लॉक डाऊन प्रकरणानंतर आत्ता आत्ता आमच्या इथली बच्चा गँग बाहेर दिसायला लागलीये. थोडी थोडी.![]()
आज त्यातली दोन भावंडं आली. मोठा तिसरी चौथीतला आणि छोटा - "मी ल्हान गटात आहे" वाला. बाहेरून जोरात हाक- काss कू, आमच्या मम्मीचा बड्डे आहे आsssज
.
मी- अरे वा, मग आज खाऊ काय करणार? दोघे एका सुरात- तुमच्याकडे काय आहे? तयार? 20 रुपये आहेत आमच्याकडे. आम्ही इथून घेऊनच जाणार तिच्याकरता. त्यांचा आविर्भाव इतका गोड होता की बास... एक मिनिट मलाच कळेना वीस रुपयात काय द्यायचं ते.. म्हटलं, तुम्हाला काय द्यायचंय मम्मी ला? तर परत दोघे एकसुरात- सामोसा. म्हटलं मग थांबायला लागेल. आज सामोसा तयार नाहीये. मग दोघे- पण आम्हाला सामोसा हवाय आणि तो लग्गेच हवाय. म्हटलं मग माझ्याकडे नाहीये.
धाकटा बुवा रुसून खुर्चीत बसला. असा कसा नाहीये?
मी: अरे आज कुणी आलंच नाही माझ्याकडे सामोसा खायला.. म्हणून.
मग मोठा दादा म्हणाला अरे दुसरा खाऊ घेऊया.
भरपूर चर्चा करून वडापाव बाद झाला आणि ब्रेड पॅटिस ठरलं. मग दोघे म्हणाले की 4 पाहिजेत आम्हाला ब्रेड पॅटिस. मग म्हटलं 20 रूपयांत कसं होईल बरं? तर धाकटा गडी- मग आम्ही चार आहोत ना घरी, मग द्या की आम्हाला चार.. मी हसतेय. मग मोठा म्हणाला अरे, चल चल, मग येऊ आपण. गेले दोघे सायकलवरून. अर्ध्या तासात जोडगोळी हजर. काकू, आता काळजीच नाही. मी आणले पपांकडून पैसे. चांगले 100 रुपये. आता द्याल ना 4 पॅटिस? मी म्हणाले बसा. देते. तोवर मोठा म्हणाला, मी मम्मी ला सांगून येतो आम्ही इथे आहोत म्हणून. याला राहुदेत इथे. बरं म्हणाले मी.
मग पॅटिस करताना- काकू, तुम्हाला माहीत आहे? आम्हाला का उशीर झाला?
मी: हो, तुम्ही पपांकडून पैसे आणायला गेलात ना..
टिल्लू: नाही, ते लगेच दिले पप्पानी. आमच्याकडे खूप पैसे आहेत. पण दादाच्या सायकलची चैन पडली मधेच.
मी: चेन रे, चेन
टिल्लू: डोक्याला हात लावून- अगबाई... चैन म्हणतात तिला. मग दादा ती तशीच चालवून दमला.
मी: तू मदत नाही केलीस?
टिल्लू: मी बसलो होतो ना सायकलवर, दादाने डबलसीट घेतलं होतं मला, मग मी बसूनच राहिलो.
मी: म्हणूनच दमला दादा. मग कुणी बसवून दिली चेन?
टिल्लू: चैन, चैन. रस्त्यावरचे एक काका म्हणाले दादाला, मी बसवतो म्हणून. त्यांनी दिलीपण. मग आम्ही बसलो, परत पडली चैन. असं तीन वेळा झालं. मग चालली नीट.
मी: ते काका थांबले तोवर?
टिल्लू: आम्ही जाऊच दिलं नाही त्यांना.
सायकल नीट झाल्यावर दादा त्यांना थांकू म्हणाला, मग आम्ही मम्मीला छोटे छोटे 2 केक घेऊन आलो.
मी: मज्जा आहे की मम्मीची
टिल्लू: मग? बड्डे आहे ना तिचा.. आता घरी जाऊन आम्ही ते केक खाणार![]()
![]()
मी: अरे मम्मीकरता आणले ना तुम्ही?
टिल्लू: ती नंतर आम्हालाच देते. मग एक दादाला आवडणारा, एक मला आवडणारा असे आणलेत. तुम्हाला नाही बघता येणार. आम्ही आधीच घरी ठेवून आलो इथे. इथे सगळं छान मिळत ना, म्हणून आम्ही डोयरेक ![]()
इकडे आलो.
मी: हसतच-मग पॅटिस तरी मम्मीला मिळणार का?
तोवर दादा आला. मग? मम्मीसाठीच घेऊन चाललोय. आत्ता पप्पा पण येतील लंच साठी. मग सगळ्यांना मिळेल.
मी: आणि केक?
दादा: टिल्लू कडे पहात- तू सांगितलंस काकुनां? आपल्याला आवडणारे केक घेतले ते?
टिल्लू: मी नाही सांगितलं. त्याच म्हणाल्या. हो की नाही हो काकू?
मी- हो गुरू, जा आता दोघे घरी नीट.![]()
![]()
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा