Oct.7,2020
10 दिवसांचा एक प्रवास:
बरोबर 10 दिवसांपूर्वी एक फोन आला. आता डेंजर फोन असले की ते आपोआप मीच घेते. कसे कोण जाणे![]()
एक बाई होत्या फोनवर. मी कोविड पेशंट आहे, डबा हवाय मला. कितीला देता? हे अत्यंत जाब विचारल्यासारखं. मी सांगितलं. तसं अत्यंत तापटपणे म्हणाल्या- तुम्ही काहीही सांगताय. ही डब्याची किंमत आहे का? मला थोडंस विचित्र वाटलं, पण म्हणाले हो. आमच्या डब्याचा दर्जा पाहता ही योग्य किंमत आहे. त्यावर परत चिडून- तुम्हाला काय असं वाटतंय का, की तुम्ही एकट्याच काय तो डबा देता? सगळेच लोक डबा द्यायच्या आधी सांगतात - आमची क्वालिटी वगैरे. नंतर कळतं काही दम नाही त्यात.
मी- मॅडम,तुम्ही डबा घेऊन पहा इतकंच म्हणू शकतो आम्ही यावर.
मॅडम- पण काहीही पैसे सांगताय तुम्ही. 50 रुपयात डबा मिळतो बाहेर. सगळं असतं त्यात सुद्धा.
मी- ठीक आहे, आपल्याला योग्य ते करा आपण.
मॅडम- म्हणजे तुमची किंमत नाही बदलणार?
मी- नाही हो, नाही परवडत आम्हाला.
मॅडम- मला सकाळ संध्याकाळ हवाय डबा. तरीही?
मी- तरीही.
मॅडम- आणि पैसे? तोही ऍडव्हान्स लागणार असेलच तुम्हाला.
मी- हो, अर्थात. तरच घरपोच देऊ शकू आम्ही.
मॅडम- नाही, मला पटतच नाहीये हे काही. विचार करून सांगते 10 मिनिटात.
मी- चालेल.
आता हे सगळं नवऱ्याला सांगतानाही मी रडणार बहुतेक इतकं वाईट वाटत होतं. त्याला म्हटलं, अरे कसा टोन आहे त्यांचा बोलायचा? आपली आणि त्यांची ओळखही नाही, तरी इतकं उर्मटपणे कुणीच बोललं नाहीये आत्तापर्यंत.तो म्हणाला- ठीक आहे ग, असाही एक अनुभव. आता आलाच त्यांचा फोन, तर मी घेतो. तू लगेच मूड घालवून बसू नकोस.
आला तितक्यात फोन. मला उद्या सकाळ संध्याकाळ डबा हवाय. मी काही पळून जात नाही कुठे. डबा कसा आहे ते पाहून पैसे देईन. नवरा शांतपणे म्हणाला- मॅडम, आमचीही एक पद्धत लागलेली असते व्यवसायाची. आगाऊ पैसे आले तरच आम्हाला हे शक्य होईल. नाहीतर नाही. इथे कुणीच पळून जाण्याचा प्रश्न नाहीये. मग म्हणाल्या- फक्त उद्याचे पैसे पाठवीन. आवडला तर आणि तरच पुढचे पैसे पाठवायचा विचार करेन.
नवरा म्हणाला - अगदी चालेल.
दुसऱ्या दिवशी नवऱ्याने सकाळी डबा नेऊन दिला. तो परत कॅफेवर येतोय तेवढयात त्यांचा परत फोन. नवऱ्यानेच घेतला. तशा अक्षरशः किंचाळून म्हणाल्या- मी 2 डब्याचे पैसे दिलेत आणि तुम्ही फक्त एक पाठवलाय. याला काय अर्थ आहे? आणि खूप काही. त्यांचं झाल्यावर नवरा म्हणाला- मॅडम, पेशंट आहात ना तुम्ही? सकाळी आणि संध्याकाळी एकच डबा खाणार होतात का? आम्ही संध्याकाळी देऊ ना दुसरा डबा.. तशा एकदम चमकल्या आणि म्हणाल्या- म्हणजे? संध्याकाळी दुसऱ्या भाज्या? नवरा म्हणाला हो. पेशंट आहात, व्यवस्थित ताजे अन्न खा ना... तर बरं म्हणाल्या. पण तरी आवडलं तरच पुढे डबा लावेन हे सांगायला विसरल्या नाहीत.
यांचा संध्याकाळी डबा नीट गेला आणि मग रात्री त्यांचा फोन आला. जेवण सुंदर आहे हो. मी उद्या पैसे पाठवते. मी आपली धन्यवाद, ठीक आहे म्हणाले. त्यांचं बोलणं मात्र डोक्यातून जातच नव्हतं.
रात्री उशीरा त्यांचा मेसेज- मला सकाळी 2 आणि रात्री 1 डबा हवाय. आणि या डब्यांचे 10 दिवसांचे पूर्ण पैसे आमच्या खात्यात जमा. मी चक्रावलेच. पण डबा चालू झाला आणि रोज मेसेज- आज खूप आवडली ही भाजी, मी पुरवून पुरवून खातेय, अमकी कोशिंबीर आवडली इ. आश्चर्य आणि बरं एकाचवेळी वाटत होतं.
त्यात एक दिवस आमच्या एरियात पाण्याचा अतिशय प्रॉब्लेम झाला. सकाळी तर पाणी विकत आणलं. मग त्या मॅडमना विनंती केली घाबरत- की आजच्या दिवस तिन्ही डबे सकाळी देते, असा असा प्रॉब्लेम आहे. तर म्हणाल्या- द्या हो, अस काहीही नाही माझं, आम्ही घेऊ समजून. मी उडालेच ऐकताना. हा- इतका छान टोन यांचा? बरं झालं बाबा.
मग रोजचे छान मेसेज![]()
चालू झाले.
कालचा दहावा दिवस झाला डब्याचा. आम्ही संपला हं यांचा डबा आज असं बोलतोय तोवर व्हॉट्सअप आलं त्यांचं-
मी बरी झालेय ते फक्त तुमच्याकडचं जेवल्यामुळेच. माझी फार छान सुधारणा फक्त तुमच्याकडच्या डब्यामुळे झालीये. मला अशक्तपणा आहे, त्यामुळे पुढे 10 दिवस मी वाढवतेय डबा. ,आणि परमेश्वराजवळ मी आभार मानलेत आणि तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवते त्या परमेश्वराचा.![]()
![]()
![]()
ऑ? हे भारी झालं की. इतकं बरं वाटलं मला.. आणि आमचं पुढचं बोलणं नवरा ऐकतच होता. फोन झाल्यावर म्हणाला- आता रडायचं असेल ना परत तुला? मी म्हटलं का? तर म्हणे त्यावेळी त्या तशा का बोलल्या म्हणून दुःखाने रडलीस, आता त्या छान बोलल्या म्हणून पण असेलच की प्रोग्रॅम. होऊन जाऊद्या.![]()
![]()
अग, आपल्याला हे काय झालं म्हणून वैतागल्या असतील. जाऊदेत. आता छान बोलतात ना? अंत भला तो सब भला![]()
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा