शनिवार, ६ मार्च, २०२१

 

आत्ताच एक मैत्रीण Vrushali Borawake  यांची लॉटरी संदर्भात एक छान आठवण वाचली. लगेच मी त्या आठवणीवरून आमच्या घरी माझ्या लहानपणात पोहोचलेच. 🙂

तर आमच्या घरी कुणी कधी लॉटरीची तिकिटे वगैरे काढली नाहीत. सगळ्यांना म्हणजे आजी-आजोबा, आई-बाबा यांचा 'आपल्याला कसली लागतेय लॉटरी?' यावर गाढा विश्वास होता. आम्ही दोघं भावंडं तर चिरकुट या सदरातले होतो. पहिली मधला भाऊ, चौथीतली मी. आम्हालाही आमची अमूल्य आणि ठाम मते होतीच तेव्हा पण. म्हणजे शेजारच्या दोस्तमंडळींच्या घरी कधी कधी त्यांचे बाबा, काका आणायचे लॉटरी तिकिटे. ती लागायची की नाही हे कधीच कळलं नाही आम्हाला. पण ज्या अर्थी ती नंतर खेळायला मिळायची, त्या अर्थी पैसे वाया गेलेलेच असणार हे आई-आजी कडून कळायचं. पण आम्हाला ती गुळगुळीत, प्रचंड रंगीबेरंगी तळहाताएवढी तिकिटे भलतीच आवडायची. आई-बाबांबरोबर फिरायला गेलो, किंवा तुळशीबाग, दत्त मंदिर अशा ठिकाणी गेलो की तिथे हमखास हे लॉटरीवाले लोक दिसायचे. मी, भाऊ त्या लॉटरी वाल्यांच्या समोरच्या गर्दीकडे अचंबित होउन पहायचो.इतके लोक घेतात लॉटरीचं तिकीट. आपण का नाही घ्यायचं? वाईट काय आहे? चांगले मस्त भरपूर पैसे मिळतील बाबांना. मग मस्तपैकी घरी थांबतील. मग मजाच मजा. (हो, ती एक गंमत होती. बाबा कशालाही नाही म्हणायचे नाहीत. मग खाउ असूदे नाहीतर पुस्तक. जो चाहे वो मिलेगा. ते आई-आजीकडे अजिबात नाही. का हवीये ती गोष्ट इथपासून ती आत्ता कशी आवश्यक नाही इथपर्यंत सगळं असायचं. त्यामुळे मोठ्ठं बक्षीस लागूदे बाबांना हा नवस आमचा 🙂) जाता जाता भाऊ म्हणायचा- तायडे- सांग ना बाबांना, तुझं ऐकतात ते. लॉटरी चा नंबर लागतो, सगळ्यांना बक्षीस मिळत नाही हे काही आमच्या खिजगणतीत नसायचं. मग बाबांना हळूच मी विचारलं की आई-बाबा एकमेकांकडे बघणार आणि एकदम बोलणार- नको. आपण नाही काढायचं तिकिट. झालं. आमच्या सुप्पर डुप्पर प्लॅन चा बट्ट्याबोळ.

पण एकदा बाबा घरी आले आणि आम्हा सगळ्यांना दाखवून म्हणाले- हे पहा, आपण लॉटरीचं तिकिट काढलं हं आज. माझ्या मित्राने आणली होती विकायला. आम्ही सगळ्यांनी घेतली. आता या रविवारी तिचा निकाल येइल वर्तमान पत्रात. मग कळेल आपल्याला बक्षीस मिळालं की नाही ते. झालं. आम्ही दोघांनी कितीदातरी ते पांढरं-गुलाबी तिकिट बघितलं. अगदी डोळेभरून. रविवार पर्यंत असंख्य बेत करून झाले आमचे.

.

एकदाचा रविवार आला. त्या आधी पेपरवाल्याची इतकी कधी वाट पाहिली नसेल आम्ही दोघांनी. पेपर आला, बाबांनी रिझल्ट चं पान काढलं. तिकिट आम्हा दोघांच्या हातात. आणि चेहरा बहुतेक आता करोडपतीच होणार असा असावा. एक एक आकडा मॅच केला आणि निकाल- आम्हाला फक्त ३०० रुपयांचं बक्षीस मिळालं.

अरे मग? म्हणून काय झालं? आपल्याला लॉटरी लागलीये.. हो की नाही? बाबा अगदी खूष. आजोबा हसत होते आणि आई- आजी ३०० रुपयांत हा बाबा का बरं एवढा खूष झाला असावा असा विचार करत होत्या बहुतेक. आम्ही आपले बाबा खूष तर आम्ही. ते म्हणाले चला रे पोरांनो, आज आपण काय करायचं? भाऊ ताबडतोब- गुलाबजाम, मी- नाही, पावभाजी. बाबा-" ओके. दोन्ही करु. मी सगळं घेउन येतो.' आम्ही उड्या वगैरे मारून आनंदात. आई-आजी-'लावलं कामाला' मोड मध्ये. आणि आजोबा- असूदे असूदे. मजा करु सगळे. मी मटार, कोथिंबिर निवडतो, चला.

झालं. बाबा आले सगळं घेउन. म्हणाले पटापट जेवायचं हं. आपण सगळ्यांनी राहुल ला 'इट्स मॅड मॅड वर्ल्ड' हा सिनेमा पहायला जायचंय. मी तीन च्या शो ची तिकिटे काढलीत. हे शाब्बास!!.

झालं, सगळा कार्यक्रम नीट पार पडला. सिनेमा तर उच्चच. शिवाय येताना आईसक्रीम वगैरे झालंच.

संध्याकाळी आई-आजी विचारतायत बाबांना- किती रे खर्च झाला आज?

बाबा- ५५०/-

आजी- ३०० रुपयांचं बक्षीस आणि खर्च ५५०/-? वेडा मुलगा आहेस तू माझा.

आजोबा- अगं, सगळ्यांनी मजा केली की आपण.

आई- खरंच की... इट्स मॅड, मॅड वर्ल्ड.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...