#पन्या:
मध्यंतरी एकदा अशीच दुपारीच 12- 12:30 ला पन्या डॉन ने एन्ट्री मारली घरात.
बाबा पूर्ण शक्तीने- पन्या- किचन मध्ये जायचं नाही एकदम.
पन्या: एकदम कुठे? आधी बाहेरच्या खोलीत आलीये की. आत्या कुठंय?
बाबा: ती स्वयंपाक करतेय.
पन्या: मी बघायला चाललेय आत.
बाबा: हो आणि..
पन्या: माहीत आहे, दंगा करायचा नाही, उचकापाचक करायची नाही, ओरडून बोलायचं नाही. मी जाते.
आल्या मॅडम किचन मध्ये.
आत्या, पोळ्या करताय? वा वा, मला आवडतं पहायला. मी इथे उभी रहाते. काय?
मी- रहा की. मी नाही म्हणाले तर जाशील का?
पन्या: सव्वाल ही नै.
मी: डोंबल माझं.
पन्या: अरे वा, पोळी तो मस्त गोल गोल लाटती हो तुम. मेरे मम्मी को भी नही आती😊 और फुगती भी है!wow
मी: पन्या एकतर हिंदी नाहीतर मराठीत बोल.
पन्या: पण मेरको ऐसा बोलनाच अच्छा लागता है!
आता एकदम विषयावरून उड्डाण- काकू,आपलं आत्या, तुम्ही काय काम करता हो?
मी: आमचं छोटं हॉटेल आहे.
पन्या: this is impossible
मी: का? का impossible?
पन्या:तुम्ही तर टी शर्ट आणि जीन्स घालता. हा ड्रेस इंजिनिअर चा आहे ना... मग तुमचं हॉटेल कसं काय असू शकेल?😊😊
मी: का? जीन्स घातली की हॉटेल नाही का काढायचं?
पन्या: काय माहीत. पण मी हॉटेल ला जाताना शरारा घालते. नाहीतर मग छान कॅप्री आणि टी शर्ट.
मी- अग, तिथे मी खायला नाही जात, मी बनवते पदार्थ.
पन्या- आईशॉट.. म्हणजे तुम्हाला खूप पदार्थ येत असणार
मी: हो मग.. पण तिथे मी मटण, चिकन नाही करत. तुला आवडतं ना खूप.. मी फक्त व्हेज करते.
पन्या: अहो आत्या, लॉक डाऊन आहे. काय महा ssss ग आहे मटण माहीत आहे? पप्पा म्हणाले आत्ता नाही खायचं.
मी: हो? किती महाग आहे मटण?
पन्या- ते काही माहीत नाही. पण खूप असणार. मी हट्ट केला तर खूप रागावले आणि म्हणाले- इतकं महाग मटण आत्ता आणणार नाही. आणि लॉक डाऊन मध्ये चांगलं मिळत नाही. थोडे दिवस थांब. म्हणजे नक्कीच मिळत नसणार.
नवरा:मिळतं ग मटण, उगीचच तुला पप्पांनी सांगितलंय.
पन्या: OK. मी घरी परत हट्ट करून पहाते. निदान चिकन तरी आणतील मग.
मी: मम्मीला सांग ना
पन्या: (अतिगंभीर चेहरा करून हात इकडून तिकडे आणि डोळे मोठे करून) काही उपयोग नाही. मम्मी ऐकते, ऐकते आणि मग..
नवरा: मग?
पन्या: हे सटासट सटकावून काढते. त्यापेक्षा मी व्हेज खाईन तुमच्या हॉटेल मध्ये😊😊
आम्ही हसून हसून गप्प. मग अचानकच-
आत्या, तुमची जात कुठली हो?
मी, नवरा अवाक- जात? हे काय मधेच?
मग आमचे चेहरे पाहून - थांबा- डरो मत. आलेच मी.
पन्या पळत घरी गेली आणि 2 मिनिटात परत. अहो-रास रास. ते नाही का पेपरमध्ये येत? मी उच्चीक (वृश्चिक) आहे. तुम्ही?
मी: काय माहीत.
पन्या: विचारून घ्या ना आजोबांना. मग कळत आपल्याला मोठेपणी आपण कोण होऊ शकतो. माहीत नसणं फार डेंजर असतं.
मी: तू कोण होणार?
पन्या: अहो, ठरवायचे आहे मला अजून.
नवरा: पन्या, काहीही ठरव, पण आधी अभ्यास करायला लागतो त्यासाठी. तू नुसती खेळत असतेस दिवसभर.
पन्या: मग शाळाच बंद आहे तर मी तरी काय करणार?
मी: पन्या, थोडा थोडा अभ्यास करायचा रोज, म्हणजे शाळा चालू झाली तर तुला येत असेल काहीतरी.
पन्या- I hope स्कूल लौकर चालू होऊ देत. I miss my school.
नवरा: हो का? पाढे येतात का? टेबल्स?
पन्या- हो, आम्हाला 13 पर्यंत आहेत.
नवरा: म्हण बरं 7 चं टेबल..
पन्या- चालू झालं टेबल. सेवन फाईव्हज आर ... ला गोची झाली. मग काकांकडे लक्ष जाताच फक्त हाच मला येत नाहीये आत्ता. माझा पाठ होता. मी फाईव्ह नाहीतर टेन चं टेबल म्हणू का?
नवरा: चल चल. सोपी टेबल्स म्हणून दाखवते का? 13 चं म्हण मग.
पन्या: not possible
नवरा: why?
पन्या: मला नाही आवडत तो. किती अवघड आहे..आणि शिवाय मी किती लहान आहे..
मी:असं नाही पन्नू, शाळेत जाताना तुला यायला नको का थोडसं तरी? तू विसरलीस सगळं.
पन्नू: नाही, मी करेन 13 चं टेबल आज. संध्याकाळी दाखवते म्हणून.
गेल्या मॅडम. दुपारी आली तीच काकांपुढे. हं, विचारा आता मला 13 चं टेबल.
काका: अग म्हण की तू एकटी, मी ऐकतो.
पन्या: नाही, तुम्ही विचारा नं, पन्या 13 चं टेबल येतं का? मग मी म्हणणार. तशीच सिस्टीम असते.
मग आम्हा तिघांपुढे 13 चं टेबल खणखणीत आवाजात म्हणून काकांपुढे लगेच धिंगचिका धिंगचिका, धिंगचिका,धिंगचिका, ए ए ए ए असं म्हणून नाचून झालं.
मग गोष्ट चालू-आमच्या maths च्या टीचर इतक्या हुशार आहेत इतक्या हुशार आहेत की बास. त्या आजारी पडल्या. पार तो आजार त्यांना मरवणार होता, पण त्यांनी देवाची प्रार्थना केली. रिअल देवाने बरं केलंय त्यांना.
नवरा: रिअल देव? काय म्हणाला तो?
पन्या: देव बोलत नसतो. त्याचा हात दिसला टीचरला. मग टीचरना कळलं की आपण मरणार नाही. देवाने बाय केलं त्यांना आणि त्या बर्या झाल्या.त्यांनीच सांगितलंय आम्हाला. to believe in God.
नवरा: तुझ्या टीचर चं नाव काय ग?
पन्या: एलिझाबेथ टीचर. का हो?
नवरा: तुझ्या पप्पांकडून नंबर घेतो त्यांचा आणि सांगतो ही भूतांचे सिनेमे पाहते. आणि नुसती दंगा करते. आणि तुमच्याबद्दल काहीही सांगते.
पन्या: पण पप्पांना allowed नाहीये त्यांचा नंबर शेअर करणं. आणि त्या unknown number घेतच नाहीत. परत एकदा धिंगचिका...😊😊
नवरा: ok, पण मी आणि पप्पा त्यांच्या घरी जाऊन सांगू. इथे मागच्या बाजूलाच रहातात ना त्या...(ही निव्वळ फेकम फाक, पण लागली जाग्यावर)
पन्या: हो, तिकडेच रहातात. पण तुम्ही माझी तक्रार कशी काय करू शकता? मी दंगा केला तरी 13 चं टेबल पण पाठ केलंय की.
एलिझाबेथ टीचर टेरर आहेत. त्या लाल, निळी आणि पिवळी भुतं सोडतात अन्नोन लोकांवर. मग बसा. आधीच तुम्हाला भीती वाटते भुतांची. साधा कंचना पण नाही पाहू शकत☺
आम्ही दोघेही तिचा आविर्भाव बघून हसून हसून लोटपोट.
हे झाल्यावर एकदम निरागसपणे- आत्या, काकांना एलिझाबेथ टीचरच्या घरी नको जाऊ देऊ. मी रोज एक टेबल म्हणून दाखवीन. मम्मीशप्पत- म्हणून गळ्याला हात.
मी: बरं, नाही जाऊ देणार. पण तू अभ्यास करणार ना नक्की?
पन्या: खोल आवाजात- हो. करीन. आत्ता जाते मी. तुमचे काका डेंजर आहेत. त्यांचं काही खरं नाही. इथे मला पत्त्यात हरवतात आणि आता एलिझाबेथ टीचरकडे जातो म्हणतात. माझा मूड गेला आता.
पहिल्यांदाच पाखरू गुपचूप घरी गेलं😢😢
कशाला त्या शाळा आणि तो अभ्यास हवाय इतक्या गोड प्रकारांना... असं मात्र वाटत राहिलं.
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा