अहो पुनश्च हरिओम म्हणत लॉक डाऊन परत आला. किती वैतागलो तरीही सामोरं जाणं तर भागच आहे ना.. तर घरी बसलो होतो आणि धाडकन दरवाजा उघडून ... पन्या रिटर्नड.
आल्या आल्या - हॉ ssss , तुम्ही दोघे घरी?? wow, बरं झालं परत लॉक डाऊन झाला.. आपल्या ला खेळता तरी येईल ....
चला, आता चोरशिपाई खेरू. (खेळू. ळ म्हणायचा म्हणजे भलतेच कष्ट) मी चिठ्या घेऊन येते.
मी- अग, आत्ता कुठे... जेवण झालं की खेळू. मला काम आहे .
पन्या: एकच गेम खेळू न प्लीज, मग कर काम.
एवढं बोलून घरी गेली, चिठ्या, वही, पेन्सिल, खोडरबर असा सगळा सरंजाम घेऊन
बया हजर. चला बसा दोघेही खाली. मी शिकवते तुम्हाला. काका,
चिटिंग करायची नाही.
काकू, तुमच्यात इतकी अवघड नावं ठेवतात? हे विचारताना चेहरा पार एवढूसा.
मी विचारलं म्हणजे?
पन्या: मला वहीत स्कोअर लिहायचाय. म्हणून नाव विचारलं तर काका म्हणतात त्यांचं नाव दुष्टदुंन असं आहे आणि तुझं प्रमेश.. काहीतरी.
अरे हो, एक राहिलंच. मधल्या काळात माझं प्रमोशन झालंय. अहो आत्या, काकू वरून मी आता ए काकू असं फिक्स झालंय.
मला काही कळेना, मी बाहेर गेले तर नवरा आधीच हसतोय. ते पाहून पन्या चिडलीच. जोरात ओरडून म्हणाली पहा, तुझे काका (???) आधीपासूनच चिटिंग करतात
मी म्हटलं काय झालं रे?
तर तो म्हणाला, कुठे चिटिंग? तिला मी आपली नावं सांगितली. ती लिहिता येत नाहीत तिला. मी काय करू?
पन्या- असली नावं नसतातच पण.
नवरा- असतात. माझं नाव दृष्टद्युम्न आणि तुझं नाव परमेश्वरी आहे ना, तेच तर सांगितलं मी हिला, तर चिडतेय
मी- ऑ???
पन्या- रडकुंडीला येऊन- बघ न ग, मी कसं लिहिणार हे स्पेलिंग?
तेवढ्यात मला बाबांनी हाक मारली, सविता...
ते ऐकून पन्या- बघ, तुझं नाव सोप्पं आहे, हे काका चिडवतात मला.
काका- अग ते nick name आहे काकूचं.
पन्या- चालेल मला. मग तुमचं पण ते दुसरं नको मला. तुमचं घरचं नाव माहिते मला. पण आता मी आयड्या केलीये. मी फक्त s आणि d लिहिणार तुमची नावं म्हणून. आणि माझं p. नकोच कटकट. आता मी जेवल्यावरच येते. हे काका फार वेळ घालवतात माझा. तेवढ्यात त्याच्या टीशर्ट च्या आतून तिला जानवं दिसलं.
काका- हे काये तुमच्या गळ्यात?
काका- ते देवाचं असतं.
पन्या- ग्रेट. मग ते हातात धरा ना. भूत येत नाही जवळ. इतकं गळ्यात असून घाबरतात
माझे बाबा- पन्या..
पन्या- हो, हो, जेऊनच खेळणार आहोत आत्ता नै काही.
बाबा हसत- बरं ग. पण तुला इतक्या चौकशा कशाला लागतात गं?
पन्या- म्हणजे काय आजोबा? आवडतात मला लहानपणापासूनच चौकशा करायला. आणि कसली हुशार आहे ना मी अशा भुवया उडवून बाबांकडे पाहिलं.
बाबा: देवा...मुकेशचं कठीण आहे.
पन्या: का? मी सगळी माहिती त्यांना सांगते. मी हुशार आहे ना..
मी: पप्पा ठोकत नाहीत का ग तुला? सतत वळवळ वळवळ. बस की एका जागेवर.
पन्या: नाही. मम्मी मारते. रोज एकदा तरी. काल तर मज्जाच झाली.
मी बेसावधपणे- काय झालं काल?
पन्या: काल मला दिदीने मारलं. भांडण झालं आमचं. मग मी दिदीला बॉल मारला. तो तिला तोंडावर लागला. म्हणजे गालावर. तेच मम्मीने पाहिलं. मग ती काल खूप चिडली आणि तिने मागच्या रूम मध्ये मला कोंडून ठेवलं. हे सगळं action सकट चाललेलं. पप्पाना म्हणाली- तिला कसलीतरी भीती वाटलीच पाहिजे. त्रास देते कारटी.
मी: मग? तू घाबरली असशील नं अंधारात?
पन्या: हॅट.. मी नाही घाबरत. माझ्या पँटच्या खिशात पप्पांचा मोबाईल राहिला होता. नंतर खेळायचा म्हणून ठेवला होता. सर sss ळ खिशातून काढला आणि गेम खेळत बसले.
आम्ही तिघे: अग....
पन्या: मग? दिदीने आधी मारलेलं चालतं काय? तिला कुठे कोंडल? मग मी खेळणार मोबाईल. त्याचा लाईट होताच.
मी- अग पण कुणी पाहायला नाही आलं?
पन्या: येत होते सारखे, मी रडतेय का, घाबरले का पहायला.
माझं लक्ष सगळीकडे
असतं. तेव्हा मी मोबाईल पालथा
ठेवायचे. कुणाला कळलंच नाही. - इथे नाचून एक गडगडाटी हास्य. स्वतःवर खूष असतो हा प्राणी
मी: अग पण पप्पाना नाही कळलं मोबाईलचं?
पन्या: हिहीही.. ते शोधत होते. मम्मीच्या, आजीच्या फोनवरून फोन करत होते सारखा.
आम्ही: मग??
पन्या- मी साऊंडच off केला होता. बसा म्हटलं शोधत.
मग खूप वेळ झाला. 4-5
तास.( म्हणजे अर्धा तास तरी असेलच.
पन्या: मग पप्पा म्हणाले- मी उघडणार दार. माझी पनू घाबरली असेल. मी लाडकी आहे ना...
नवरा- बरं ग फेकू.. पुढचं सांग.
पन्या- ओरडून- फेकत नाहीये.. रिअल मध्ये झालंय असं. विचारा पप्पाना.
मी: बरं जाऊदे, मग?
पन्या: उघडलं दार त्यांनी. मला आवाज आल्या आल्या मी
बेशुद्ध पडल्यासारखी acting केली. आधी मोबाईल लपवून ठेवला पॅन्टमध्ये
मी- हं, मग?
पन्या- मग काय मग? मम्मा घाबरली, पप्पा ओरडले तिला, असं करतात का म्हणून. मला हसू येत होतं तरी मी हसले नाही, माहिते?
मग मम्मा म्हणाली- दवाखान्यात नेऊ तिला लगेच, चला. पण लॉक डाऊन आहे ना, मग रत्नातच न्यायला लागणार असं म्हणाले पप्पा.
मग मी हॅस्पिटल ला घाबरते ना... तर उठुनच बसले.
तर आत्तापर्यंत घाबरलेली मम्मी परत चिडली आणि म्हणाली- काय करू तरी काय या मुलीचं मी?
असं झालं काल. आता जेवा, मी पण जेवून येतेच खेळायला.
आम्ही तिघे एकाचवेळी कौतुक, अचंबा असं काहीतरी पहात होतो तिच्याकडे. गेलं वादळ घरी.
माझे बाबा म्हणतायत- शार्प मेमरी आहे पनूची. तिच्या भोचकपणा ला,
तिला एकूणच मस्त गायडन्स
मिळाला ना, पोरगी कुठच्याकुठं
जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा