शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

 

#पिंपळपान

नवरात्र आलं ना, की हटकून मला लहानपणाची आठवण येतेच. आमच्याइथे एक कुटुंब रहायचं. त्यांच्या छोट्या मुली आमच्याच बरोबरच्या.त्या दोघींची नावं चांगली सीमंतिनी आणि विलासिनी अशी सुंदर होती, पण घरातल्याच नावांनी आम्ही हाक मारायचो त्यांना. छकुली आणि बबडी. 😊😊. नंतर कितीतरी मोठ्या झाल्यावर, म्हणजे पाचवीत वगैरे असताना त्यांची खरी नावं कळल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला होता.

त्यांच्या घरी नवरात्र अतिशय जोरात, साग्रसंगीत असायचं. चंडियाग, श्रीसूक्त पठण, कुमारिका पूजन- अगदी सगळं सगळं यथास्थित. या दोघींची आई, आजी अत्यंत हौशी. त्यामुळे जोवर हे कुटुंब आमच्या सोसायटीत रहात होतं, तोवर वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून आठव्या वर्षापर्यंत दर नवरात्रात कुमारिका म्हणून मी आणि माझ्या मैत्रिणींचा मुक्काम यांच्याचकडे😊. आणि करायच्या तर इतकं सुरेख सगळं की बास. माझ्या घरी नवरात्र म्हणजे फक्त अखंड दीप आणि माळ. बाकी फार फाफटपसारा नाही, त्याउलट या दोघींच्या घरी गेलं की महालात गेल्यासारखं वाटायचं. अत्यंत सुंदर सजावट, देवघरात घटस्थापना केलेली, दोन्हीकडे दोन नंदादीप सतत तेवत असलेले. धूप, दीप,फुलं, माळा, तेल, तूप,कापूर, नैवेद्य, या सगळ्याचा एकत्रित अतिशय पवित्र सुवास,लख्ख उजळवून सजवलेले देवाचे टाक, मूर्ती, त्यांना प्रथेनुसार हळद कुंकू, चंदन, अष्टगंध, अक्षता, फुलं वाहिलेली तरीही अगदी नेटकी. देवीच्या मूर्ती ला सुवासिक गजरे- आईग.. अजून हे सगळं डोळ्यासमोर नाही, तर तो एक सुंदर सुवास पण अनुभवू शकते मी.

तर नवरात्रात बबडीची आई आणि आजी आमच्याकडे यायच्या. आईला रीतसर सवाष्ण येण्याचं आमंत्रण द्यायच्या आणि मला कुमारिकेसाठी. आजी अगदी प्रेमळ पणाने म्हणायच्या- अमुक दिवशी छान नटून ये हं आईबरोबर. मग हसून लाजत, मुरडत हो म्हणायचे मी. (मनातून तर खूप आनंद झालेला असायचा).

मग ठरलेल्या दिवशी सकाळपासून आईच्या मागे भुणभुण. चल ना लौकर, आवर की पटकन. आई हसायची. तिचं माझं आवरलं की ठरल्या वेळी जायचो बबडीकडे. तिथे माझ्या बाकीच्या मैत्रिणी पण आलेल्या असायच्याच. शिवाय छकुली, बबडी होत्याच. दारात गेलो की बबडी ची आई आमच्या पायांवर कोमट पाणी, दूध घालायची, हळदकुंकू आणि ओवाळणे हा कार्यक्रम झाला की आम्ही घरात. आईशप्पत. सेलेब्रिटी काय म्हणताय- त्यापेक्षा भारी फीलिंग. मग ती सजावट पहायची, आपल्या कडे असं का नाही करत म्हणून जमल्यास आईला तिथेच रुसून दाखवायचं, हा प्रोग्रॅम होईतो जेवायची वेळ. मग आम्हा कुमारिकांच व्यवस्थित पूजन व्हायचं, बबडी ची आई, आजी इतकं मनापासून करायच्या ना सगळं.. ते लालचुटुक फुलांचं डिझाइन असलेले पाट प्रत्येकीला, सुंदर पंचपक्वानांच ताट, छानशा महिरपी👌👌👌. आम्हाला हळदीकुंकू लावून गजरा नाहीतर फूल दिलं जायचं. अत्तर, गुलाबपाणी , असं सगळं व्हायचं. पण आमचं लक्ष यापुढे. कारण त्या दरवर्षी अगदी सुंदर फ्रॉक, खणाचं परकर पोलक, पैंजण, सुंदर कानातले गळ्यातल्याचे सेट असलं काहीतरी द्यायच्या. अगदी घसघशीत हात. ते एकदा का हातात आलं की आमचे डोळे इतके छान चमकायचे की बास. शिवाय घरातले सगळे आम्हाला खाली वाकून नमस्कार पण करायचे. हे तर कसलं भारी... . कधी एकदा जेवण होतंय आणि काय दिलं ते पहातो अस होऊन जायचं आम्हा सगळ्या जणीना . एकदा तर काकू, पुढच्या वर्षी काय देणार तुम्ही ? अस विचारून बबडीच्या आईला अडचणीत टाकलं होतं. तेव्हाही बबडीची आजी म्हणाली, अग पुढच्या वर्षी देवीच सांगते, यावेळी फ्रॉक दे- मग द्यायचं ते😊😊. हे पण फार भारी वाटलेलं. तेव्हा देव्हाऱ्याजवळ जाऊन आपल्याशी बोलतेय का ती हे पण पाहिलं होतं मी. किती तो निर्लज्जपणा- पण तेव्हा तसं काही वाटायचंच नाही..

झालं, 5 वर्षे मस्त लाड. हक्काच्या कुमारिका. मग जरा चौथीत वगैरे गेल्यावर आमचं राज्य गेलं ना, तिथे दुसऱ्या मुली आल्या छोट्या छोट्या. 😢😢असला राग आला- माझी आजी तर सांगते देवी समजतात आपल्याला आणि आता देवीच बदलतात? ये क्या बात हुई भाई?

हं,मोठ्या झाल्याचं दुःख जुनंच आहे म्हणजे...

तेव्हा फक्त आपण देवी आहोत हं, आपली पूजा होणार , मस्त लाड होणार, नवीन नवीन काही मिळणार.. कित्ती कित्ती छान.

पण आता कळतंय, कुलधर्म, कुलाचार करताना ती बबडीची आई आणि आजी काय भयानक दमून जात असतील... तरी अगदी प्रसन्न, सुंदर दिसायच्या. अतीव आपुलकीने सगळं करायच्या.

कशा या दुर्गा घरोघरी असतात नाही??

कुठल्याही क्षेत्रात असोत- नमनच!!


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...