S ept.1,2020
#पिंपळपान- जुन्या सुंदर आठवणी
नवीन नवीन आर्टिकलशिप ला सुरुवात झाली होती, आणि गणेशोत्सव आला. तेव्हा मी इतकी अफाट हुशार होते की नदीपल्याडच पुणं फार माहीतच नव्हतं.
आमचा आपला सेनापती बापट रोड, कर्वे आणि प्रभात रोड, नाहीतर नातेवाईक जिथे, तेवढा पेठ एरिया यापलीकडे नसतंच काही यावर ठाम विश्वास ;)
मग आर्टिकलशिपसाठी ऑफिस मिळालं ते एकदम स्वारगेटला... असं कुठं असतंय होय?? पण मिळालं. मी जॉईन झाले तेव्हा सगळे नोव्हेंबर attempt साठी रजेवर होते. 2- 4 जण असायचो ऑफिसमध्ये फक्त. त्यात अनंत चतुर्दशीच्या आधीच्या दिवशी मी ज्या कंपनी च ऑडिट करत होते त्यांचे अकाउंटंट,
मालक असे लोक आले आणि कामात भरपूर उशीर झाला. लक्षात आलं तेव्हा 9 वाजले होते. माझ्याकडे त्या दिवशी गाडी नाही, बसेस हिराबाग चौकापासून बंदच झालेल्या आणि आता घरी कसं जायचं?
सर म्हणाले आम्ही कुणीतरी सोडतो तुला. तिथे अगदीच नवीन म्हणून जोरात म्हटलं नको नको, मी जाते व्यवस्थित. तरी सर म्हणाले 15 मिनिटात बस नाही मिळाली तर इथे परत ये. आम्ही येऊ. मी हो हो करत बाहेर पडले. हिराबागेच्या पुढे गेले. रस्ता नुस्ता गर्दीने ओसंडलेला,
आणि मला फक्त घरी जायचं होतं. उशीर होईल हे घरी फोन करून सांगितलं होतं, ते दुपारी 4 ला![]()
. मी निवांत. आपण सांगितलंय उशीर होणार. हुशारच पहिल्यापासून.
नंतर बस कुठे मिळतेय..
माझ्या सारखे चुकले माकले 7-8 जण थांबले होते स्टॉप वर. एक बस आली. फक्त 'शिमला वाले चढा.' अतिगर्दीतून कंडक्टर ची धमकीवजा आरोळी ऐकू आली. तो तर दिसला ही नाही. लोक नुसते सांडू पहात होते बसमधून. मी अत्यंत डेरिंगबाज असल्याने सोडून दिली बस. एवढ्यातच 15 मिनिटे होऊन गेली होती. पण मी तिथेच थांबले. साधारण 10 च्या सुमारास एक बस आली. तीही तशीच अति गर्दी वाली. ती शिवाजीनगर ला जाणार होती. पण डेक्कनवरून.
अरे वा, हे बरंय, म्हणून चढले. ती बस कुठून कुठे फिरत राहिली गर्दीत,
मला काही कळेना. कधीतरी कळालं मला की अलका च्या चौकात पोचलो आपण. डेक्कन कॉर्नर आल्या आल्या पटकन उतरले.
आपलं नशीब पहिल्यापासून जोरावर. एक रिक्षा नाही गुडलक चौकात. असती तरी एकटी नसते गेले बहुतेक. निघाले चालत. गणपतीचा शेवटचा दिवस म्हणून रस्त्यांवर गर्दी नीट होती. त्यामुळे भीती वाटली तरी भरभर चालत जात होते. मध्येच निर्मनुष्य जागा आली की यच्ययावत स्तोत्र म्हणायची. पाऊण तास लागतोच घरापर्यंत चालत जायला. तसा तो लागलाच. आधीच मी घाबरलेली, त्यात आई- आजीने सगळा शेजार अंगणामध्ये गोळा केलेला. म्हणजे किती फेमस असावं एखाद्याने किनई???
मी घाबरत पुढे गेले तसा सगळ्या बाजूंनी एकदम हल्ला- अग होतीस कुठे, वाजले किती? आलीस कशी? एकटीच कशी काय? 12 वाजलेत, 9 वाजता निघालीस ना?
आईशप्पत.. गरगरायलाच लागलं. मग आपलं हक्काचं हत्यार काढून सरळ रडायला सुरुवात केली. आधीच खूप घाबरल्याने सोप्पंच होतं ते![]()
.
आता माझी अवस्था कळायला लागली सगळ्यांना. आजीने हातात सूत्र घेतली आणि म्हणाली- अरे, येऊ तरी द्या दिला घरात..जेवली सुद्धा नाहीये ती. नंतर विचारुया.
मग घरी आले. सगळे असे अचानक अंगावर आले, सगळ्यांना बोलावून ठेवलं म्हणून अजिबात जेवणार नाही मी असं सांगून व्यवस्थित मस्का लावून घेतल्यावर जेवलेच नीट. ![]()
![]()
मग आईने सांगितलं, 9.30 पर्यंत
वाट पाहून ऑफिसला फोन केला तर कळालं की मी 9 लाच निघाले. 12 वाजून गेल्यावर त्यांचं तरी काय होणार? आधी सरांना फोन केला बाबांनी, आमचं पार्सल आलं घरी चालत नीट
. दुसऱ्या दिवशी सुट्टी म्हणून काल कशी दमले, कशी एकटी आले म्हणून मस्त भाव खाल्ला.
अजून अनंत चतुर्दशी आली की ही आठवण येतेच. ती गर्दीची बस, रात्रीचं घाबरून एकटीने चालणं, धमाल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा