#पन्या:
विसरलात की काय आमच्या पन्याला 2-4 दिवसांत? नाही नं? हं, मग ठिके .
दुसर्या दिवशी पन्या भुताची गोष्ट सांगायला येणार असं माहीतच होतं. मी पावणेचार वाजताच दरवाजा उघडून ठेवला. होतं काय.. बाईंचा हात बेलपर्यंत पोचत नाही आणि धाडधाड आवाज केला तिने की आमचे पिताजी पिसाटतात .
तर दरवाजा उघडला तर चेहऱ्याने माहीत असलेला पन्याएवढाच मुलगा दारात. अतिविनम्र चेहरा करून त्याने विचारलं.. काकू, पन्या आली नाही ना अजून? मी नाही म्हणाले. पण माझा चेहरा पाहून त्यानेच बोलायला सुरुवात केली. मी मानव. त्या तिकडच्या समोरच्या घरात राहतो मी. तुमचे आजोबा ओळखतात मला. मी पपां बरोबर बाहेर जाताना बाय करतो त्यांना.
मी- बरं बरं. तू पन्यासाठी आला आहेस का?
मानव- हो, म्हणजे तुमच्याकडेच आलोय मी. पन्या म्हणाली की आपण दुपारचं आजोबांच्या घरीच खेळत जाऊ. येऊ का मी घरात?
मी आणि नवरा एकमेकांकडे पहायला लागलो- हे अतिमहत्त्वाचं डिल माहीतच नव्हतं आम्हाला. मी खोल आवाजात विचारलं- अजून किती जण येणारेत?
मानव तितक्याच नम्रपणे- सध्या तरी मलाच सांगितलंय बहुतेक तिने. अजून कुणी येणार असतील तर माहीत नाही मला.
आता आम्हा कुणालाच लहान मुलांचा प्रॉब्लेम कधीच नसतो. पण सध्या माझ्या बाबांचा तब्येतीचा प्रॉब्लेम झालाय. हॉस्पिटल मधून घरी आल्यावर त्यांचा दिवस रात्री चालू होतोय आणि उजाडलं की झोपतायत . बरं बळजबरी करून त्यांना जागं ठेवायचे प्रोग्रॅम फ्लॉप गेलेत आमचे. टीव्ही चालू ठेवला तर तो एकटा केकाटत असतो आणि बाबा त्याच्यापुढे झोपतात. पुस्तक, पेपर असं तर कुठच्याकुठं जातं. आणि रात्री जायफळ घालून कॉफी द्या, दूध हळद द्या, रामरक्षा म्हणा नाहीतर काही करा- बाबा जागेच. त्यामुळे त्यांची झोप आमच्या गोंधळात उडू नये असं खूप वाटत होतं. असो. आलिया भोगासी..
तोवर पन्या डॉन आलाच. मानव ला पहाता च म्हणाली- मान्या, माझया आधी आत्याच्या घरी तू का आलास?
मानव- अग, तुझीच वाट पहात होतो. यांनी दार उघडलं म्हणून मी आत आलो
पन्या- बरं, चला खेळू.
नवरा- काय रे मानव - तू आणि पन्या एका वर्गात का?
मानव- हो, म्हणजे शाळा वेगळ्या. आम्ही मराठी आहोत म्हणून मी मराठी शाळेत जातो.ही इंग्लिश मिडीयम मध्ये आहे.
पन्या- आयोव... आम्ही पण मराठीच आहोत की
मानव- मग कशाला गेलीस त्या शाळेत?
मग आधीच एक छोटी चकमक उडाली. आजोबा उठतील मग घरी जायला लागेल न खेळताच. असं सांगितल्यावर ताबडतोब- नको नको, खेळूया.
नवरा म्हणाला - काय रे तुझं नाव मानव काय ठेवलंय?
मानव- अहो, आधी माझं नाव अथर्व ठेवलं होतं. मग बदललं ते.
मी- का?
मानव- काय माहीत. बहुतेक अथर्व चं स्पेलिंग अवघड असणार
पन्या- हॅट.. असं कधी असतं का? मी मराठीत माझं नाव नीट स्पेलिंग काढून लिहिते.
मी- मराठीत कुठं असतं स्पेलिंग?
पन्या- ऑ ऑ-- असतं की. लगेच जमिनीवर बोटानेच 'प्रणिता' अस मराठीत लिहून हे स्पेलिंग नाही तर काय आहे? याला मराठीतलं स्पेलिंग म्हणतात असं ठासून सांगितल.
मी म्हटलं चला चला, खेळायच्या आधी तू कंचना 3 ची गोष्ट सांगणार आहेस ना?
पन्या- हो. दारं खिडक्या लावून घेऊ.
मी- नको ग
पन्या- अहो, घाबरता काय? मी आहे ना. मान्या पण आहे
नवरा- हो. पन्या- मान्या जोडी. पण तरी पन्या, काल तू सुरुवात केलीस ना, तर मला रात्री झोप लागलीच नाही ग. आज नको सांगूस. मला खूप भीती वाटते.
पन्या- रानटी हसत त्याच्यापुढे कमरेवर हात ठेवून- असं कसं?? आता सांगणारच मी. माझे पत्ते डोळे वटार वटार पहाता आणि हरवता नाहीका मला? मग आता मी घाबरवणार.
मी- हसतच - डोळे वटार वटार म्हणजे काय ग?
पन्या- तो शॉटकट आहे डोळे वटारून चा
नवरा- आहा, शॉर्टकट म्हणे.. त्याला शॉर्टफोर्म म्हणतात.
पन्या- हो मान्या?
मानव- परत नम्रपणे. नाही पन्या. तुझं बरोबर आहे. काका, तुमचं चुकलं.सिम्पल नॉलेज.
नवरा- तुम्ही हे सारखं सिम्पल नॉलेज काय म्हणता?
पन्या मान्या एकत्र- आपण दुसऱ्याला सांगताना ते म्हणायचं असतं. आता तरी सांगू का गोष्ट?
आम्ही दोघे- सांग
आता हे पहिल्यांदाच सांगते की हे असले सिनेमे काही मी पाहिलेले नाहीत. त्यामुळे स्टोरी बरोबर असायची शक्यता शून्य आहे बहुतेक. का ते कळेलच.
पन्या- त्या गावात एक काली आणि एक रोझी असते. ती भुतं असतात. ती लोकांना दिसून खूप वेगवेगळे आवाज काढून घाबरवतात. मग खूप माणसं अल्ला को प्यारी होतात.
नवरा मधेच- मग सलमान येतो ना?
पन्या गोंधळून - नाही हो. काली आणि रोझी येतात. ते भूत असतात. सम्मान नै येत.
नवरा- याला काय अर्थ आहे? सलमान असायलाच पाहिजे.
पन्या- मान्या, आहे का रे सम्मान?
मानव- नाही ग, तो नाही यात
पन्या- कळलं का काका? डिशतब करू नका मला.
नवरा- काली कोण असते?
पन्या- परत हसत -अहो हा काली माणूस असतो आणि रोझी गर्ल. एवढपण नाही कळत.
नवरा- अग काली देवी असते.
मानव- हो, ती पुढच्या भागात आहे. दोघ लगेच देवीची पोझ घेऊन- कंचना- काली का करिष्मा यात देवी आहे.
पन्या- एक मिनिस्टर या दोघांना कुचलून टाकतो. मग त्यांचे सपने अधुरे रहातात म्हणून ते भुतं होतात.
मानव- अग ते 10 कोटी रिक्षा मध्ये ठेवलेलं सांगितलंच नाही तू.
पन्या- हं, तर ना आत्या, तो मिनिस्टर 10 कोटी या दोघांना देतो आणि ते जायला लागतात तर कुचलून टाकतो. बस खून कर देता है!
तोवर या मानव चा मोठा भाऊ ओंकार आला. ते प्रकरण सहावीतलं. तो सरळ आत आला आणि म्हणाला.. पन्या आणि मान्या हे दोघेही बावळट आहेत. त्यांना काहीही येत नाही. मी सांगतो स्टोरी.
आम्ही- चालूदे.
पन्याचा इतका प्रचंड अपमान झाला की बास. सरळ गाल फुगवून, डोळे वटारून ओंकार कडे पहात बसली. त्याने एक खडूस लुक दिला तिला आणि त्याने सुरुवात केली-
राघव असतो तो भुतांना खूप घाबरत असतो. त्याचा कबजा घेतात काली आणि रोझी.
मी- राघव कोण?
पन्या- आत्या हा मधली स्टाटिंग???? सांगतोय तुम्हाला. यालाच काही येत नाही.मी सांगते नं..
नवरा- सांग सांग. या ओंकार ला काही येत नाही. आता सलमान येतो ना...
पन्या- हे भगवान... इन्का तो सिर्फ सम्मान, सम्मान डोक्याला हात लावून तेही.
आणि मग पन्या, मान्या, ओंकार यांची स्टोरी सांगण्याची एकत्रित गम्मत चालू झाली. कुणाचा कुणाला पायपोस नाहीच. प्रत्येकाची स्टोरी निराळी. आम्ही डोळ्यात पाणी येईतो हसत होतो कारण तू कसा चुकलास/चुकलीस हे सांगायचं प्रकरण मुद्द्यावरून गुद्यावर कधीच पोचलं होतं. बेडवरच्या उशा फेकून मारण्यात आल्या होत्या, पत्ते एकमेकांत गुंतून त्यांना हवे तसे, हवे तिकडे पडले होते, वेडेवाकडे होऊन. प्रचंड बोंबाबोंब चालली होती. आता झाली आमच्या बाबांची एन्ट्री.
म्हटलं आता तरी सन्नाटा होणार... तर आमचे बाबाच- पन्या- हाण त्याला, ऐकते काय, मानव आता तू.. असले सल्ले द्यायला पुढे. घराचा पार नकाशा बदलला. फक्त हे सगळं हसत चाललं होतं.
त्यातून जे ज्ञानकण मिळाले ते म्हणजे कंचना, कंचना 2, कंचना 3 काली का करिष्मा, कंचना माँ महाकाली का चमत्कार, कंचना रिटर्न्स असे इतके सिनेमे आहेत आणि या गॅंग ने ते सगळे पाहिलेत. त्या सगळ्याची एकत्रित स्टोरी चालली होती आणि म्हणून एकमत होईना.
तासाभराने नवरा म्हणाला- बास आता. सलमान काही येत नाही. आणि तुम्हाला काही स्टोरी सांगता येत नाही. त्यामुळे मी इतकंच ऐकून खूप घाबरलोय आणि आजपासून पन्या आमच्याकडे झोपायला येणार. म्हणजे मी घाबरलो तर तिला उठवेन.
पन्या- नाही. मी नाही येणार. आत्या घाबरल्या तर येईन मी. तुम्ही चिडवता त्यामुळे घाबरा अंधारात एकटेच. तसही मी मम्मी पाशी झोपते.
आणि जाता जाता मला- आत्या, तुम्ही फोन घ्या काकांचा. त्यावर गूगल मध्ये जायचं आणि - पुढे अभिनयासकट- असा तो तोंडासमोर धरून नुसतं म्हणायचं - कंचना3 फुल मूव्ही. ओपोप येतो. मग पहा हं तुम्ही...
जाताना ओरडून- उद्या येते. काकांना नका दाखवू सिनेमा. ते घाबरले तर मी येणार नाही, आधीच सांगते..
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा