शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

 

#टिल्लूहॉटेलच्याटिल्लूगोष्टी:

एक काका येतात रोज पोळीभाजी न्यायला. एकटेच असतात ते. आज भर पावसात आले म्हणून बसले थोडेसे. म्हणाले, काय सांगू अहो, कंटाळा आला या पावसाचा. कालपासून नुसता पडतोय, कुठं जायचं नाही की यायचं नाही. आत्ता मला जरा बाहेर जायचं होतं तर लागला पडायला. पांघरूण घेऊन झोपावंस वाटतंय. म्हटलं, मग पडायचं ना काका थोडावेळ, नंतर आला असतात, नाहीतर फोन करायचा, आम्ही कुणीतरी आलो असतो. तर एकदम चवताळून म्हणाले,अहो तुम्ही याल पण मला आत्ता झोपलो तर रात्री झोप नाही येत, त्याचं काय?

मी म्हटलं, हे ही बरोबर आहे पण थोडावेळ पडलं तर चालेल की, फ्रेश व्हाल. नाहीतर मग वाचत बसायचं आवडतं ते..

तर म्हणे छ्या छ्या, असल्या सवयी (????) नाहीत आपल्याला. कोण वेळ फुकट घालवणार त्या वाचनात?

मी एकदम संतापून बोलले असते बाकी कुणाला- असल्या सवयी? म्हणजे? वगैरे. पण "कंट्रोल सविता, कंट्रोल", कष्टम्बर है ये, हे लक्षात ठेवून म्हणाले, मग काका,टीव्ही पहायचा.

तर अजून चिडून- काय असतं तरी काय त्या टिव्हीत? जिकडे तिकडे त्याच बातम्या फिरवतात लेकाचे. आणि हल्लीचे युसलेस सिनेमा तर बघायला सांगूच नका. अजिबात आवडत नाहीत मला ते😢

मी म्हणाले अहो, मग तुमच्या केबल वाल्याने एक ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा चॅनेल दिला असेल ना, तो पहायचा. त्यावर जुने जुने सिनेमे लागतात की.

तर भारी उत्तर- आहे की आहे. मी शाळेत असताना जो फूल और पत्थर पाहिला होता तोच त्या चॅनेलवर रोज लावतात. xxxxx लोक आहेत अगदी. म्हणजे त्या चॅनेलचे पैसे मीच भरायचे, मी पाहिलेला सिनेमाच परत पहायचा, वरती लाईटबिल पण मीच भरू म्हणता की काय त्याचं? याला काय अर्थ आहे?त्यापेक्षा मी जागा राहीन.

मी ( मनातल्या मनात)- हो शक्तिमान

उघडपणे फक्त हतबुद्ध 🙁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...