4 वाजले की पन्या टणाटण उड्या मारत घरात येणार हा नियमच. तिच्याही घरच्यांना हे
माहीतच आहे. अधून मधून तेच लोक घिरट्या
घालून सगळं आलबेल आहे ना (
म्हणजे आमचं) ते पहात असतात.
पन्याचं लक्ष मात्र अगदी बारीक सगळीकडे. आपण खेळत असताना मम्मी कुठे निघालीय का? बरं मागे लागायचं असतं का? तर नाही. पण चौकशी फुल. तिची ममी पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन जाते बिचारी.
परवा असेच खेळताना मध्येच टुणकन उडी मारून खाली उतरली आणि तिचे पत्ते माझया
हातात देऊन म्हणाली आलेच मी. माझ्यावरचं खेळ आत्या दोन मिनिटं. काकांना पत्ते अज्जिबात दाखवू नको. असं म्हणून काकांना वेडावून दाखवत जोरात पळून गेली. आम्ही दारातून पाहिलं तर दोन तीन गायी दारावरून
चालल्या होत्या.त्यातल्या एका गायीला एक
पोळी खायला देऊन एक मिनिटात आली परत. तिला म्हटलं हात धुवून ये
की..
तर म्हणे गायीला काय
कोरोना झालाय का? काय पण आत्या तुम्ही...
हेहेहे.
तिला म्हटलं, तुला कसं कळलं गायी चालल्यात रस्त्यावरून ? तर म्हणाली हाक ऐकू आली न तिची.. मी रोज पोळी घालते तिला.
मी म्हटलं हो हो, करत तर होत्या हंमा असा आवाज... तर लगेच हंमा नाही काही... पन्या sss अशी हाक मारते ती मला. कळतं तिला सगळं. आम्ही हसायला लागल्यावर गाल फुगवून- मी काही खोटं नाही बोलत. तुम्ही उद्या बघा. 6 वाजता इथून जाताना ती अशी गळ्यातली घंटा वाजवते आणि पन्या ssss म्हणून हाक मारते मला.
मीच म्हणाले- हो ग, कळतं तिला आणि ती तुलाच हाक
मारते. मी पण ऐकलं ना.. मग मॅडम आल्या लायनीवर
मग मीच म्हणाले- चला,आता मला स्वयंपाक करायचाय. उद्या खेळू. यावरही- फुसस्स, 3 तर माणसं आहात तुम्ही. इतकं काय करायचंय? खेळू ना थोडा वेळ असं म्हणालीच. मी म्हणाले अग- भात, आमटी, पोळी, भाजी, चटणी, कोशिंबीर, पापड, काहीतरी गोड असा हा एवढा स्वयंपाक करायचाय मला .. बाता मारायला मलाही मजा वाटत होती. तर लगेच - इतकं रोज? बाब्बो.. आम्ही तर लॉक डाऊन आहेना, म्हणून वन डिश मिल करतो. फटाफट.
माझे वडील- पन्या, वन डिश मिल म्हणजे काय ग?
पन्या- काही नाही. मम्मी ला कंटाळा येतो ना, मग ती एकच काहीतरी करते. पुलाव, मॅगी, वडा, परोठा. ते एकच काहीही करतात ना आजोबा, त्याला वन डिश मिल म्हणायचं. समजलं?
आम्ही सगळे माना डोलावून - हो, कळलं . थँक्स हं पन्या, कसली हुशार आहेस तू...
पन्या- मग.. मला सगळं येतं.
मी- बरं, आज काय करणार तुम्ही वन डिश मिल मध्ये?
पन्या- बटाट्याचा पराठा.
नवरा: आता तो कसा करतात? येतो का तुला?
पन्या: हो sss. कणकेत बटाट्याची भाजी घालून लाटायचा. सो सिम्पल( इथं एवढ्याशा हातांचे पंजे पारी बनवायच्या आणि लाटायच्या action मध्ये.)
नवरा: उगीच तिला चिडवायला-अग... मग त्या भाजीतली ग्रेव्ही? ती सांडेल ना..
पन्या- हॅट.. आमच्याकडं भाजीत ग्रेव्ही नसते. आत्या तुमच्याकडे ग्रेव्ही ची बटाट्याची भाजी असते?
मी:(आता नवर्याची बाजू उचलणेच आले
हो गं.
पन्या: गोंधळून.. आम्ही नाही करत मग. म्हणजे मला माहीत नाही, पण मम्मी करते तेव्हा भाजी सांडत नाही.
नवरा- असं कसं? भाजी रश्शाशिवाय बनते तरी का?
पन्या: बनते.. बनते... ब ss न ss तेss
तुम्हाला ना काका, काहीही येतच नाही.
नवरा- तुला येतं का?
पन्या- म्हणजे काय? मी लहान आहे अजून. पण मी मम्मीकडून शिकतेय सगळं.
मी: हो? काय काय येतं तुला?
पन्या- भेंडीची भाजी आणि पिझ्झा.
नवरा: हे काय कॉम्बिनेशन आहे का खायचं? काहीही टेपा लावतेस तू..
पन्या: किंचाळून.. अहो, हे एकत्र नै खायचं..वेगवेगळ्या वेळी खायचं. एवढं पण येत नाही तुम्हाला काका. मी तुमच्याशी कट्टी आहे.तुम्ही चिडवता मला.
माझे बाबा: जाऊ देत ग, तू मला सांग, भेंडीची भाजी कशी करतात?
पन्या: सिम्पल आहे. मम्मीशेजारी ओट्याजवळ स्टूल
वर उभं रहायचं. मग मम्मीने सगळं चिरून
ठेवलेलं असतं. भेंडी, मिरची, टामाटो(हेच म्हणायचं टोमॅटो नाही). आणि मम्मी सांगेल ते ते कढईत
घालायचं. भाजी तयार. माझे पप्पा म्हणतात पन्यासारखी भेंडीची भाजी
कुणालाच येत नाही.
आम्ही न हसण्याचा आटोकाट प्रयत्न करत: आणि पिझ्झा?
पन्या: एक पॅन घेऊन त्यात बटर घालायचं. action सुरू. कांदा चिरून त्यात फटाफट असा असा करायचा. (इथे एव्हढेसे पंजे परतायची action करतात) मग ढब्बू मिरची पण तशीच करायची. मग अजून कुठल्या भाज्या हव्या तर त्या पण घालायच्या.
नवरा- म्हणजे कोबी, पालक का?
पन्या: आत्या सांगा ना काकांना.. अहो, मश्रुम आणि मका अशा भाज्या घालतात पिझ्झा मध्ये.
नवरा- ओके, मग पुढे काय करायचं?
पन्या: पुढे... पिझ्झा बेस घ्यायचा, त्याला बटर, मेयोनीज, टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस असं लावायचं, ती आपली मगाच्ची भाजी त्यावर पसरायची ( इथे भाकरीवर गोल पाणी
फिरवल्यासारखी action) , हब्ज घालायचे,(हर्ब्ज म्हणता येत नाही आम्हाला)
काका, आमच्याकडे ओव्हन नाहीये म्हणून आम्ही तव्यावर करतो. नाहीतर परत चिडवायला सुरू कराल तुम्ही.
नवरा: नाही ग पन्या, खरंच खूप हुशार आहेस तू. तू खातेस की नाही पिझ्झा?
पन्या- मी फक्त ओनीयन पिझ्झा खाते.
बाकीच्या भाज्या
मम्मी बघत नसताना हळूच काढून टाकायच्या. एक मिनिटांत
आता मी दमलेय सगळं सांगून. मी चालले घरी. उद्या येते मी हं,...
टणाटण उड्या मारत आला तसा उत्साहात आमचा आनंदाचा धबधबा गेला घरी.
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा