्या मोजत. मग तिचा पाय अडकला आणि आउट म्हटल्यावर तोही गेम बंद आणि जोरजोरात तारक मेहताच्या दयाबेनच्या हसण्याची acting चालू झाली. आम्ही जे काय चाललंय ते पाहू आता. हातात तरी काये आपल्या ? असं म्हणून गप्प झालेलो.

पण माझया बाबांना आता कलकलाट अगदीच सहन होत नाही. ते बाहेर आले आणि म्हणाले- पनू मी रागवेन आता तुला. किती दंगा करतेस? कसा बेड केला आहेस? खुर्च्या कशा ठेवल्या आहेस? जमिनीवर लोळतेस कसली? देवासारखी बस जरा पाच मिनिटं.

ताबडतोब डॉन बेडवर एक पाय आणि एक पाय खाली असा साईबाबांच्या पोझमध्ये बसली. एक हात मोदकासाठी आणि एक वरदहस्त अशी पोझ घेऊन माझया बाबांकडे एकटक पहात बसली. ते निरागस ध्यान बघून आम्ही सगळेच लागलो हसायला. तशी ही खवळली आणि मला म्हणतेय- याला काय अर्थ आहे? मला गप्प बसवून तुम्ही दंगा करताय.

आणि हळूच माझया कानात- आत्या, तुमचे बाबा हसतात पण?

मी म्हणाले- म्हणजे?

पन्या- अरे यार.... मेरको लगा ये सिर्फ गुस्साच होते है

आम्ही दोघे सर्द

आणि वडील- कठीण आहे सगळं असं म्हणून आत.

पन्या- चला आता, उद्या तयार रहा. मला आता घरी खूप काम आहे. बाळाशी खेळायचं. बाय.

आम्ही- हो बॉस

पन्या- जोरात हसत - असच बोलतो तो तारक मेहता

क्रमश:


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...