मंगळवार, ३० जून, २०२०

 

गुलाबकळी आणि नथीची गोष्ट:

काय बाई चॅलेंजेस तरी फेसबुकवर.. कुठं साडयाच नेसा, मग काळेपांढरे फोटो टाका, मग मेकप नसलेले फोटो टाका, मग नथ घातलेले फोटो टाका... करा करा, सगळं करा पण ती नथ घालण्यासाठी नाक टोचायला काय काय करायला लागतं माहिते का?

खरं तर नथी सारखा अतीव सुंदर, घडीव दागिनाच नाही. तिचे सगळे झळाळणारे टप्पोरे मोती, तो मधला एकच हिऱ्यासारखा चमकणारा पांढराशुभ्र खडा, खाली लुकलूकणारे लाल, हिरवे खडे आणि तो सुंदर बाकदार दांडा. तशी तर मला कुठलीही नथ आवडतेच. सोन्याची छोटी आवडते तशी खड्यांचीही. ब्राह्मणी पद्धतीची खाली थोडीशी ओठांवर वळणारी आवडते तशी तुळजाभवानी ची सरळ ओठाखाली येणारी भलीमोठी नथ पण आवडतेच. अगदी लमाणी बायका घालतात ती चांदीची नथ पण मोठी असली तरी आवडतेच.आपल्याला चापाची नथ, चमकी हा प्रकार पटतच नाही. नाक टोचलेलंच पाहिजे नथीकरता. मला तर लहानपणापासून नाक टोचायचं होतंच. शाळेच्या गॅदरिंग मध्ये कुणी नऊवारी, कुड्या, चंद्रकोर, नथ अशी दिसली की असूयाच वाटायची मला.पण ते नाक टोचणे हे प्रकरण काही जमलंच नाही . मग तोवर चापाच्या नथी घालणे हे प्रकार केलेच नाईलाजाने. का टोचलं नाही ? तर टोचतांना दुखेल याची अफाट भीती.

आम्ही लहान असताना दारावर नाक टोचून देणाऱ्या बायका यायच्या. माझ्या काही मैत्रिणींनी टोचूनही घेतलं त्यांच्याकडून. पण मग नंतरची रडारड पाहून तो बेत मीच हाणून पाडला.

अहो पण मग चमकीचं काय? नथीच काय? ती बिचारी माझ्या नाकात बसायला मिळालं नाही आणि माझा रुबाब वाढवला नाही म्हणून वर्षानुवर्षे हिरमुसून जात होती.

होता होता कॉलेज संपत आलं. तेव्हा माझी एक अगदी जवळची मैत्रीण नाक टोचून आली. आई ग... किती ते गोड दिसावं एखाद्या नाकाने? तेही फक्त चमकी च्या जिवावर? काळजात नुसती कालवाकालव.

मग तिची मोठी मुलाखत घेऊनच टाकली. बाई कुठे गेलीस? कुठून टोचलस? किती दुखलं? चमकीनेच टोचलस ना? किती वेळ लागतो? रडलीस का? किती? घरी काय म्हणाले? नाक दुखतंय का? यात सगळ्यात महत्त्वाचं चमकीने नाक टोचणे हाच प्रकार होता. नाहीतर ते सुंकलं म्हणजे सोन्याची तार आणि त्यात एक मोती हा प्रकार मात्र अजिबात च आवडला नाहीये मला. शेम्बूड आल्यासारखं दिसतं ते.

माझे भयाण प्रश्न ऐकून घेऊन (करते काय बिचारी? जवळची मैत्रीण ) ती म्हणाली अमक्या दुकानात गेले होते. तिथल्या माणसाचा हात सफाईदार आहे. दुखत नाही. फक्त डाव्या डोळ्यातून एक मोठा अश्रू बाहेर येतो. हुश्श. मग सोपं दिसतंय. असं ठरवून घरी गेले. आई- आजींसमोर आता परवाच नाक टोचणार म्हणजे टोचणार अशी भीष्मप्रतिज्ञा जाहीर केली. आजी म्हणाली- अग, पण नथ आवडते ते ठीक. नाक कसं चाफेकळी हवं. म्हणजे नथ कशी सुरेख दिसते. आणि गोरी मुलगी असेल तर सुरेखच.

आता हा जिव्हारी लागणारा अपमान करणं शोभतं का आजीला? मान्य आहे तुम्ही दोघी अगदी गुलाबी गोऱ्या आणि आम्ही पक्का कलर वाले...

पण इथं आईच आली धावून मदतीला. म्हटली नसुदेत ग चाफेकळी. गुलाबकळी तर आहे...

मला एकदम बरं वाटलं. चला, चालेल म्हणजे. तोवर आजी म्हणाली- रडारड नाही करायची. गुलाबकळी म्हणजे जाड पाकळ्या.

मग मात्र चिडून जाऊन आता न रडता टोचतेच नाक असं टिचचून सांगितलं आजीला आणि मामेबहिणीला फोन केला. तिचंही नाक टोचायचंच होतं.

ठरल्या मुहूर्ताला गेलो सराफाच्या दुकानात. माधुरीताईला म्हटलं, आधी तू. मोठ्याचा मान. ( तेवढंच तिचं काय होतंय ते बघू... ) पण बेटीने पटकन नाक टोचून घेतलही.

मग बसले त्या माणसासमोर. त्याने चमकीला मस्त टोकदार केली. इकडे माझी धडधड सुरू. मग त्याने माझा चेहरा उजेडाकडे धरला आणि ती चमकी नाकावर टेकवली की मी मारलीच मोठी किंकाळी. डोळे मिटून. किंकाळी प्रकरण आटोपतानाच मी त्या माणसाकडे पाहिलं. तो हसत म्हणाला- चमकी हातातच आहे. फक्त पहात होतो मी . आता टोचतोय नाक. काही होत नाही.

झाला एकदाचा तो सोहळा. आनंदाचे डोही आनंद तरंग!!

मग आली दिवाळी. लक्ष्मी पूजनाला एकदाची चमकी काढून आईची नथ घालून पाहिली आणि म्हटलं.. आजी- गुलाबकळी तर गुलाबकळी. छान काय आहे तर नथीचा नखरा. बघ. तिनेही येड ध्यान ग आपलं म्हणून जवळ घेतलं न जीव शांत झाला.

तरीही इथं एक फोटू तो मंगताच है.. तर हा एक जुना फोटो. नथ कशी सुंदर दिसते की नाही?


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...