बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२०

 

#पन्या:

हल्ली पन्या डॉन म्हणजे उंबराचं फूल झालंय. दिसत नाही फार. म्हणजे आमच्या तिच्या वेळाच जमत नाहीत.

पण परवा घरी गेलो तर बाबा हसून म्हणाले - चिमी येणार आहे तुझ्याकडे. काहीतरी अडलंय होमवर्क मधलं. म्हटलं- कधी आली होती हो?तर म्हणाले 4-5 फेऱ्या झाल्यात. शेवटची फेरी मारली तर च्यायला... माझ्याकडून व्यायाम करून घेतलाय तिने चांगला 20 मिनिटं😊. आम्ही थक्क. म्हटलं कसा काय? तर म्हणाले आत्या आली का म्हणून विचारायला आली तर मी हाताचे व्यायाम करताना दिसलो. तशी लगेच म्हणाली चला आजोबा आपण एक्सरसाईज करू. हे नको नको म्हणतायत तोवर हिच्या ऑर्डर चालू. उभे रहा- पायात distance ठेवून. हं, आता हात वर करून दाखवा, खाली वाकून पायाचे अंगठे पकडा . मध्ये मध्ये आजोबा, हात असा हलवा म्हणजे लौकर बरा होईल वगैरे असंख्य सूचनांची टकळी सुरू. त्यात स्वतः पण करतच होती व्यायाम. मग 20 मिनिटांनी बाबा दमूनच गेले. तू आता आत्या आली की ये. ती हाक मारेल तुला, म्हणून सांगून त्यांनी आपली सुटका करून घेतली. मी म्हणाले- कंटाळला असाल तिच्या बडबडीने, जेवायला वाढू का? झोपा लगेच औषधे घेऊन. तर म्हणाले नाही नाही. पोरगी पंधरवड्याने नीट बोलतेय, बरं वाटलं बडबड चालली होती तर.. म्हटलं मग ठीक आहे.

काय मंडळी, वाचताना धक्का ना? पण खरंच पन्या पंधरा दिवस घरात होती. बरोबर ओळखलंत. कोरोना फिरता फिरता घुसला यांच्या घरात. पन्याच्या पप्पा ना ताप आला, ताबडतोब कॉर्पोरेशन चे लोक आले, सगळ्या टेस्ट झाल्या आणि पन्याची आजी आणि पन्या सोडून सगळे positive निघाले. सगळे ऍडमिट. आणि या दोघी home quarantine. सगळे हादरले. म्हणता म्हणता आमच्या इथे आला की शत्रू😢. सगळे हॉस्पिटलमध्ये गेले तोवर साडेअकरा वाजून गेले होते. आम्ही पूर्ण महिनाभर काम करत होतो, त्यामुळे नेमकी त्याच दिवशी सुट्टी घेतली होती. आणि हे कळलं. 😢

घरी वडा सांबार केलं होतं त्या दिवशी. तर तेच घेऊन गेले तिच्याकडे आणि पहातच राहिले घराबाहेरून. पनू पहिल्यांदा इतकुसा चेहरा करून चिडीचूप बसली होती. सगळा आवेश, दंगा, बडबड कुठे गेली होती कोणजाणे. इतकी कसनुशी हसली की पोटात खड्डाच पडला माझ्या. एक कोपरा पकडून गप्प. मी म्हणाले - पनू ,आजी आणि तुझ्यासाठी खाऊ आणलाय बघ. दुपारी जेवा हं नीट. तर म्हणाली- आत्या, तिथेच ठेव खाली. मी जायचं नाही कुणाच्या जवळ असं म्हणाले डॉकटर. आता मी थांक्यू कसं करू तुला? (नेहमी मानेचा झटका, केस उडवून आपले हात गदागदा हलवत, उड्या मारून थँक्स म्हणतात मॅडम). मी म्हटलं, म्हणालीस की आत्ता. बास झालं. इतकी केविलवाणी दिसत होती की मला थांबवेच ना तिथे. तिच्या आजीशी बोलून आले मी बाहेरच्या बाहेर. तिचा चेहरा पाहून तुटायलाच लागलं अगदी. अशी तर ती कधीच पाहिली नव्हती. आणि तिलाही हे नेमकं काय चाललंय ते नीट कळत नव्हतं. संध्याकाळी तिचा एक काका डबा घेऊन आला त्या दोघीना. तेव्हाही तो म्हणाला मला- पनी कडे बघवत नाही राव. तिला काही झालं नाहीये पण तीच आजारी दिसतेय😢

असे गेले 7 दिवस आणि सांगितलं त्या दोघीना डॉक्तरांनी- की तुम्ही मस्त आहात, लागा रुटीनला. मग पनू जरा घराबाहेर आली. समोर मानव तिला चित्र दाखवायला येऊ का म्हणून विचारत होता. हिने इतकं शांतपणे सांगितलं, नको मानव, नंतर पाहीन मी चित्र. इकडे येऊ नको, मी home quarantined आहे. तो म्हणाला, तुला कुठे करोना झालाय पण? तर म्हणाली- मी टीव्ही पाहिलंय,मला नसला तरीही तुला होऊ शकतो. तू मरलास तर? मग मानव घाबरला. पण तरीही इतकी समजूतदार पन्या पचवायला जड जात होती.

होता होता पंधरावा दिवस आला आणि पन्याच्या घरची मंडळी घरी येणार असा फोन आला. आत्तापर्यंत पनू यायला लागली होती घराच्या आसपास, बोलतही होती. हे लोक घरी येणार त्या दिवशी आम्हीही घरी होतो. संध्याकाळी काहीतरी चटक मटक खात होतो आणि ही आली. बाहेरूनच आत्या-- घरी तू? असं विचारलं, म्हटलं ये ना आत, खाऊ खा. इतकी छोटी आणि पुढे खाऊ, तरी म्हणाली नको, आज उपास आहे माझा. शांतपणे. मी एकदम काय? आज कसला उपास? म्हणाले . तर माझ्या नवऱ्याकडे वळून म्हणाली- काका तो रात्री सोडत नाहीत तो कोणता उपास रे? तो म्हणाला एकादशी. का ? तर म्हणतेय तो नाही केला मी. आज पप्पा येणारेत ना, म्हणून मी उपास केलाय, ते आले की त्यांच्याबरोबरच खाणार. आम्ही तिघे गप्प झालो. कळेना काय बोलायचं. मग अर्ध्या तासात सगळी कंपनी आली आणि हे पिल्लू जे मुकेशच्या गळ्यात पडलं ते रात्री उशिरापर्यंत. नुसतं पप्पा, पप्पा ऐकू येत होतं. मुक्या आपला शांतपणे तिला जवळ घेऊ बसला होता. सुटला लेकीचा उपास.

त्यावर ही बाई परवाच आली म्हणून तिच्या अखंड बडबडीच कौतुक बाबांना. पनी गप्प बघवतच नाही, नाही का गं? बाबा विचारत होते.

नऊला पाच कमी असताना आली ठकी. तेव्हा बाबा मला विचारत होते, आता कुठली सीरिअल? मी सहज गुणगुणले- सुंदरा.. तोवर धाडकन एन्ट्री पनीची. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या टायटल सॉंग वर स्वतः बसवलेला डान्स करून झाला. पाय उडवताना आमच्या घरातल्या काही वस्तू सिलिंगचं दर्शन घेऊन आल्या, ते पाहून बाबांचं बी. पी. वाढलं, ते पन्या म्हणून ओरडतायत, वस्तू इकडेतिकडे, त्यात हिचं वर्कबुक, पेन्सिल, शार्पनर पडलेलं, नवरा आणि मी हसतोय आणि ही बाबांना म्हणतेय- कसा होता डान्स माझा? मी छान करते डान्स. आता आत्याबरोबर होमवर्क करते मी. काय झाले तुम्हाला ओरडायला? मी तर काहीच नाही केलं😊😊😊

आलं सगळं रुळावर.

जय पनू!!!

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...