सोमवार, ८ मार्च, २०२१

 

आज

सुचिकांत वनारसे

यांची पोस्ट वाचली त्यांच्या लाडक्या नेपच्याची. आणि मग रहावेचना. म्हटलं लिहूयाच आता आपल्याला भेटलेल्या वाघाच्या मावश्या आणि मामांबद्दल

सगळ्यात मोठी गोष्ट ही की आम्ही कधीच, कुठलाच प्राणी पाळला नाही. पण ते मात्र नेमाने आम्हाला शोधतात आणि आम्हालाच पाळतात. आता त्यांनी आम्हाला पाळलं की आम्ही त्यांचं ऐकणं हेच काय ते आमच्या हातात उरतं. मालकच ते.

तर आमच्या शेजारच्या आजींनी एक मांजर पाळली. मग तिला आपोआप कळालं की शेजारच्या घरातले लोक बरे आहेत गिऱ्हाईक बनवायला. एक तर आपण सुंदरच आहोत त्यामुळे त्यांनी आपले लाड हे केलेच पाहिजेत. नो ऑप्शन. आणि नसतोच सुंदर तरी लावले असतेच करायला. कारण हक बनता है भाई पडोस के घर पे. तर या न्यायाने ही पांढरीशुभ्र विठी आमच्याकडे यायला लागली. आम्ही आपले दूध दे तिला, पोळी घाल इथवर होतो. मग या मॅडम सोफ्यावर ऐसपैस पसरायच्या आणि आपल्याला जर बसायचं असेल तिथे तर- काय कटकट लावलीये... झोपतेय ना मी इथे अशी बघायची. हो, सवयीने समजतंच आपलयाला. मग आपण आपल्याच घरात दुसरी जागा शोधायची. बरं इतकी भारी की घरी पाहुणे आले आणि जर सोफ्यावर ती बसायची त्या कोपऱ्यावर बसले तर सरळ येऊन त्या पाहुण्यांच्या डोळ्यांत आपले हिरवे हिरवे डोळे रोखून बघत बसायची- एकटक. या टेरर प्रकारामुळे तो पाहुणा हललाच पाहिजे जागेवरून इतकी दहशत. परत जागा मिळाली की प्रेमळ हसायचं. आपण खल्लास. (हसतात हो मांजरं) मग आई पोळ्या करायला लागली की तिच्या या पायातून त्या पायात अशी अखंड म्याव म्याव करत ळ च्या आकारात हिंडत बसे. का? तर तव्यावरची पहिली गरमागरम पोळी मलाच मिळाली पाहिजे. आधीच केलेली पण ताजीच जर डब्यात असेल आणि ती दिली ताटलीत तर 'खा तूच' असा एक तुच्छ कटाक्ष टाकून जायची मान वेळावून. असली हिम्मत आम्ही केली असती तर फटके पडले असते. पण या मॅडमचा तोराच फार. तिला पिल्लं होणार हे कळल्यावर माझया बाबांचा उत्साह पहाण्यासारखा. आईला सूचना त्यांच्या- तिला जास्त पोळी दे ग, दूध पण दे. आजी चवताळून म्हणायची- हो, बारशाला कुणाकुणाला आणि कुणाकुणाच्या मांजरांना बोलवायचंय तशा पत्रिका छाप आता. पण हे विठी ला ही माहीत होतं. सगळी 4 पिल्लं दाखवायला आधी बाबांकडे आली ती. एक एक करून दाखवायचं, बाबांनी तिला अरे वा, छान आहे हं तुझं बाळ म्हटलं की ते ठेवून दुसरं आणायचं. धमाल असायची. कळतंच त्यांना सगळं.

मग थोड्याफार फरकाने अशीच खूप मांजरं, बोके मिळाले आम्हाला मालक म्हणून आमच्या घरात एक उंदीर, पाल, चिचुंद्री असलं काही नसायचं मात्र या पाहुण्यांमुळे. शिवाय मांजरांना स्वतःला माहीतच असत आपण अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आहोत. अंघोळ बिंघोळ हे मर्त्य मानवाचे चोचले आपल्याला अजिबात आवश्यकच नाहीत.

मागच्या वर्षी आम्ही आमच्या फूड जॉईंट ला सुरुवात केली. पूर्ण दुकानांच्या लायनीत हॉटेल. त्यात मांजराच काय काम? पण तिथंही एक मांजर आलीच. मग नवर्याने आलीये ती म्हटल्यावर दूध दिलं. खल्लास. पाळलं तिने आम्हाला लगेच. आणि तिचा आवाज म्हणजे- खरोखर गोड. तिचं ते म्याव म्याव अतिलाडीक आणि मंजूळ. मग तिला तेही कळालं की हे दोघे वेडे आहेत. एकदा का अशी मान वेळावली, तशी मान वेळावली, झुपकेदार शेपूट फुलवून दाखवली आणि गोड लाजरं पाहिलं की हे पार प्रेमातच पडतात आपल्या. मग काही हवं असेल की हुकमी हत्यार.

तिला एक पिल्लू झालं. त्या येड्याला आम्ही काय म्हणतोय - ते काय करतंय हे काही कळायचंच नाही. कित्ती छान छान नावं ठेवली त्याला पण बघेचना. मग एकदा नवरा म्हणाला- 'ए पप्पू....' आणि आलं न बाळ धावत . तेव्हापासून तो पप्प्या झाला.

आता या मनीला माहीत होतं की आपला भाव आता कमी झालाय. आपल्या बाळाचा भाव आहे. मग ती दोघे हॉटेल उघडताना एक उजवीकडे आणि एक डावीकडे बसलेलीच असायची. शटर उघडलं की हा पप्या अशक्य घोगर्या आवाजात म्याव म्याव करून आम्हाला काही करूच द्यायचा नाही. मला आधी दूध. मग मायलेकरांचा नास्ता झाला की आई उंडारायला बाहेर आणि हा गधडा आईसबॉक्सवर झोपायला कूच करायचे. आपल्याला बर्फ हवाय म्हणून आपण बॉक्स ला हात लावायचा अवकाश- याचा आरडाओरडा चालू. माझा बॉक्स आहे. मी इथंच झोपणार. माझया झोपेच्यावेळी हॉटेलमध्ये काम कसं करू शकता? माणसं आहात की कोण? हे सगळं असायचं त्यात.

त्यातून सापडलेला प्रत्येक उंदीर, कबूतर मारायचं आणि आपल्यापुढे आणून आधी दाखवायचं हा खाक्या. तुम्हाला कसंतरी झालं ते पाहून, नको वाटलं तरी - it's your problem, not mine असं पाहून मी दाखवलंय तुला, मग नको म्हणू माहीत नाही असा चेहरा करून आपली शिकार उचलून चालू पडायचं.

दुपारी 3.30 ला आम्ही जरा निवांत झालो की आपल्याजवळ यायचं, खूप मस्का मारायचा. आपल्याकडून लाड करून घ्यायचे आणि आपला मूड बदलला की सरळ मांडीवरून खाली उतरून चालू पडायचं. हो मग, झालं की माझं काम - हाच attitude.

काही म्हणा, स्वार्थीपणात यांचा कुणी हात नाही धरणार पण देवाने देखणेपणासाठी काही ठेवलं नाही हो बाकी यांच्यात. कसली दिसतात एकेक....

सुचिकांत च्या नेपच्यामुळे इतकं सगळं आठवलं आज


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...