गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

 

आत्ता एकजण भेटला, म्हणाला, कर्नाटकातले रस्ते कसले मस्त आहेत माहीत आहे? अगदी मख्खन. जरा त्रास होत नाही गाडी चालवताना.

मी विचारच करायला लागले... याला काय अर्थ आहे? असला कुणी रस्ता करतं का? घेतला आपला रस्ता बांधायला आणि करूनच टाकला छान, खड्डे नसलेला, सुळसुळीत दिसणारा, उन्हात चमकणारा, कडेला झाडं असलेला? याला खरंच काय अर्थ आहे सांगा बरं?

मुळात हा रस्ताच नाही. रस्ता कसा हवा?? आमच्या लॉ कॉलेज रोड सारखा. अर्धा कायम उखडलेला नाहीतर खणलेला, पेव्हरब्लॉक्स होते की काय इथे असा संशय येण्याजोगे खड्डे, ड्रेनेजची झाकणं किमान अर्धा फूट रस्त्याच्या लेव्हल खाली नाहीतर अर्धा फूट वर तरी. हो बाबा, जे करायचं ते मल्टीपर्पज पाहिजे. स्पीडब्रेकर पायजे ना, मग या दोन्हीपैकी काहीही असेल तरी हेतू साध्य होतोच. शिवाय आजूबाजूला जेसीबी, रोड रोलर, आणि तत्सम अगडबंब मशिनरी अशीकाही त्याच रस्त्याच्या अधेमधे खेळवत ठेवायची की गोफ विणू बाई गोफ विणू असा मंगळागौर खेळल्याचा फील देणारा, कायम पुढे खड्डयात पडणार आहोत की टेकाड पार करायचंय हे दिवसाउजेडी ही न कळल्यामुळे तुम्हाला कायम जागृत ठेवणारा, रात्रीच्या अंधारात सुद्धा प्रचंड सावधानतेने जायला लावणारा- हो ना, समजा दिवसा बांधलाच असेल रस्ता किंवा असलेला उखडला असेल तर???? नागरिकांची सजगता वाढवणारा नको का हो रस्ता? आपण सरळ रेषेत नीट गेलो तर थ्रिलच नाही हो. आपण एका ठरावीक वेगात जात असताना पुढचा गपकन थांबला की विचलित न होता - अरे पडला की काय? वेडा- असा तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून सहजी कल्टी देता येणारा.. असाच हवा की नाही रस्ता?

आपल्या आगेमागे उरलासुरला रस्ता दाबत, वेगापेक्षा आवाज जोरात असलेल्या बसेस, सायलेन्सर फाडलेल्या बाईक्स, त्या चालवणारे भीषण हेअरकट केलेले पावशेराचे बुलेटवीर हे कसे पहाणार त्या मख्खन रस्त्यावर???? काही मज्जाच नाही बाई तसल्या रस्त्यांवर. रस्ता हा अस्सा च जिवंत हवा, नाही का? उगा दुसऱ्याचं कौतुक करायचं म्हणजे काय?

ट्रॅफिक चं स्वस्तिक नाही झालं तर मुक्ती कशी मिळणार आमच्या आत्म्याला????

म्हणे मख्खन रस्ता- अरे हॅट

फीलिंग- अर्थात मनातल्या मनात- कोण आहे रे रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर??? जाहीर सत्कार करायला पाहिजे याचा. इतका डिझायनर रस्ता करायचा म्हणजे खायचं काम नाही...शेवटी स्मार्ट सिटीतले रस्ते करतोय तो. स्मार्ट तर असणारच


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...