प्रवास रानभाज्यांचा:
आपला स्वत:चा एक व्यवसाय असावा हे एक, आणि खाण्यापेक्षा खिलवायची खूप आवड म्हणून आम्ही दोघांनी कॅफे चालू केला. आपला चारचौघांसारखाच. आता मधेच या कोरोना नामक संकटाने सगळ्यांनाच पेचात टाकलं. मग नवीन नवीन कल्पना शोधणे – व्यवसायात टिकून राहण्याकरता- हे ओघाने आलेच. तर त्या वेळी एका मित्राने अचानक त्याच्या फेसबुक वॉल वर पोस्ट टाकली. आताच्या परिस्थितीत आपलं आरोग्य टिकविण्यासाठी नैसर्गिक, निर्विष अन्न म्हणजे रानभाज्या. त्या लोकांनी खायला हव्या. त्यामुळे मी या रानभाज्या आणून आपली एक मैत्रीण सविता देशपांडे ला देईन. तिचं हॉटेल आहे. ती या भाज्या करेल आणि तुम्ही लोकांनी तिच्याकडे ही थाळी बुक करा.
बरं हे मला काही माहीतच नाही. त्याचं मित्रमंडळ मला फोन करायला लागलं तेव्हा मी - रानभाज्या? मी? कोण म्हणालं? करणार कोण? कोण घेणार?? या मोडमध्ये होते. कुठल्यातरी एका मित्राकडून कळल की या बहाददराने माझं नाव टाकून पोस्ट केलीये. मी दुसर्या क्षणाला त्याला फोन लावून विचारलं- रानभाज्या म्हणजे काय अरे पण? तू बिनधास्त लिहितो, मला काही सांगत पण नाही. तुझ्या मित्रांना काय सांगू आता? मला कुठे येतात पण? अशा असंख्य प्रश्नांची सरबत्ती केली. तो तेवढ्याच शांतपणे म्हणाला. हो, मीच देईन तुला. आणि करशील की. काही मी घरी विचारून सांगेन, काही आपण विचारू, काही तू तुझं डोकं लावून कर. तू करणार आहेस. संपला विषय. फोन कट. आम्ही डोकं पकडून बसलो. आणि शेवटी मित्राला शरण जाऊन जाहिरात केली. विकतो बाबा ही रानभाज्यांची थाळी. पण घेतील ना रे लोक? तो म्हणाला नक्की. तू देणार ना भाज्या? अजून जोरात- नक्की. पण आम्हाला कशा कळणार तू काय दिल्यास ते? तो- लेबल लावतो. आता गप बस आणि विक. ![]()
मग पहिल्या रानभाज्यांची कौतुकाने जाहिरात केली. येणार्या गुरुवारी मिळतील. बेदम फोन. आमच्यासारखेच खूप लोक. रानभाज्या माहीत नसलेले पण उत्सुकता असलेले. आता धमाल. काय बर सांगायचं?जाहिरातीत बरच काही लिहिलेलं होत. तेवढच आमचं अगाध ज्ञान. या बहाद्दर ला फोन केला की तो घ्यायचाच नाही. मस्त मजा करत होता आमची. मग रविवारी देतो, सोमवारी देतो करत मंगळवारी मिळाल्या भाज्या. का माहीत आहे?
"पा ऊ स – द ग्रेट."
रानभाजीची प्रत्येक जाहिरात आली की अचानक कडकडीत उन्हात मध्येच पाऊस चालू व्हायचा. चांगला मुसळधार. ते भाज्या गोळा करणारे लोक तरी कुठून जातील त्या पावसात? मग आम्ही गॅसवर. मुळात या भाज्या मिळणार किती त्याची खात्री नाही. मग ऑर्डर्स किती घ्यायच्या? यापेक्षा महत्त्वाचं हे की कुठली भाजी येणार आहे? ती किती केली म्हणजे किती माणसांना पुरेल? आपण जाहिरातीत लिहिलं त्या भाज्या नाहीच मिळाल्या तर? लोक कसे घेतील हे?बाकीचे कुठलेही मेनू आपल्या ताकदीत असतात. येतात ते आपल्याला. एखादी गोष्ट नाही मिळाली तर आणूया. तसं इथे नाहीच. डोळ्यापुढे फुल्ल अंधार. मग पहिल्या वेळी फार अडखळायला झालं. 17 वेळा एकेक पिशवीतली भाजी बघून तिचं रंग, रूप अगदी मनात भरून घेतलं. चुकलं असं नको ना. मग केलं सगळं मनापासून. तर त्या पाठवायच्या वेळी हे धो-धो पाऊस. अगदी ढगफुटी झाल्यासारखा पाऊस. कुरीयर साठी सगळी पार्सल्स परत दुसर्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरायचा ऐन वेळीचा कार्यक्रम. मग दारात आणि माझ्या डोळ्यात एकाच वेळी मुसळधार पाऊस. हे पाहून ती बिचारी कुरीयर कंपनीची मुलं मला सांगायला लागली- मॅडम जाऊ हो वेळेवर आम्ही. नका इतकी काळजी करू. पण “नया है वह” असली अवस्था आमची. जवळपासच्या ठिकाणी नवरोजी गेले. तर आल्यावर त्याचा अवतार असला भारी की पावसाची भीती वाटली चक्क.
दुसर्या वेळी जाहिरात केली आणि आमचा मित्र आणि त्याचे सैनिक शेतातच अडकले. इतका भयानक पाऊस की काय बिशाद येतात पुण्यात.. मग सरळ ग्राहक राजालाच आवाहन केलं मनापासून – की इतका पाऊस पडतोय, लोक अडकलेत शेतात. जर आज काही कळाल नाही तर यावेळचा रानभाजी थाळी चा उपक्रम आपण पुढे ढकलू. आणि ज्यांना हे शक्यच नाही त्यांना आम्ही पैसे परत देऊन टाकू. कमाल म्हणजे एकाही व्यक्तीने पैसे परत मागितले नाहीत. उलट - अहो असं काही होऊ शकतं एखाद्यावेळी, त्यात काय एवढं? म्हणून मलाच धीर दिला. आणि यातली एकही व्यक्ती नात्याची ना गोत्याची. सगळ्यांनी मला समजावण्याचा प्रोग्राम पार पाडला आणि मग आमच्या मित्राचा फोन आला, कॅन्सल नको करू. मी येतोय उद्या. हुररेsss . झाला कार्यक्रम. ठरवल्यासारखा. परत पार्सल पाठवताना हा वरुण राजा गडगडाट करत हजर आहेच. आता मात्र गम्मत वाटायला लागली. हे काय नेमकं? रानभाजी म्हटलं की पाऊस आहेच. पण लोकांचा प्रतिसाद उत्तम.
पुढच्या वेळी किस्सा च. सरळसोट काम झालं तर ते माझं नसतच मुळी, इतकं तर माहीत आहेच. आता आमचा मित्रच आजारी पडला. तुफानी. तो नाही तर रानभाज्या नाहीत. इतकं सरळसोट समीकरण होतं. आता जाहिरात केलीच नव्हती. तरीही वाटसप आणि फेसबुक मुळे आमचा नंबर बर्याच लोकांपर्यंत पोचला होता. सतत फोन येऊ लागले. मित्र तर आजारी बिचारा. आता सगळ्यांना सांगणार तरी काय? सारखं सारखं? शिवाय तो सोडून इतर कुणी ओळखीचेही नाहीत. मग या रानभाज्या आणून तरी कोण देणार? विचार करून करून डोकं दुखायला लागलं. आमच्याकडे भाज्या आणून देणारं कुणी नाही हो, हे कसं सांगणार? भयानक वाईट परिस्थिती. मग अचानक नवर्याच्या डोक्यात लायटिंग झाली. आम्ही आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना – अर्थात पुण्याबाहेरच्या- हे सांगितलं. किती लोकांना त्रास दिला.. पण दोस्त आखीर दोस्त होता है! सगळेच छान. मग परत मस्त जाहिरात केली. पूर्ण महाराष्ट्रभर चकचकीत ऊन पडलेलं. आम्ही खूश. परत नव्या दमाने जाहिरात केली. परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, गडचिरोली, वर्धा, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली काही सोडल नाहीच आम्ही. कुठूनही भाज्या दोन दिवसात येणार असं जाहीर झालं की दुष्काळी ठिकाणीही बेदम पाऊस चालू. आमची धाकधूक दरवेळी वाढलेलीच. काही वेळा तर फोनवर लोक सांगायचे की अहो, तुम्हाला हो म्हणालो आणि पाऊस चालू झाला इकडे. 3 दिवस झाले थांबतच नाहीये.
मग एकदाच्या आजच्या ऐवजी उद्या अशा यायच्या भाज्या. मग त्या येणार तेव्हा पहाटे अडीच म्हणू नका नाहीतर 4 म्हणू नका. भर पावसात आम्ही आमच्या रथावरून हजर. आधी एकदा भाज्या मिळाल्या त्या ट्राव्हल्स कंपनीच्या बसने आल्या. त्यामुळे पुढच्या वेळी आम्ही बस शोधत होतो. मजबूत पाऊस, गाडीचा नंबर पाठ करून ठेवलेला, पावसात तो दिसत नाही अंधारात म्हणून मिचमिच्या डोळ्यांनी प्रत्येक गाडीचा नंबर पहायचा असले उद्योग सुरू आम्हा दोघांचे. तर या वेळी आमची सोडून सगळ्या बसेस जात होत्या. दोन तीन बस वाले तर बघायचाय का नंबर गाडीचा? मग बघा म्हणून अगदी अंगावरच घालतात की काय बस असेही गेले. नवरा त्या ड्रायव्हर ला फोन करतोय तर तो म्हणाला मी पोचलोय, तुम्हीच दिसत नाही मला. आम्ही रागारागात त्याला सांगतोय, काहीही काय, अर्धा तास झाला आम्ही तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी आलोय. तुम्हीच नाहीये. तर तो म्हणाला- तुम्ही जुपिटर वरुन आलात का? नवरा म्हणाला हो, तर म्हणे डावीकडे पहा तुमच्या, जी कार दिसतेय तीच माझी. पहाटे पहाटेचे सगळे प्रयोग आठवून इतके हसलो आम्ही. पोपटच झाला की. आमच्या डोक्यात बसच फिट्ट बसलेली.
त्या पुढच्या वेळेपासून मात्र कुठलेही वाहन पहायचेच हा नियम ठरवून घेतला. हो, उगीच शेजारीच ड्रायव्हर आपली मजा करत उभा असायचा. आणि आपण पावसात हातवारे करत उभे भर रस्त्यात. कसं दिसतं ते?
असो. जे जे जमलं ते मात्र नक्की केलं या रान भाज्या मिळवण्यासाठी. आणि जाता जाता सगळ्या महाराष्ट्रातल्या दुष्काळी जनतेला पाऊसच देऊन टाकला. घ्या लेको तुमीही पावसात भिजायची मजा.. नाही का?
आता पण एक कळाल राव – पाऊस पडत नाही का? सांगा मला.. रानभाज्या थाळीचा उपक्रमच जाहीर करते. हाय काय अन नाय काय. ![]()
धमाल आली पण. एकेक समृद्ध करणारे अनुभव. रानभाज्यांबरोबरच हा पाऊस आमच्या डोक्यात बरंच काही रुजवून गेला हे मात्र खरं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा