शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

 

शिक्षकदिन:

आज शिक्षकदिन म्हणून प्रत्येकजण आपल्या गुरूंना नमन करतो. पण आज एक कधीकाळची शिक्षिका म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांनाच धन्यवाद देण्यासाठी ही पोस्ट लिहितेय. खरं तर शिक्षक होणं जितकं अवघड आहे, त्यापेक्षा अवघड आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला चांगलं शिक्षक म्हणून गौरवणं आहे.

मला माझ्या आयुष्यात शिक्षिका होण्याची संधी आपोआप चालून आली. नुकतीच आर्टिकलशिप संपवून एक छोट्या नोकरीला लागले होते. रविवारी मैत्रिणीबरोबर सिनेमाला जायचं आधीच ठरवलं होतं. तिची नोकरी दुपारी 1 पर्यंत असायची. ती होती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात. मी तिला भेटायला गेले तर ती जागेवर नव्हती. तिचे सर म्हणाले बस इथे, येईल ती. बसल्यावर माझी मुलाखतच घ्यायला लागले. तू काय करतेस? कुठे रहातेस, मार्क किती . मी सांगितलं, तर म्हणाले, इथे अकाउंट्स, ऑडिट, इकॉनॉमिक्स शिकवायला हवंय कुणीतरी. शिकवशील का? मी आउट. म्हटलं अहो, मी नोकरी करतेय, शिकवण्याचा अनुभव शून्य. तर म्हणाले रविवारी असतात लेक्चर्स. आणि हे सगळे मोठे लोक असतात शिकणारे. एक तर मिलिटरी मधले असतात, ज्यांना प्रमोशन साठी एम. बी. . आवश्यक असते, किंवा असे लोक जे रेग्युलर कॉलेजला जाऊ शकत नाहीत. ते सगळे सिंसीअर असतात. तू ये. मी ताबडतोब सांगितलं, मला नाही जमणार हो, तर म्हणाले ते मी पाहतो. तू शिकवताना मी बाहेर उभा राहीन क्लासच्या. तुला काही व्हायला लागलं तर मी क्लास घेईन. ok? मी म्हणाले अहो पण सर, तुम्हाला का वाटतंय मी शिकवेन म्हणून? तर म्हणाले तुझं acedemic record आणि तुझी बोलायची पद्धत. मला मनीषा ( माझी मैत्रीण)मुळे तुझ्याबद्दल माहीत आहे. गो अहेड. मी टाईमटेबल मनीषा बरोबर पाठवतो. पुढच्या रविवारी सकाळी 8.30 ला ये. खरं सांगते पुढचा आठवडा असल्या टेन्शनमध्ये काढला की बास. एकदा त्या सरांना फोन पण केला - अहो नाही जमणार मला. ते म्हणाले कसं जमत नाही बघू ना आपण.

आला एकदाचा रविवार. गेली आमची पालखी कॉलेजला घाबरत. आई म्हणाली होती, तुला येणार - जा बिनधास्त. 😊

क्लास चालू व्हायच्या आधी धडधड, घाबरगुंडी सगळं झालं, ताप पण आलाय की काय कोण जाणे असं त्या सरांना सांगून झालं. पण ते ठाम. तुला चक्कर आली तर मी पकडेन मागून. काही होत नाही. यात सांगायचं म्हणजे अकाउंटस असल्याने विषयाची भीतीच नव्हती. गेले वर्गावर. प्लॅटफॉर्म वर चढले आणि समोर पाहिलं, तर चांगले शंभर विद्यार्थी. सगळे हजर. यांच्यात क्लास बंक करतच नाहीत की काय? आले आपले सगळे😢. आणि शिक्षिका सगळ्यात लहान. बाकी सगळेच वयाने, अनुभवाने कितीतरी मोठे. यांना शिकवायचं आहे या कल्पनेनेच परत एकदा गारठून गेले. जिभेला कोरड पडली. संपलं आता इथेच सगळं असं वाटेतो एक विद्यार्थी उठले. उठलेच म्हणायला हवं, माझ्या दुप्पट वयाचे मिलिटरी मध्ये उत्तम पोस्टवर असणारे ते एक अधिकारी होते. ते म्हणाले- ma'am, you are our new teacher no? glad to meet you. we will introduce ourselves to you in first 10 minutes so that you will feel relaxed. see, evenif you are much younger than us, you are our teacher. हुश्श. जरा बरं वाटलं. ओळख परेड झाल्यावर जी मी विषयाला सुरुवात केली ती 2 तास झाल्यावरच थांबले. बाहेरून सर 👌👌अशी खूण करून निघून गेले. (हो, मुक्त विद्यापीठात 1 लेक्चर दीड ते 2 तास असायचं). लेक्चर संपल्यावर सगळे विद्यार्थी माझ्या भोवती गोळा झाले. you taught very good, ma'am thanks . . कौतुकफूलं झेलून झाली. मग आलं सरांकडे उडत उडत. ते हसत म्हणाले- गेली का धडधड आणि ताप? मला माहीत होतं, तू व्यवस्थित शिकवशील. माझी निवड चुकणारच नाही. तेव्हा लक्षात आलं, आपण मजेत आहोत की. त्यानंतर 13 वर्ष मी अगदी मस्त शिकवत राहिले तिथे . 100% विद्यार्थी उपस्थिती सह. प्रत्येक वेळी हे विद्यार्थी नवीन नवीन पण मोठेच असायचे. मी त्यांना विद्यार्थी म्हणून घडवलं म्हणण्यापेक्षा त्यांनीच मला यशस्वी शिक्षिका म्हणून घडवलं म्हणायला हवं. कारण बाहेरच्या दुनियादारीत हे सगळेच माझ्यापेक्षा बाप लोक होते. माझं कदाचित तेव्हा फक्त पुस्तकी ज्ञान असेल, पण वास्तव जगात हेच खरे मोठे होते. ते जाणवू देता माझ्याकडून शिकणे हे माझ्या साठीच फार मोठं होतं आणि आहे.👍

त्यामुळे आजच्या शिक्षकदिनी माझा माझ्या विद्यार्थ्यांना सलाम. त्यांनाच वंदन.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...