बुधवार, २९ जुलै, २०२०

 

 #टिल्लूहॉटेलच्याटिल्लूगोष्टी:

भोचक आजी:

या लॉक डाऊन मुळे इतका त्रास झालाय की बास. पहिला लॉक डाऊन बराच मोठा होता, त्यामुळे आल्यावर अगदी आजच व्यवसाय चालू करतोय असंच फीलिंग आलं होतं. पण साफसफाईत एक दिवस घालवला तेव्हा नेहमीचे लोक आपुलकीने अरे वा, कधी करताय चालू? वगैरे विचारून चौकशी करून गेले आणि मग खऱ्या अर्थाने बरं वाटलं. याला अपवाद समोरच्या आजी. काय आलात का परत? हे विचारलं आणि डोक्यात सणकन एक तिडीक गेली. नेहमीचा खवचटपणा कळतो ना, पण हो म्हणून दुर्लक्ष केलं आणि लागलो कामाला

मग एकेका कस्टमर चे रिव्ह्यू यायला लागले. काकू, तुम्ही नव्हता नं, तर एकदा आम्ही चाललो होतो रस्त्यावरून. त्या आजी म्हणतात कशा-आता हॉटेल बंद पडलंय त्यामुळे तुमची अगदी गैरसोय होत असेल ना? काय करायचंय हो त्यांना?

दुसऱ्या एक काकू म्हणाल्या- अहो या आजींना काय करायचं आहे ना? पण रोज मला या विचारतात- हे हॉटेल बंद तर भाज्या येतात का करता तुम्हाला?

तिसऱ्या एकाला विचारलं, काय रे जेवतोस की नाही हल्ली? की हे तुमचं लाडकं हॉटेल बंद आहे ना, म्हणून विचारते हं मी.

आमचे नेहमीचे कस्टमर चालले रे चालले रस्त्यावरून की टोचलच यांनी. कायमस्वरूपी डेरा गॅलरीतच, त्यामुळे कुणीही नजरेतून सुटतच नाही त्यांच्या.

आमच्याकडचे पदार्थ कसे असतात ते विचारलं तर काही नाही हो, ती उत्सुकता असू शकते, पण येतं का येतं बरं करता तिला? हा प्रश्न म्हणजे वैताग आहे. बरं, इतक्या पंचायती आहेत तर घ्या ना विकत आणि पहा मला येतं का, सांगा सुधारणा हवी असेल तर.. पण ते नाही. 1 रुपयांची कस्टमर नाही आमची पण आम्ही किती पैसे मिळवले, किती काय विकलं याची बित्तंबातमी आम्हालाही नसेल एवढी त्यांना असते.

लॉक डाऊन च्या काळात अगदी सुरुवातीला उलटसुलट बातम्या यायच्या, कधी चालू असेल, कधी नाही, तर त्या काळात मध्ये माझा आतेभाऊ येऊन गेला. सहज . त्याने गाडी वळवता वळवता पकडला त्याला. तुम्ही कोण, काय, कशाला आला होतात वगैरे. त्याने सांगितलं .म्हणाला, बहिणीचंच हॉटेल आहे. मी करतो तिला फोन. तर म्हणे कोणती बहीण? तरीच तुम्ही त्यांच्याकडे आठवड्यातून दोनदा तरी दिसताच. त्याने तिथून कसाबसा पळ काढला. त्याने आम्हाला सांगितलं तेव्हा हसलो आम्ही पण राग आलाच

आता काल मामी आली माझी. छानपैकी सगळ्यांसाठी जेवण घेऊन जायला आली होती. मग मारल्या आम्ही गप्पा. जाताना तिला रिक्षेऐवजी नवरा म्हणाला मी सोडतो तुम्हाला. म्हणून गेले ते दोघे. तर मला लगेच- तुमच्या आत्याला सोडायला ते का गेले? तुम्ही जायचं ना, बरं वाटलं असतं जावयापेक्षा भाचीबरोबर जायला.. मी म्हणाले -इथे काम राहिलंय माझं म्हणून. आणि ती मामी आहे माझी.

तर यावर गप्प बसेल एखादी, पण या- नाही, आत्या आहे तुमची. मी तो तुमचा भाऊ येतो त्याच्याबरोबर पाहिलीये हिला. तो सारखा येतच असतो ना तुमच्याकडे... यांना मात्र दोनदाच पाहिलं. आज काय बराच वेळ बसल्या?

आता मात्र इतक्या दिवसांचा राग आलाच बाहेर माझा. मी म्हणाले- अहो आजी, माझी आत्या की मामी ते तरी मलाच माहीत आहेना तुमच्यापेक्षा? आणि माझा भाऊ का येतो, कशाला येतो हे त्याला विचारलंत ना रस्त्यात अडवून? मग परत काय आहे? आमच्यावाचून कुणाचं अडलंय, का,सगळं सगळं कशाकरता लागतंय तुम्हाला?

यावर एखादा कानकोंडा होईल ना? पण या- असूदे, नंतर बोलू आपण . मला किनई ऐकूच येत नाही हल्ली.

म्हणजे कर्म माझं

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...