गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

 #पन्या:

परवाच्या अचाट पावसात सिंहगड रोड म्हणजे नदीच झाली होती. म्हणून काल कॅफेसाठी दांडियात्रा होती😊. घरची काही कामे सकाळी उरकून परत आलो. गाडी लावताना कुणीतरी हाक मारली की काय म्हणून इकडे तिकडे पाहिलं, कुणीच दिसलं नाही म्हणून गाडी स्टँड वर घेताना पन्या मॅडम अवतीर्ण झाल्या. अशी काय तू आत्या? टेरेसकडे का नाही पाहिलंस? नुसती इकडे तिकडे पहाते. वर होते मी तुला हाक मारत. मी पाहिलं पन्याकडे- धावत आलेली तर लालबुंद गाल, केसांच्या झिपर्या हा शब्दच कमी पडेल असे विस्कटलेले, हात, पाय मळलेलेच, डोळे मात्र अगदी गोलगोल. आणि हावभाव म्हणजे जाब विचारल्यासारखेच. मी म्हटलं, अग तू टेरेसवर आहेस ते मला माहीतच नाही, नाहीतर लगेच मी तुला हात केला असता की नाही? मग पटलं ते.

आज तुम्हाला हॉटेल नाही? बरं झालं, चला खेळूया आपण. मग हाच म्हणाला-लगेच काय खेळूया? आधी हात पाय धू स्वच्छ.दुपारी ये चार वाजता. तर लगेच- मी स्वच्छ होऊन येते. 4 वाजता यायला आत्ता काय लॉक डाऊन आहे का? असं विचारून मॅडम त्यांच्या घरात गुप्त झाल्या. आम्ही घरात शिरून बसतोय तोवर आरडाओरडा करत, चला आले मी. ड्रेस पण बदललाय, उगीच मला ओरडू नका- हे नवऱ्याकडे पहात सांगून झालं. तो पण लगेच म्हणाला- हे काय- ही कुठली चड्डी? तर जोरात किंचाळली- ..काहीही काय बोलतोस काका- कॅप्री म्हण कॅप्री.

काका : तेच . मग काकाला खोटे गुद्दे वगैरे मारून हाहाहा करून रानटी हसून झालं. मी म्हटलं- आजोबा येतील आतून तू दंगा करायला लागलीस की. ओरडू नकोस. आणि शांत बस. तर म्हणे काही होणार नाही. आजोबा मित्र आहेत माझे.

म्हटलं: हे कधी झालं? तर म्हणाली : तुला काय वाटलं? तुम्ही घरात नसताना मी येत नाही की काय तुमच्याकडे? पण परवा मला आजोबांनी खूप प्रश्न विचारले. त्या सगळ्याची उत्तरं मी नीट दिलीत. मी हुशारच आहे.

नवरा- ते माहीत आहे. पुढे बोल.

पन्या- त्याला जीभ काढून दाखवत- मी आहेच हुशार. विचार आजोबांना. मला सगळं आलं तर त्यांनी मला एक लाडू पण दिला. आणि म्हणाले- पनू, तू इतकी हुशार आहेस ना, पण थोडंही ऐकत नाहीस माझं. आपण कुणी बहिरे आहोत का? सारखी कशाला किंचाळतेस? त्याच्यामुळे आता मी समजूतदारपणे वागायचं ठरवलंय, ते असताना.

आम्ही दोघे: हो? खरंच? तर म्हणाली हो, विचार आजोबांना. त्यांना सांगितलं मी हे, तर म्हणाले गुड गर्ल आणि छान हसले. मग आम्ही exercise पण केला.

आम्ही धन्य झालो अगदी.म्हटलं म्हणजे आता तू अगदी शांत बसणार, हो ना? तर जोरात ओरडून- आजोबा असले इथे तर. नाहीतर नाही. आमच्या दोघांचं ठरलंय. आपलं नाही काही☺. आमची हसून हसून पुरेवाट. तशी चिडली आणि म्हणाली- अग पण आत्या, तसं चांगलं वागायला मज्जाच नाही येत.😊 हे पण बरोबरच आहे, नाही का?

तोवर नवरोजी अस्वस्थ होऊन दिवाणावर आडवे झालेले. मी म्हणाले- काय झालं रे? त्याने उत्तर देण्याआधी हीच- पाठ लचकली वाटतं काकाची... पाठ दुखतंय त्याची. आणि त्याच्यावर डोळे वटारून- हो ना? कशाला करतोस इतकं काम? मग अशीच दुखते पाठ.

झोपा आता पोटावर, मी यू ठीक करते.

आम्ही दोघे:तू????

पन्या: मग? माझ्या पपांची पाठ दुखली की मीच करते दुरुस्त. आत्या, आयोडेक्स दे गं... मला येतं सगळं.

नवरा:बरं फेकूसिंग, आयोडेक्स नको, माझ्या पाठीवर पाय देतेस का खरंच?

पन्या:अरे, ये तो मेरा रोज का काम है

मी: पनू, खरंच येतो का तुला पाय देता?

पन्या: डर मत आत्या. नुसतं नाचायच असतं, मस्त डान्स करायचा.

मी: बाई , जपून, तू पडशील, आणि तू रे, तिला नीट सांग, कुठे द्यायचाय पाय ते. मी स्वयंपाक करते तोवर.

पन्या: अरे अब काका ठीक होगा, जाव तुम😊

मी किचनमध्ये गेले आणि 10 मिनिटात हजर आतमध्ये- आत्या- काका बरा झाला.

मी: हो? अरे वा, काय केलंस?

पनू: ऍक्शन सकट- काही नाही, डिस्को डान्स केला काकाच्या पाठीवर.

काका कसा आहे ती पूर्ण कल्पना असल्याने मी धावत बाहेर. काय रे- कसा आहेस?

नवरा प्रचंड प्रफुल्लित. भारी आहे पनी... बरंच वाटलं मला.

मी हायसं वाटून परत आत वळणार तोवर आमच्या बोलण्याने पिताश्री एन्ट्री घेते झाले. काय सविता? काय गडबड?

मग पन्याभाय: मी सांगते आजोबा. इथे बसा. त्यानंतर तिने मी आल्यावर टेरेसवरून कशी हाक मारली, मी कसं लक्ष दिलं नाही इथपासून काकाला कसं मीच बरं केलं हे अर्थात साभिनय सांगून टाकलं बाबांना. तो फोटो काढायला हवा होता मी. एक कौतुकभरलं म्हातारं हास्य- शांतपणे पहात बसलेलं, आणि दुसरं नाचरं, गडगडाटी हास्य😊😊.

मग बाबा म्हणाले- पनू, काकाच्या पाठीवर नाचलीस तू??? वजन किती आहे तुझं? तर म्हणाली टेन किलोज. बाबा म्हणाले- टेन?? तर म्हणाली - मग ट्वेलव्ह नाहीतर फिफ्टीन पण असेल. का डायरेक्त ट्वेन्टी आहे कोण जाणे. पण मी डान्स केला पाठीवर की बरं वाटतं सगळ्यांना. तुमच्या पाठीवर करू डान्स?? बाबा:नाही, नको नको. अजिबात नको. तर डोळे मिचकावून- मी गंमत केली तुमची आजोबा. पण मला गुड गर्ल म्हणा ना एकदा. 😊😊मग तो सोहळा झाला.

मग एकदम नवऱ्याकडे पाहून- काका, तू टीव्ही वर का नाही जात रे?

काका धसकून- एकदम टीव्ही? का ? तर म्हणे तुला मिळेल काम.

हा: कशावरून ?

पनू: त्यात काय झालं मिळायला? तू लहान पाहिजे होतास जरा, आणि चष्मा नको होता. मग तुला तेरा यार हू मैं मधल्या मुलाचा रोल अस्सा मिळाला असता. हे सांगताना चुटक्या वाजवून सांगायचं😊😊

नवरा : तेरा यार हू मैं - हे काय?

पन्या- डोक्यावर हात मारून- असा काय तू? जेठालाल नंतर लागतं सोनीवर. तू लहान असतास तर रोल तुलाच मिळाला असता.

कशाला मोठा झालास तू? गेला तो रोल

आता..

नवरा: जाऊदे , आता काय करणार आपण ना?

पन्या: फोन घे तुझा, त्यावर गुगल ला सांग, मग ते पत्ता देतील तुला, मग जा तिकडे आणि कर काम टीव्ही .

नवरा: अग इतकं सोपं आहे तर तू का नाही जात?

पन्या: भुताचा पिक्चर असेल तर जाणार मी, नाहीतर नको मला.

नवरा: मग बरोबर.

पन्या: जोरात किंचाळून- मी भूत नाहीये.. जा रे काका, सारखा चिडवतो मला, मी चालले खेळायला... आत्या, नंतर येते मी.

गेलं भूत- दिसेनास झालं एका सेकंदात.

बाबा: पनी ... पनी. कठीण पोरगी आहे😊😊


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...