वेळ नेहमीचीच दुपारची. जेवण आणि चहा च्या मधली. किंचित झोपाळलेली. अशा वेळी आम्ही दोघेही तसेच कंटाळलेले होतो. अचानक एक आजोबा आले. काय आहे वगैरे विचारून त्यांनी ऑर्डर दिली कांदा भजी आणि चहा. ते दिलं त्यांना. गावाकडचे होते. कुणा नातेवाईकांकडे आले होते. आणि कुणीतरी येणार म्हणून वाट पहात होते. थांबू का म्हणाले थोडा वेळ? म्हटलं थांबा. मग बसले बोलत. गावाकडे भविष्य सांगतो म्हणाले.. वा वा, मला तर लगेच भारी वाटलं. अशा वेळी डोळेच चमकतात माझे
चला आता विचारूच. फुल टाईमपास. पण कसं कोण जाणे- या माझ्या नवऱ्याला माझा हा बेत कळतोच
तुम्हाला म्हणून सांगते, एरवी एव्हढेसे डोळे असलेला हा माझा नवरा वाटी एवढे डोळे करून माझ्याकडे पहाताना दिसला हो मला. इतकंच नाही तर पटकन माझ्या जवळ येऊन आजोबा ऐकणार नाहीत अशा बेताने धमकावून गेला- काही विचारायचं नाही हां- बघच तू. अरे काये हे, चांगला माणूस आपणहून आला दारात, शिवाय कुंडली नको की काही नको, नुसतं चेहरा आणि हात पहाणार आणि घडाघडा सांगणार. काय हरकत आहे म्हणते मी आपलं उज्ज्वल भविष्य विचारायला... शिवाय ते सांगतात ना, बाई, तुझ्याच पायात लक्षुमी हाये.. तुज्यामुळंच आज ह्यो बाबा उभाय.. लै सहनशील हायस तू.. तुझा पूर्वीचा काळ लै वाईट होता, पण आता सगळं मस्त हुनार![]()
हे ऐकायला किती म्हणजे किती आसुसले होते कान माझे
(कोण रे तिकडे म्हणतंय ते सगळ्यांना हेच सांगतात म्हणून? असूदे ज्जा. ) पण याचे डोळे पाहिले आणि गप बसले मी. ( इथे मी म्हणून... वगैरे सगळं इमॅजिन करा..![]()
)
तर ते आजोबा बसले सांगत कुणाकुणाची त्यांनी काय भविष्य सांगितली आणि सगळी कशी खरी ठरली. मी म्हटलं सॉलिड अभ्यास दिसतोय तुमचा आजोबा.. तर म्हणाले मग? अहो पंचक्रोशीत नाही माझ्यासारखा कोण. हात बघून सांगतो मी तुझा राहू बिघडला, तुझा शनी चांगला नाय, आहात कुटं? मी म्हटलं बापरे, मग बिघडला असला तर? तर म्हणे त्याला काय, लगेच जो बिघडला त्याची शांत सांगायची, आपले दहा हजार ढिल्ले
मी म्हणाले ऑ? एवढे? तर म्हणाले जाता जाता एक होम बी सांगत असतोय आपण करायला. त्याला काय कमी लागाती का तयारी? साधं सुध कामे व्हय ते? मी आपली बरोबर आहे तुमचं अशी मान डोलवत होते. अशा वेळी नवऱ्याकडे बघायची जोखीम मी घेतच नाही. उगा हात दाखवून अवलक्षण कशाला म्हणते मी..
तर आजोबांना म्हणाले मग सगळे लोक शांत आणि होम करतात? तर म्हणाले- मंग? तरास हुईल न्हाई केलं तर असं पहिलेच सांगतो ना आपण.. आपण काय सादेसुदे हाय का? शिवाय त्या शांतीसाठी खडे पण आणायला लागतात. ते आणतो आपण. आपली बायको हुशार आहे. घरी लोक येत्यात इचरायला, ती आतून ऐकत असते. मी शांत, खडे बोलाय लागलो की ती लगेच आवरून बाहेर पडते की रिक्षाने बाजारच गाठते.
मी: का?
आजोबा: अहो, तिला बरोबर माहिती आहेत दुकानं. एकदा गेली की 2-4 गुरू, 2- 4 राहू, 2-4 शनी असं घेऊनच येती ती.![]()
मी - हो??
आजोबा: अन मग? लै हुशार आहे ती. तुम्हाला सांगतो, शेजारी जायचं तर जरीकाठी पातळ नेसल्याशिवाय जात नाही ती. रिक्षाने निघाली की विचारूच नका तिचा दिमाख. अहो, मामलेदाराची पोर हाय ती, त्यातून माझ्यासारख्याची बायको, तिला काय कमी हाय का?
मी कौतुकाने- अरे वा, छानच की
आजोबा: मग? ही कुठे गेलो आणि लोकांनी पाहिलं तर बोलतात- अर, कुणाची बाईल चालली, कुणाची बाईल चालली- असा थाट आहे तिचा, कळलं का? दोनशा चा जागी पाचशे देती, लोकं लै जोडलीत तिनी.
नवरा- पैसे देऊन माणसं जोडता येतात की काय आजोबा?
आजोबा- आन मंग? पैसाच म्हत्त्वाचा. काय?
मी- हो हो, अर्थात (परत नवऱ्याकडे कानाडोळा. हो ना, नंतर आपली शाळा घेणार हा हे फिक्स ![]()
)
आजोबा- आपल्या कडे आला ना कोण, की त्याला कालसर्प, राहू, शनी सांगूनच टाकतो. आपली सोय पहिली. हाय का नाय?
मी- बरोब्बर
तेवढ्यात आला त्यांचा नातेवाईक, गेले आजोबा निघून.
मग आपोआप मी पाहिलंच माझ्या हिरोकडे..
तर म्हणालाच- आनु का बाजारातून दोन दोन राहू, शनी, गुरू घाऊक मध्ये... उगा नाय तो नाद करायचा...
बसलो हसत आणि काय!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा