बुधवार, ८ एप्रिल, २०२०

 

#पिंपळपान- वाळलेल्या पानासारख्याच जुन्या पण अनमोल आठवणी:

माझे बाबा रिटायर झाल्यावर एका संस्थेत अर्धवेळ कामासाठी जायचे. तेव्हा त्यांच्या जाण्यायेण्याच्या बसच्या वेळा अगदी ठरलेल्या असायच्या. ते ज्यावेळी जायचे तेव्हा बसमध्ये शाळेसाठी निघालेलं बरंच मोठं बालमंडळ असायचं. सगळी मुलं वेगवेगळ्या शाळांमधली, इयत्तांमधली. फक्त ती एक बस चालणारी. त्यामुळे बसमध्ये धुमाकूळ घालून कंडकटरच्या तोंडाला फेस आणणारी. पण माझया वडिलांना लहान मुलं, प्राणी सगळं प्रिय. ते इथेही कामाला आलं आणि त्यांची या सगळ्या मुलांशी छान दोस्ती झाली. आम्ही रोज रात्री हे किस्से ऐकायचोच. ती मुलंही आजोबा, आजोबा करत यांच्या मागे. आजोबा, आज मी जागा पकडलीये तुमच्यासाठी, तुम्ही इथेच बसायचं पासून याने माझी पेन्सिल घेतली पर्यंत सगळं बाबा ऐकायचे, सोडवायचे. त्यामुळे आजोबा आणि 15-20 नातवंडं खूष असायची.

एकदा बाबांच्या डोक्यात आलं की आपण या सगळ्या मुलांना एका रविवारी घरी खाऊ खायला बोलावू. आईला म्हणाले ते- आईही खूष. बोलवा म्हणाली. मग हा रविवार की दुसरा यावर सगळ्या नातवंडांच्यात प्रचंड गदारोळ होऊन चर्चा झाली आणि एक रविवार ठरला. संध्याकाळी 5 वाजता सगळे आमच्याकडे जमणार म्हणून. ही मुलं आम्हा कुणालाच घरात माहीत नव्हती, तसेच हे कोणते आजोबा म्हणून मुलांच्याही घरी माहीत नव्हतं. काही जागरूक आया दुसर्या दिवशी बसस्टॉप वर मुलांना सोडायच्या निमित्ताने आल्या आणि बाबांची ओळख करून घेऊन समाधानात घरी गेल्या. बाकीच्या आईबाबांनी कारट्याचे नेहमीचेच उद्योग असतील म्हणून दुर्लक्ष केलं बहुतेक. पण हा अल्पोपहार ठरला ब्वा.

बाबांनी त्या रविवारी अगदी जातीने घर स्वच्छ करून घेतलं अर्थात लॉक डाऊन नसला तरी आम्हीच केलं ते. चकाचक घर. सगळ्या मुलांची बसायची व्यवस्था, पाणी वगैरे- जय्यत तयारी. बटाटेवडे आणि जिलेबी, नंतर कोकम सरबत असा मेनू होता. हा मेनू पण नातवंडांनीच सांगितलेला बरं का. माझी अत्यंत सुगरण आई वडे करत होती तर तिला 1760 वेळा बाबांच्या सूचना- मुलं खाणारेत गं, खूप तिखट वगैरे नको हं. ती आपली नुसती हसून हो म्हणायची आणि आम्हा भावंडांना चक्क मोठे असून असूया वाटायला लागली- कोण टिककोजीराव येणारेत??? शेजारच्यांनीही विचारलं आज काय विशेष? आई म्हणाली- आज यांचे खास दोस्त यायचेत हो. बरं, असले कार्यक्रम सर्रास असायचे आमच्याकडे. त्यामुळे त्यांनाही पटलं.

मग हळूहळू 4.45 पासून ठेवणी तले छांछान कपडे घालून आमच्याकडे एकेकजण यायला लागला. काही जण आईबाबांना घेऊन. मग थोडंस बोलून ते आपले थोडे अवघडूनच घरी जायचे. होते सगळे आसपासच रहाणारे. पण सगळ्यांना कुठे ओळखतो आपण?

एकदाचे सगळे स्थानापन्न झाले. थोड्या गप्पा झाल्या. उड्या मारून झाल्या. आम्ही कौतुकाने पहात होतो बाबांची ही नवी टीम.आता खाऊ खायचा न? हे आईने विचारल्यावर त्यांच्यात नुसती नेत्रपल्लवी झाली. मग थांबा आजोबा, अजून तो *** आला नाही. तो लहान आहे ना... असं एकाने सांगितलं, तेवढ्यात दुसरा ओरडला.. अरे आला बघ तो, आईला घेऊन येतोय.

आलं ते छोटुकलं पात्र. आल्या आल्या बाबांच्या हातात एक मोठी शिसपेन्सिल ठेवली त्याने. बाबा म्हणाले- हे काय? तर सगळे तालासुरात टाळ्या वाजवून हेट्टी बsss ड्डे टी यू... करून ओरडायला लागले. बाबा आणि आम्ही एकमेकांकडे बघून हसतोय नुसते. गाणं संपलं आणि प्रत्येकजण बाबांना शार्पनर, पेन, खडूचा बॉक्स, मोरपीस, बर्थडे कॅप असं काय काय देत होता. सगळ्यांना आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय पण त्या गोडशा गोंधळात काहीही जमेना. शेवटी 10 मिनिटे थांबलो. जरा गोंधळ संपला आणि आई म्हणाली- अरे बाळांनो, आज आजोबांचा बर्थडे नाहीये. मग सगळेच चिमणे लुकलूक पहात- पण आम्हाला बोलावलंय आजोबांनी आज खाऊ खायला. हो ना आजोबा? ते म्हणाले हो, पण मी गंमत करायला, खेळायला आणि खाउ खायला बोलावलंय तुम्हाला. खरंच माझा वाढदिवस नाही आज..

एक क्षण शांतता. आणि मग पेन्सिल घेऊन आलेलं पिल्लू म्हणालं- आजोबा, मग ती मागे खोल्लबल असलेली पेन्सिल मी घेऊन जाऊ घरी? बाबा म्हणाले हो ssss. मग तरीही खाऊ मिळणारे? बाबा हसत- हो. तरीपण मिळणार आहे.

येययययय... करत प्रचंड जल्लोष, ज्याची त्याची भेट ज्याच्या त्याच्याकडे परत आणि खाउपार्टि जोरात.

आम्ही डोळ्यात पाणी येईतो आनंदाने हसलो.

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...