शनिवार, ७ मार्च, २०२०

 

फीलिंग- सगळे देशपांडे इथुन तिथून सारखेच

साधारण 15 दिवसांपूर्वी नवरोजींचंएक महत्त्वाचं पत्र यायचं होतं. आम्ही दिवसभर फूड जॉइन्टवर म्हणून तोच पत्ता दिला होता. ते आलं. इथे व्हायला पाहिजे की नै गोष्ट पूर्ण? पण नाही, कारण ते आमचं पत्र होतं. किस्सा तर होना मंगताच है

तर मागच्या आठवड्यात आमच्या इथे या भागातले पोस्टमनकाका एका ज्येष्ठ नागरिकाला गाडीवर बसवून टळटळीत दुपारी आले. आल्या आल्या म्हणाले- "सर, ते परवाच पत्र तुमचंच होतं ना? मिळालंय ना तुम्हाला?"

नवरा बुचकळ्यात... म्हणाला हो,माझंच होतं. मी दिलीये की सही तुमच्या माणसाला.

पोस्टमनकाका दुसऱ्या ज्येष्ठ काकांना- बघा, मी म्हणालो नं, ते पत्र ज्याचं त्याला दिलंय म्हणून.

आता दुसऱ्या काकांची करवादून एन्ट्री- अहो पण कशावरून ते तुमचं आहे? मला आधी बघू ते पत्र. हे म्हणतात तुम्हाला दिलं, मला ते बघायचंय.

नवरा- (हा जन्मजात पुणेकर.) आपण कोण? माझं वैयक्तिक पत्र बघायला मागणारे तुम्ही कोण?

पोस्टमनकाका- अहो सर, समजावून दमलो मी यांना पण ऐकतच नाहीत . रोज फोन करतायत ऑफिसमध्ये. आणि आज सरळ आलेच पोस्टात. मला म्हणे कुणाला दिलंस ते पत्र? मग मी तरी काय करणार? आलो घेऊन त्यांना.

ते काका- मला पत्र पहायचं आहे म्हणजे पहायचंच आहे.

नवरा- काही संबंध नाही. मिळणार नाही.

पोस्टमनकाका- अहो बघा ना... मग परत मगाचची टेप

मी- अरे ऐकून घे ना नेमकं काय झालंय?

नवरा- पत्र आपलं आहे, आपल्याला मिळालं, आपण पोस्टाला सही दिली. संपली गोष्ट. यांचा काय संबंध? हे देशपांडे आहेत का?

काका- संबंध नाही कसा? ? माझया मित्राने सांगितलं म्हणून जातीने मी चौकशी करायला आलोय.

नवरा- तुमचं आडनाव देशपांडे आहे का? नाही ना? ते पत्र माझंच आहे.

पोस्टमनकाका- तरी मी यांना सांगितलं किती वेळा........ परत तेच

काका- (आता जरा टोन बदलून) असुदेत पण मला पहायचंय.

नवरा- माझी वैयक्तिक पत्रे मी का दाखवावीत तुम्हाला?

नंतर सगळे एकत्र बोलायला लागले. मोठमोठ्याने. शेवटी देशपांडे मॅडम नी(अहो म्हणजे मीच) सूत्र हातात घेतली. करता काय... बोंबाबोंब चाललेली चक्क. सगळ्यांना एक मिनिट, एक मिनिट करून शांत केलं आणि काकांना विचारलं- नेमकं काय झालंय? तुमचं काही पत्र यायचं होत का?

तर म्हणाले अहो माझं काही नाही. माझया मित्राचा फ्लॅट आहे पलीकडच्या बिल्डिंगमध्ये. तिथे पोस्टमनने चिट्ठी टाकली होती की तुमचं पत्र पोस्टातून घेऊन जा. तो गेलाय अमेरिकेला. त्याच्या भाडेकरूने त्याला हे सांगितलं आणि मग त्याने मला. तो तिकडे चिंतेत आहे की असं कोणतं पत्र आलंय म्हणून. तर हे पोस्टमन मला सांगतात की तुमचं पत्र नाही आणि तुमचे मिस्टर दाखवत नाहीत पत्र.

पोस्टमनकाका- तरी मी सांगतोय........

नवरा- एवढंच ना? मग बसा शांतपणे. मी तुमच्या मित्राला फोन लावून सांगतो की बाबा, ते पत्र माझं होतं. चुकून तुमच्याकडे पोस्टमन ने चिट्ठी टाकली होती तर काळजी करू नका.

मग ते जरा शांत झाले.

तोवर पोस्टमनकाका- अहो, तुमचं हॉटेल नवीन इथे, त्यामुळे तुमचं आडनाव काही सगळ्यांना अजून माहीत नाही. पत्र द्यायला माझा ज्युनिअर आला होता. त्याला सापडलं नाही तेव्हा त्याने आम्हाला दिलेल्या भागातल्या सगळ्या कुलूप असलेल्या देशपांड्यांच्या घरात अशी चिट्ठी टाकली. बाकीच्यांना मी फोनवर सांगितलं आणि ते पटलही त्यांना. हेच एकटे ऐकत नाहीयेत. तरी मी सांगितलं.....

काका- अहो, मला मित्राला नको का सांगायला? तो तिकडे काळजी करतोय..

नवरा- थांबा आपण फोन करूया त्या देशपांडेंना, तोवर सगळे चहा घेऊ.

काका- फोन करा पण ते पत्र काही तुम्ही दाखवत नाही

नवरा- ते माझं आहे. बरं फोन करूया

झाला शेवटी फोन. सगळं सांगितलं आणि मग परत काय काय झालं, या ज्युनिअर पोस्टमन पायी कसा मनस्ताप झाला हे परत ऐकलं. शेवटी ते पोस्टमनकाका गेले त्यांना घेऊन.

झालं... मग आता काल संध्याकाळी अचानक एक काका उगवले हॉटेलवर. ते देशपांडे कुठेत? त्यांचं पत्र आलं होतं मध्ये? तेच हवेत.

मी परत गॅसवर. आता काय झालं?

नवरा- टिपिकल देशपांडे खडूस टोनमध्ये... आम्हीच. आम्हीच देशपांडे.

ते काका- अरे वा, द्या टाळी. मी तो पलीकडच्या बिल्डिंग मधला देशपांडे. अमेरिकेहून काल आलो, म्हटलं हा पत्रही न दाखवणारा कोणे देशपांडे? म्हणून ओळखच करून घ्यायला आलो.

यावर नवरा आणि ते काका- दोघेही मनमुराद हसले आणि पुढचा दीड तास येड्यासारख्या जन्मोजन्मीची ओळख असल्यासारखे गप्पा हाणत बसले.

तात्पर्य- पोस्टातल्या माणसाचीच चूक आहे. बिचार्याने इतके प्रयत्न केले ते गेलं कुठेच

आणि मी मनातल्या मनात (अर्थात ) सगळे देशपांडे एकसारखेच का काय?? (एकसारखे म्हणजे कसे ते विचारू नयेच )


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...