गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

 #टिल्लूहॉटेलच्याटिल्लूगोष्टी:

आमच्या कॅफेची जागा एका सरदारजींची आहे. एकदम हसतमुख आणि गडगडाटी बोलणं. मजा येते आले की. इथल्या भागात उत्तम मराठी बोलणारे सरदारजी म्हणूनच ख्याती आहे त्यांची. टिपिकल सरदारजी लोकांसारखं त्यांचपण टायर, ट्यूब असलं दुकान आहेच. पण माणूस खवय्या. कोणे एके काळी दुबईत हॉटेल होतं त्यांच. त्यामुळे मलाही सांगत असतात, त्यात काय एवढं, असं प्लॅन करायचं वगैरे. अळूची भाजी कधी करणार तू? असं रस्त्यावरून ओरडून विचारणारे एकमेव. करणार तेव्हा मला फोन कर, तुझ्या काकुला सांगेन स्वयंपाक करू नको म्हणून असं सगळ्या माणिकबागेत ऐकू जाईल असे ओरडतात. सगळ्यांना सांगतात, माझ्या पोरांचं हॉटेल आहे, जात जा तिकडे..एकूण धमाल.

मध्ये एकदा आले. म्हणाले तुझ्या काकुला बरं नाहीये, पटकन दालखिचडी कर. मी येतो अर्ध्या तासात. आम्हाला म्हातार्यांना झेपेल अशी कर. खूप तिखट, मसालेदार नको. मी दिली करून. दुसऱ्या दिवशी रस्त्यावरून ओरडत, लय आवडली तुझी खिचडी. आज पण तशीच हवी. मला भूक लागलीये. कुकरला डायरेक्ट शिजव. वेळ नको घालवू, फटाफट कर, मी आलोच. मी कुकर लावला तोवर हजर. मी म्हटलं, काका, 5 मिनिटे लागतील वाफ जायला , तोवर मी सॅलड, पापड लोणचं देते पॅक करून, बसा.

तर म्हणे, पापड, लोणचं आहे घरी, कांदा,काकडी चिरतो मी, तू कुकर आण इकडे..

मी: कुकर???

काका- मग, तुझी काकू आणि मी जेवतो की गरम गरम. जेवू दे म्हातारा म्हातारीला एकत्र.

मी- अहो मग जेवा की नीट, मी सगळं देते पॅक करून. कुकर काय...

काका- त्याला काय होतंय? गाडीवरून नेतो, जेवतो आणि आणतो कुकर.

मी - (सगळा जीव कुकरमध्ये माझा), नको मला हवा माझा कुकर, तुम्हाला पॅक करून देते.

काका- कुकर नेणार मी

नवरा अशक्य हसला- काय माणसं आहात दोघे.. काका, कुकर मागणारे तुम्हीच पाहिले आणि कुकरमध्ये जीव अडकलेली ही एक, तुमच्या प्रेमळ भांडाभांडीत मी सगळं पॅक केलंय, जा घेऊन आणि जेवा शांतपणे म्हातारा म्हातारी😊😊

फीलिंग- काहीही अशक्य नाही बरं का आपल्या इथं

 



 

 

 

 

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...