रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

 #पन्या

हल्ली कॅफे चालू झाला त्यामुळे पन्या भेटणं कमी झालंय. ती गाढ झोपेत असताना आम्ही निघणार आणि रात्री पोचतो तेव्हा ती टीव्ही पहाण्यात मग्न. नाही म्हणायला माझ्या बाबांना मात्र ती चुकता पिडायला येतेच. आत्या कुठाय? कधी येणार? इतकं काम कशाला करते ती? शेवटी एकदा बाबा म्हणाले अग पनू, कामासाठी जाते ती? तिची गाडी बाहेर नाही म्हणजे ती आली नाहीये. हो ना? सारख सारखं काय आहे आत्याकडे? तर सरळ- होमवर्क कोण करणार मग माझा? माझे बाबा- म्हणजे? आत्या तुला होमवर्क करून देते? येऊंदे तिला.. त्यावर- अहो आजोबा, तसं नाही. ती मला answers सांगते, मी लिहिते. सिम्पल लॉजिक. आणि हे सांगताना वरचा सा लावलेला, अखंड उड्या मारणं चालू. आणि एकदा ही वस्तू हातात घे, एकदा ती. हे पाहिलं की माझ्या बाबांचं bp वाढलंच म्हणून समजा😊😊. पनू, एका जागी बस. ते हातात घेऊ नको, ठेव खाली म्हटलं की बरं, म्हणून ती वस्तू खाली ठेवून दुसरी हातात. एनर्जी इतकी अंगात की बाबांना ती सहनच होत नाही हल्ली. दोन तीन दिवस बाबांना विचारून विचारून तिने हैराण केलं. मग आम्ही घरी आल्या आल्याबाबा म्हणाले, चिमी आहे का जागी बघ आधी. रोज तुझ्याकरता येऊन जाते तीन तीन वेळा☺ .म्हटलं बरं, जाते. तोवर बाई होमवर्क च्या वह्या, पप्पांचा मोबाईल घेऊन आल्या नाचत. एक बूट सोफ्याखाली, दुसरा दिवाणाखाली एका क्षणात उडवून, सगळा जामानिमा खुर्चीवर टाकून उड्या मारून धाडकन गळ्यात पडत- मी नेमच धरून बसले होते. सापडलीसच तू. चल, आपण हिस्ट्री चा होमवर्क करू असा निर्णय घोषित करून झाला. मी हे लिहायला जेवढा वेळ लावला त्याच्या एक शतांश सेकंदात एवढं सगळं झालं होतं. मी म्हटलं, अग, फ्रेश होउदे की मला. तर- होमवर्क करायला काय फ्रेश व्हायचंय, चालतो की हाच ड्रेस. हे ऐकवून झालं. मग बाबांनी तिला 5 मिनिटे एका जागेवर बसलीस तर आत्या तुला मदत करेल असा दम दिला. आता यावर हा प्राणी घाबरत नाही. आजोबा, आत्याला फ्रेश होउदे. मी 5 मिनिटांनी येते. असं सांगून मला हळूच सांगून गेली - तुझे आजोबा खूप रागावतात सारखे सारखे. एका जागी बस, एका जागी बस. मी चालले😊😊

आली बरोब्बर 5 मिनिटांनी. झालीस का आत्या फ्रेश? चला होमवर्कला सुरुवात करायचीय. हे बघ, मी पप्पांचा मोबाईल आणलाय, त्यातून सगळे questions रफ बुक मध्ये लिहिलेत. तू answers सांग पटापटा, मी लिहिते आणि घरी जाऊन फेअर करते. सगळं ठरवलेलंच असतं आमच्याकडे😊. तरी नवरा म्हणाला - येडछाप, एकदम फेअर करायचं ना, नाहीतरी तू कुठे शोधतेस काही? आत्या तर सांगणार तुला. तर पनू- आहाहा रे काका, आत्या भराभर सांगते, मग मी भरभर लिहिणार. त्याचा फोटो टीचरला पाठवायचा तर चांगला नको वाटतं? मग नवरा म्हणाला- स्वतः अभ्यास करायचा. मग त्या answers चा फोटो छान येईल. आत्या नाही सांगणार काही तुला. मग रडवेली होऊन, का रे काका, माझी मम्मी आणि पप्पा मराठी मेडम (हा पनूचा शब्द) मध्ये होते म्हणून मी येते ना? आणि आत्या सांगते मला. तू कशाला भाव खातोस? हे नवऱ्याला ऐकवून झालं. पण तोही त्या दिवशी अगदी म्हणालाच- तू chapter वाचलास का? नाही. टीचर ने पाठवलेला व्हीडिओ पाहिलास का? नाही. मग तुला आयती उत्तरं आत्या सांगणार नाही,मी रागवेन तिला. मग पटलं पन्या डॉनला. आणि फक्त आज मदत कर, नंतर मी होमवर्क करून दाखवायला येईन हे कबूल करून बसल्या मॅडम.

25 प्रश्नांपैकी जेमतेम 5 प्रश्नांची उत्तरं लिहिली असतील तिने. त्यात एकदा पेन्सिल ला टोक करून झालं, मग खोडरबर विसरलं म्हणून घरी जाऊन आली, मग मास्क विसरला. आता सगळं जमलं तर आमच्याकडे पाहुणे आले. मग उरलेला उद्या करूया होमवर्क म्हणून घरी गेली.

नंतर 2 दिवस काही भेट नाही पन्याची आणि आमची. बाबांना विचारून जायचीच ती. आणि मग परवा अगदीच दमणूक झाली होती म्हणून सुट्टी घेतली आम्ही. हा तर सर्दीने आडवा, त्यामुळे झोपून. मी बाबांना घेऊन जरा बाहेर गेले तर येताना ही दारात. मी सगळा chapter learn केला आणि सगळी answers लिहून पाठवला होमवर्क. तुला सांगितलं आजोबांनी? थाटात विचारलं बाईंनी. मी काही म्हणणार एवढ्यात माझे बाबा म्हणाले- अग सांगणार होतो, पण तुझा पेपर टीव्ही वर दाखवला ना मगाशी? सगळी उत्तरं चुकलीत तुझी. आत्याने सांगितली ती पहिली 5 उत्तरं फक्त बरोबर. बाकीची चूक. 5 मार्क्स दिलेत तुला, आऊट ऑफ 25. मग मला फार वाईट वाटलं पनू.. म्हणून आत्याला नाही सांगितलं मी.

पन्या- काय? शक्य म्हणजे शक्यच नाही. impossible. मी शप्पत म्हणजे शप्पत learn केल सगळं. तुम्ही गंमत करताय माझी , हो आजोबा? सांगा बरं कुठला चायनेल?

माझे बाबा- चायनेल नाही , चॅनेल.

पन्या- आजोबा, तुमचं चूक. चा--ने- असच म्हणायचं असतं.

बाबा- हो का? बरं, DD सह्याद्री वर दाखवत होते

पन्या- सह्याद्री? अहो आजोबा- म्हणजे मी विचारलं स्टाल, झी का कलल? कशावल दाखवलं?

बाबा- अग सह्याद्री पण एका चॅनेल चं नाव आहे

पन्या- किती नंबर ला लागतो?

बाबा- आमच्याकडे पन्नास. फिफ्टी

पन्या- awww, फिफ्टी ला झी सिनेमा आहे. कंचना थ्री....

बाबा- पुरे. आमची हाथवे केबल आहे तर आमच्याकडे फिफ्टी ला सह्याद्री लागतो. तुमची वेगळी आहे ना.. तर मला नाही माहीत नंबर. 'पपाना विचार.

पन्या- ... त्यात काय .. आमच्याकडे lg ची केबल आहे.

बाबा- हसत - अग lg चा टीव्ही असतो. केबल नाही.

पन्या- आत्या बघ , मला चिडवतात, आमच्या lcd वर सरळ सरळ lg लिहिलंय.

बाबा- ok, मग lg चा नंबर 'पपा ना विचार. त्यावर दुपारी 1 ते 3 educational प्रोग्रॅम असतात. आज तुमची स्कुल होती.

पन्या- टेन्शनमध्ये- फोटो पण दाखवला माझा?

बाबा- मग? तुझ्या ऍडमिशन च्या वेळी दिलाय ना शाळेत? तुझी एलिझाबेथ टीचर पण होती.

ती म्हणाली,Iwill punish Pranita.

पनूची दाणादाण. ताबडतोब आमच्या घरात जाऊन तिने नवऱ्याला उठवलं माझया. काका उठ. माझा फोटो आला होता आज सह्याद्रीवर? आता हा आजारी,त्यात झोपेतून उठवलेला, पन्याचा गोंधळ त्याला कळेचना. मी आणि बाबा हसतोय म्हटल्यावर पुढची स्टोरी याने अशी काही रंगवली की पन्या पार कसनुशी झाली. मी केला होता अभ्यास, पपांचा फोनच बेकार असणार म्हणून मला वेगळं दिसलं असेल, त्या फोनचा डिस्प्लेच चांगला नाहीये वगैरे सांगून झालं. नवरा म्हणालाच, गबस.. अभ्यास नाही करायचा आणि डिस्प्ले गेला फोनचा म्हणायचं.😢

शेवटी मलाच कसंतरी वाटायला लागलं. मी सांगूनच टाकलं, पन्या, नाही , आजोबांनी गंमत केली तुझी. तर तिला आधी खरं वाटेना, मग खात्री पटल्यावर काकाला मजेत गुद्दे मारून- आजारी आहेस तरी माझी खोड काढतोस काय? म्हणून जोरजोरात ओरडून, जंगली हसून, टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. आजोबांचे डोळे गोंधळ पाहून मोठे झालेत कळल्या कळल्या अगदी साळसूदपणे- आजोबा, मी नाही चिडले तुमच्यावर. आता मी खूप अभ्यास करीन हे वचन देऊन झालं आणि जाताजाता परत- काकोबा, माझी गंमत करतोस काय, बरा हो मग मी पण तुझी गंमत करणार. मला एकटी आत्या आवडते. असं सांगून गेलं पाखरू उडून, पप्पा , मी टीव्ही वर दिसले नाही, माझा पेपर दाखवला नाही ओरडत.

मुकेश शेठ आले विचारायला, टीव्ही? तुझं काय काम टीव्हीवर? तर सांगतेय- अहो माझा पेपर आणि माझा फोटो सह्याद्रीवर येणार होता, पण आता नाही येणार. समजलं? गेली पळत खेळायला.

मुक्या पोरीकडे कसली गॉन केस आहे म्हणून पहात बसला नंतर.😊 लाडाची लेक त्याची..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...