रविवार, ५ एप्रिल, २०२०

 

मुक्तक:

धावतेय धावतेय नुसती... इतकं धावतेय.. खाचा खळग्यातून,काट्याकुट्यातून.. कुठून आले आणि कुठं चाललीये काही कळतच नाहीये. उर फुटेस्तो चाललीये तरी कुठे मी? टाचा पार भेगाळल्यात, रक्ताळल्यात. कपडे , केस कसलं म्हणून भान नाहीये मला.. भेलकांडत, तडफडत, धडपडत धावत सुटलीये सैरावैरा.. का? का???

पण तुला नाही विसरलेली. तोंडात फक्त तुझंच नाव आहे. यच्चयावत सगळी जी जी येतात ती सगळी स्तोत्रं, मंत्र अखंड चालू आहे मनात.. तूच, तूच तो तारणहार आहेस अशी अगदी खात्री पटलीये माझी. पण दिसणार तरी कुठं, कधी? काहीच कळत नाही. तोवर ही अशीच धावपळ चालू रहाणार वाटतं माझी.

पण नाही रे.. मनात कुठंतरी नक्की माहीत आहे, त्या कैलासाच्या पायथ्याशी पोचेन न मी, तेव्हा त्या साऱ्या हिमालयाच्या पसाऱ्यात एक स्वयंप्रकाशी कोपर्यातून तू, हे कर्पूरगौरा, तुझ्या अतिकोमल, अर्धवट उमललेल्या कमळासारख्या सुकोमल लोचनांनी माझीच वाट पहात असशील. अगदी स्वर्गीय प्रेमाने....

माझा सगळा व्याप, ताप घालवण्यासाठी.

हो ना महादेवा??

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...