मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

 

#पिंपळपान- अशाच जुन्या पण सुंदर आठवणी

माझ्या लहान भावाला शाळेत घातलं ते 5-6 महिने आधी. त्याचा जन्म ऑगस्ट मधला आणि शाळेत घालायला 5 वर्षे पूर्ण लागायची ती मार्च अखेरीस की असंच काहीतरी होतं. आणि हे पात्र अभ्यास म्हणजे आपला काहीएक संबंध नाही असंच वागणार. आई त्याला पकडून आणून अभासाला बसवणार हा एक ठरलेला प्रोग्रॅम आमच्या लहानपणी. कितीदातरी तिची चिडचिड व्हायची. पण आजी म्हणायची करेल ग अभ्यास तो. लहान आहे अजून आणि त्यात लौकर घातला शाळेत. ताण येत असेल ग त्यालाही. झालं. मग मजाच. एकदा घरी पाहुणे आले होते आणि आम्ही दोघे आणि आजीच घरी. बोलता बोलता आजी म्हणाली, हा आमचा नातू म्हणजे भयंकर दंगा. अभ्यास नकोच त्याला. सुमन(माझी आई) फार त्रासते कधीकधी. तर हा त्या पाहुण्यांना लगेच- अहो, लौकर घातलंय नं मला शाळेत, त्यामुळे ताण येतो मला अभ्यासाचा. जी चीत. आपलेच दात. किती दिवस हा किस्सा पुरला तिला.

मग हळूहळू बंधुराज दुसरीत गेले. आमची सकाळची शाळा होती. घरी येऊन जेवून थोडा वेळ झोपायचं, मग अभ्यास आणि नंतर खेळायचं असं रुटीन. दरवेळी हा न झोपता पटकन खेळायला पळायचा. मग आई आणि तो पकडापकडी चालू. आईने त्याला भीती घालून ठेवली होती की तू अभ्यास केला नाहीस तर तुला होस्टेल ला पाठवणार. त्यावेळी तो या धमकीला खूप घाबरायचा.

एके दिवशी असाच सटकला खेळायला. दुपारी मित्राला विचारलं- किती वाजले? तोही त्याच्याच वयाचा. आईला विचारून म्हणाला साडेचार. हा म्हणाला- बापरे,मी घरी जातो अभ्यासाला,. आई म्हणाली की अभ्यास नाही केलास तर होस्टेल ला पाठवीन. मी जातो घरी.

यावर त्याचा मित्र - दुसरीतलाच- त्याला म्हणतोय- वेडा आहेस का? तू एकुलता एक मुलगा आहेस. एकुलत्या एका मुलाला कुणी नाही पाठवत हॉस्टेल ला. काकूना करमेल का? आमच्याकडे मला दादा आहे रे. माझं काही खरं नाही. मला पाठवतील .पण तुला तर ताई आहे. मी नाही घाबरत. आणि तू काय घाबरतोस? खेळ बिनधास्त. आमचं पात्र एकदम पटल्याने खेळत राहिलं त्याच्या घरी.

इकडे आई पण त्या दिवशी चिडली आणि तिनेही ठरवलं, आज बोलवायचं नाहीच याला. बघू किती खेळतोय ते.

संध्याकाळी 6:30 ला आमचे शूरवीर अगदी मजेत घरी आले आणि खाऊसाठी आईला मस्का मारू लागले. आईने शांतपणे त्याला सांगितलं, तू ऐकत नाहीस ना माझं? मी बोलत नाहीये तुझ्याशी. आता बाबा आले की त्यांच्याशी बोलून तुला मी हॉस्टेल ला येणार सोडून. आईला वाटल आता हा घाबरणार. पण झालं उलटंच. लगेच म्हणाला, तू असं करूच शकत नाहीस. आई आश्चर्याने म्हणाली का? तर म्हणे मी एकुलता एक आहे तुझा. आणि एकुलत्या एका मुलाला कधीच हॉस्टेल ला टाकत नाहीत कारण त्या आईला करमतच नाही मग. आई म्हणाली - कुणी सांगितलं? तर म्हणाला- दिपू ने सांगितलंय. त्याला सगळं समजतं.

आईने मस्तपैकी एक पिशवी काढली कपाटातून आणि त्यात कपडे भरायला लागली त्याचे.

आता घाबरगुंडी- आई , माझे कपडे का भरतेस?

आई- दिपूच्या आईशी बोललेय मी मगाशीच फोनवर. तुला आणि त्याला वेगवेगळ्या हॉस्टेल ला सोडून येणारोत आज रात्री आम्ही. तिथे तुलाच नाही करमणार कारण अभ्यास करायला लागतो वेळेवर.

मग.. अशक्य रडारड, मी आता नाही ऐकणार दिपूच, मी करीन न ग अभ्यास....

धमाल येते अजून आठवून. - आमचं पात्र नाही, दिपूचा दुसरीतला कॉन्फिडन्स आठवून.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...