गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

 

चार आण्याची कोंबडी अन.....

काल कॅफेतून निघताना अतिप्रचंड विचार करत होतो आम्ही दोघे- घरी काय नेऊया करून- रात्री जेवायला? घरी आमचे पेशंटबुवा (माझे बाबा) मस्त फर्माईशी मूड मध्ये असतात. आज हे करा, उद्या ते करूया असं. त्यामुळे रात्री काय करायचं याबद्दल आम्ही डोकं लढवत नाही शक्यतो.😊 पण काल बाबांचा व्हॉट्सऍप वर मेसेजच नाही. मग म्हटलं आपणच ठरवू. शेवटी त्यांना कधीही चालेल आणि पटकन होईल असं काय आहे बरं जगात?असं आठवायला सुरुवात केली आणि येस्स- जोवर भाकरी, कुळथाचं पिठलं आणि सांडगी मिरची जगात आहे तोवर काय घाबरायचं? फटाफट भाकरी केल्या, मग डोक्यात लायटिंग झाली की घरात कुळीथ पीठ इल्ले😢 मग म्हटलं एवढं काय रॉकेट सायन्स आहे? घराशेजारी तर मिळतं. नाहीतर जाता जाता कुठेही मिळेलच की.

मग निघालो ऐटीत. इथेच गंमत सुरू. अगदी कॅफेशेजारच्या दुकानापासून सुरुवात केली. आणि नन्ना चा पाढा सुरू. कुठेही कुळीथ पीठ मिळू नये? जगात भारी पिठलं असतं ते... तरी अपमान सहन करत करत गेलो घरापर्यंत. हो ना, अपमानच तर काय.. लेकाचे कुळीथपीठ ठेवत नाहीत आणि वर चक्क सांगतात कुळीथ पीठ ना? नाहीये. हे पण नाकावरच्या चष्म्यातून खवटपणे. तेही एका अट्टल पुणेकरणीला? पण झालं हो असं. नंतर अधल्या मधल्या बालाजी, आईजी, चंदन, आशापुरा असल्या सुप्पर डुप्पर मार्केट मध्ये इतका छान पदार्थ नसतोय मिळत. मग घर गाठलं आणि शेजारच्या गॅरंटीवाल्या दुकानात गेलो. नवऱ्याने विचारलं उद्या ला( म्हणजे उदय ला. दुकान का मालिक, अपना फ़्रेंड) अरे कुळीथ पीठ दे ना. तोही उत्साहात हाय ना राव, आत्ता देतो म्हणून उठला, गेला आणि तोंड पाडून आला- संपलं ना राव मगाशी.

याला काय अर्थय?? आता काय करायचं? किती भीषण प्रश्न आहे माहीत आहे? आमच्याकडे डिक्लेर्ड मेनू बदलत नसतात म्हटलं. मूड तयार होतो ना एकेक पदार्थाचा... नैतर तुम्ही म्हणाल चण्याच्या डाळीच्या पिठाचं करावं पिठलं, मस्त पालेभाजी सणसणीत फोडणी घालून, नाहीतर वांग्याचं भरीत, खर्डा, ठेचा असं खावं. याच मेनूत काय ठेवलंय? पण असली बात नस्से आमच्याकडे. ठरलं म्हणजे ठरलं.

मग दोघे परत उलटे फिरलो, मॉडेल कॉलनी, ओंकारेश्वर वरून नारायण , शनिवार पालथे घातले. कुठेही कुळीथ पीठ नाही? पूर्वीचं पुणं राहिलं नाही राव😢😢😢

आता तर सगळी दुकाने बंद होऊ लागली. पण सोडतो का काय आम्ही? शनीपारला देसाईबुवांनी दुकान बंद करण्याचा पवित्रा घ्यायच्या आत कुळीथपीठ हस्तगत केलंच आम्ही. मग परत सुखानी घरी.

मस्तपैकी भाकरी, पिठलं... नुसतं नाही - कुळथाच, सांडगी मिरची , ताक असा बेत झाला. कैवल्य हो.. कैवल्य.😊😊😊

आमचे बाबा आमच्याकडे बघून खुशीत म्हणाले- 'टॉप'. अहाहा...

नवरा म्हणाला किती येडे आपण? 45 रुपयांच्या कुळीथपीठासाठी 200 रुपयांचं पेट्रोल घालवल आपण.😢 चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला.

मी- असुदे रे एखादेवेळी. आता काय गार झोप लागेल बघ👌👌

पण तरीही एक प्रश्न आहेच- कुळीथपीठाची कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे का पुण्यात? हे नाहीच चालणार..


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  आजच्या दिवसाची खासमखास गोष्ट म्हणजे प्रसिद्ध लेखिका आतिवास सविता यांची आमच्या कॅफेला भेट मजा आली अगदी . ठरलेल्या वेळी सक...