कुकातकुका![]()
दुपारी सगळं निवांत झाल्यावर फेबु फेबु खेळत होते. आले एक (नेहमीचेच) काका. मी मनात म्हणतेय आत्ता तर जेवणाची वेळ नाही, खाऊची वेळ नाही, हे आत्ता कसे काय? तर भराभरा आत येऊन म्हणाले - माझ्या मोबाइलची बॅटरी चार्ज होत नाही ग, बघते तुझ्याइथे? मी घेतला फोन आणि लावला चार्जिंगला. बसले बुवा खुर्ची घेऊन. मध्ये माझया हॉटेलच्या ऑर्डर्स चालू झाल्या. तर दिलदारपणे मला त्यांनी सांगितलं, तू पहा तुझा बिझिनेस. मला का sss ही काम नाहीये, मी बसतो चार्जिंग होतं का नाही बघत. म्हटलं बरं, बसा.
अर्ध्या तासाने पाहिलं तर मोबाईल जैसे थे. मग त्या काकांना सांगितलं, म्हटलं, काका,नाही होत इथे चार्जिंग, दाखवा एखाद्या दुकानात. तर म्हणाले आधी बघ की उघडून, साधा फोन आहे माझा. तुमच्यासारखा फेसबुक, व्हॉट्सऍप वाला नाहीये. मग एक छोटं operation केलंच मी, बॅटरी काढून घालणे, सिम कार्ड साफ करून घालणे पण प्रगती इल्ले. म्हटलं नाही येत मला हो.
तर काका- देशपांडे कुठे गेले? त्यांनी काहीतरी नक्की केलं असतं. म्हटलं बाहेर गेलेत. तर आत्ताच कशाला गेले बाहेर? आता मला दुकानात जायला लागेल. मी गप्प.
परत त्यांच्या बोलण्यावरून चार्जिंग ला लावला. अर्ध्या तासाने पाहिलं तर तसाच.काका आपले तू करून बघ काहीतरी. आता रिकामी आहेस ना.. शेवटी मग म्हटलं नाही हो येत मला काका, दुकानात दाखवा तुम्ही.
आत्यंतिक निराशेने म्हणाले- काय तू, मला वाटलं एवढा बिझिनेस करते तू, तुला येईल हे सहज. आता काय... करायलाच पाहिजे मला खर्च.
मी फक्त मागे वळून पाहिलं, मी कॅफेच चालवते ना? चुकून भांड्यांच्या जागी असंख्य मोबाईल दिसतायत की काय?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा