#पिंपळपान: जुन्या सुंदर आठवणी
संपली लोकहो दिवाळी. यावर्षी थोडंस आली कधी, गेली कुठे असंच झालं नाही?
लहानपणची दिवाळीच आठवते. दिवाळीचा किल्ला, (त्यासाठी दगड, पोती जमवणे, चित्रे आणणे, एकाच किल्ल्यावर शिवाजी महाराज, वर विमान, खाली रेल्वे, कारंजं, त्याशेजारी गुहेतून डोकावून बघणारे वाघोबा हे पण सगळं आलंच) स्वतः करण्यात अफाट आनंद देणारा आकाशकंदील,फटाके, नवे कपडे, उटणं आणि सुवासिक तेल युक्त अभ्यंगस्नान, तेही पहाटेच्या थंडीत. आपलाच पहिला फटाका फुटायला हवा म्हणून असलेली ती घालमेल,मग तो तऱ्हेतऱ्हेचा फराळ... अंगणभर घातलेल्या रांगोळ्या आणि रंग ...आठवलं की नाही सगळं?
हे तर आठवणारच. पण त्याहून भारी आठवतोय तो 'दिवाळीचा अभ्यास'. आत्तासुद्धा लिहिताना टेन्शन आलं पहा.. झालाय ना अभ्यास ?असं. मग एकदम लक्षात आलं, मोठे झालो राव आपण आणि ता अभ्यासातून सुटलो म्हणून हुश्श![]()
![]()
![]()
तर आमच्याकडे आमच्या मातोश्रींनी एकच सांगून ठेवलं होतं, सुट्टी लागली की रोज थोडाथोडा अभ्यास करायचाच, म्हणजे टेन्शन नको. सकाळी अंघोळ झाली की शुद्धलेखन, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांचं. मग तासभर अभ्यास. नंतर दिवसभर हुंदडलं तरी वांधे नाहीत. संध्याकाळी परत थोडा अभ्यास. दिवाळीचे सगळे दिवस यातून पूर्ण सुट्टी. बरं, आम्ही सगळे नातेवाईक पुण्यातच. गावच नाही आम्हाला. नाही म्हणायला मामाकडे 4-5 वर्षांनी जायचो, पण तरी इतर वेळी काकाकडे 2 दिवस, आत्याकडे 2 दिवस आणि आमच्याकडे 2 दिवस सगळा फौजफाटा असायचा. तेव्हाही सुट्टीच अभ्यासाला. त्यामुळे आईची ही शिस्त.
पण आमच्या वर्गातली काही टाळकी आसपासच रहायची. मी अभ्यास करताना दिसले की बाहेरून वेडावून दाखवणे, बावळट, अभ्यास कशाला करते? खेळायला चल ना वगैरे असायचंच.
तर त्यात भयंकर त्रास देणारा एक होता. आम्ही त्याला 'डॅमिट' म्हणायचो (कारण आडनाव जाधव आणि महेश कोठारेंच्या सिनेमाचा परिणाम. तो आईला अगदी धीटपणे यायचा सांगायला- बाई, सोडा की सविताला खेळायला.. (ती क्लास घ्यायची म्हणून सगळ्यांची बाई). आई कधीतरी विरघळायची त्याच्या गोड बोलण्याला, त्यामुळे मीही त्याला ये तू, आईला सांग ना म्हणून मस्का मारायचे. पण हे कधीतरीच. आईबाई हुशारच आमच्या. ती डॅमिटलाही अभ्यासाला बसवायची. त्यामुळे हे नंतर चालेना. बाई खूप कडक आहेत राव. तुझी तूच ये फटाके वाजवायला म्हणून गुल व्हायला लागला हा. हं, आलिया भोगासी.
असंच एका वर्षी शाळा सुरू व्हायला 3 दिवस राहिले आणि डॅमिट संध्याकाळी घरी आला. समोर बाबा माझे. म्हटल्यावर मूडच गेला त्याचा. (बरोबरच आहे. एखाद्या अभावीत क्षणी समोर एकदम कडक माणूस, मोठे डोळे करून, दरडावून काय रे दीपक? काय काम आहे ? म्हटल्यावर डॅमिट असला तरी फुल टू थरथराटच ना) घाबरत म्हणाला- काका, मला सविताची वही द्या ना दिवाळीच्या अभ्यासाची. माझं एकच पान फाटलं आहे वहीतल. तेवढं लिहितो आणि उद्या संध्याकाळी लगेच आणून देतो.
बाबा- एकच पान ना? बस इथे, मी तुला कोरा कागद आणि पेन देतो, वहीत बघून लिही, उद्या कशाला लागतोय? हा पार रडायच्या बेतात. नको नको, मी छान अक्षरात माझ्या वहीत लिहितो. द्या ना प्लीज.. बाबांनी काय येडू आहे म्हणून दिली वही त्याला. दुसरा दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी सकाळी हा वही घेऊन हजर. काल पाहुणे आले ना आमच्याकडे.. म्हणून नाही आलो असं बाबांना सांगितलं पण त्याने. नंतर बाबा आईला म्हणाले दीपक असा काय ग विस्कटलेला दिसत होता.. नुसता हुंदडलेला दिसतोय सुट्टीभर![]()
![]()
शाळा चालू झाली आणि पहिल्याच दिवशी सगळ्या वह्या गोळा केल्या शिक्षकांनी.
दुसऱ्या दिवशी मला आणि डॅमिट ला बोलाव मुख्याध्यापकांनी. मी खूप घाबरलेली आणि हा मजेत![]()
![]()
मुख्याध्यापकांनी डॅमिट ला विचारलं- दीपक हीच ना तुझी वही?
डॅमिट- मग? सर, मी सुट्टीत रोज नीट अभ्यास केला.
सर- व्हेरी गुड!!सविता, ही तुझी वही ना?
मी - (आता फक्त रडायची बाकी. नेमकं काय झालंय माहीत नाही म्हणून. )हो सर
सर- तुझी खूप छान आणि व्यवस्थित आहे.
मी- सर थांक्यू
सर- दीपकने कधी नेली वही तुझ्याकडून?
मी- सर घरी नव्हते मी, परवा माझ्या बाबांकडून घेऊन गेला हा.
डॅमिट- नाही सर, उलट मीच माझी वही दिली हिला अभ्यास उतरवायला. हिने माझं बघून लिहिलंय.
आता सरांसमोर माझी मुसमुसायला सुरुवात.नाही सर. मी... मला... हाच... इत्यादी.
सर- तू रडू नको बरं, दीपक रडतोय का कॉपी करूनही?
मी गोंधळून पहातेय.
सर- दीपकला- हिने कॉपी केली तरी हिचं अक्षर छान आहे नाही? पूर्ण वहिभर? आणि तू अभ्यास केलास तरी तुझं अक्षर का रे असं?
डॅमिट क्षीणपणे लढतोय- सर माझं अक्षर तसच आहे पहिल्यापासून![]()
सर- चूप बस. पाचवीत नाही अजून तर खोटं बोलतोस? हात पुढे कर..
दीपक- नको ना सर, मी परत नाही करणार
सर- पण यावेळी तरी का केलंस?
दीपक- तुमचीच चूक आहे. सुट्टी म्हटल्यावर अभ्यास करतं का कुणी? मग मला परवा आठवलं म्हणून मी हिची वही काकांना न घाबरता आणली आणि न झोपता लिहिली सगळी. ...
सर- हसावं का रडावं अशा विचारात गप्प झाले एक मिनिट
डॅमिट- सर, जाऊ आम्ही?
सर- जा, तुझ्या बाबांना चिठ्ठी पाठवणार आहे मी
डॅमिट- नाही,मी खरंच नाही करणार परत. इथे रडायला सुरुवात.
सर- जा आता वर्गात.
बाहेर पडल्या पडल्या- बघ येडछाप, रोज अभ्यास करत होतीस. मी मस्त खेळलो आणि किती पटकन लिहिलं बघ सगळं.
![]()
![]()
![]()
![]()
![]()
अरे हा रडत होता ना आत्ता या विचारात मी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा