महाभोचक आजी रिटर्न्स![]()
![]()
माझ्याकडे समोरच्या बिल्डिंगमधली एक ताई नियमित काहीतरी घ्यायला येते. आता छान ओळख झालीये तर इथे कुणी नसेल तर 2 मिनिटे गप्पा पण मारते. तर ती 4 दिवसांपूर्वी पोळी भाजीचे पार्सल घेऊन गेली. आता जाताना या म. भो. आजींनी पाहिलंच. तिला थांबवून काय घेतलंस, किती, केवढ्याला, इथूनच का वगैरे सगळं विचारलं. तिनेही सांगितलं . ऑफिसमधून उशीर झालाय यायला म्हणून घेतलं. मग दुसर्या दिवशी ती परत आली आमच्याकडे. तिने मला सांगितलं ही की काल जाताना गाठलंच मला आजी नी. मी असं असं सांगितलंय. तुलाही माहीत असूदे. मी म्हणाले मला नाही विचारणार त्या. पण ठीक आहे. आम्ही बोलतोय तोवर टाळ्या पिटून, अग, इकडे वरती बघ, मी हाक मारतेय- आज पण पार्सल का? आज तर वेळेवर आलीयेस असा आवाज दिलाच तिला आजींनी. तर ही म्हणाली- आजी, आमच्या घरी इथलं जेवण आवडतं म्हणून नेतेय. तर तेव्हा बरं म्हणाल्या आणि नंतर तिला परत गाठून घरी चार पोळ्या लाटायला काय होतं ग तुला? असं भर चौकात विचारलं. तरी तिने फार गांभीर्याने नाही घेतलं. काल परत ती माझ्याकडे आली तेव्हा तिच्या छोट्या मुलीला घेऊन आली. कुणी फारसं नव्हतं तर बोलत बसली होती. तिच्या छोट्या मुलीला एक कागद ,पेन दिलं होतं मी चित्र काढायला. तर या समोरून- झालं तिचं चित्र काढून. कंटाळली असेल ती आता. 10 मिनिटं होऊन गेली की. माझी मैत्रीण म्हणाली- थांबलीये हो आजी ती. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही जेवा आता. दीड वाजलाय. तर म्हणे मी जेवलेय पण आता तुम्ही जा घरी. रोज रोज हॉटेलमध्ये काय घ्यायचं?
आता रोज हॉटेलमध्ये जेवायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. योग्यायोग्यतेत मी जाणार नाही कारण मी जाणूनबुजून सुरू केलेला व्यवसाय आहे हा आणि मला खूप आवडतो तो.
या माझया तोंडावर हे म्हणतायत म्हटल्यावर मला इतका राग आला, इतका राग आला...![]()
संपलं, पुढे बोलता कुठे येतंय? पण त्याच वेळी रस्त्यावरून या म. भो. आजींना व्यवस्थित ओळखून असणार्या दुसर्या एक आजी चालल्या होत्या. त्या सरळ म्हणाल्या- अहो घेणारी ती आणि देणारी ती- दोघींना पटतंय ना? मग तुमचं काय आहे मध्ये? तुम्ही एक रुपयांच्या कस्टमर आहात का? कशाला पहाटेपासून गॅलरीत असले उद्योग करता?
यावर म.भो. आजी लगेच आपल्या कानांवर हात ठेवून बोलल्या- काय म्हणालात? अलीकडे ऐकू कमी येतं मला.
त्या दुसर्या आजी मान वळवून मला म्हणाल्या- बोल ग उलट त्यांना. काही होत नाही. नुसती संतापून गप्प बसली आहेस. असं नको करुस.
आम्ही दोघी गप्पच आणि महाभोचक आजी घरात गायब.
खरंच काही जणांना तरी उलट बोलायला यायलाच हवं मला ![]()
![]()
![]()
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा