#पिंपळपान- जुन्या तरीही अनमोल आठवणी
आज इतर ग्रूप्स वर भयकथा वाचत होते. त्यावरुन आपोआपच आमची गंमत आलीच.
तर कॉलेज मध्ये होते मी. एफ.वाय ला.
एका रात्री ग्रूप मध्ये भरपूर भुतांच्या गोष्टी ऐकल्या होत्या. नाही म्हटलं तरी दुसर्या दिवशी उठल्यावर थोडासा तसाच मूड होता. कारण आम्ही म्हणजे असल्या गोष्टी ऐकतो फार मूड मध्ये आणि नंतर झोप नाही येत. ![]()
तर आवरुन गेलो आम्ही दोघी मैत्रिणी कॉलेज ला. बस अगदी लौकर ची मिळाली त्या दिवशी. जातानाही आदल्या रात्रीच्या गोष्टी चालल्याच होत्या. म्हणजे सकाळी साडे सहा ला विषय "भूत".
थंडीचे दिवस होते. कॉलेजला पोचलो तरी अंधारच होता. कॉलेज पण गपगार पसरलेलं. कुणीच दिसत नव्हतं. आम्ही आपल्या आलोच आहोत लवकर तर जाऊया वर्गात म्हणून त्या दिशेने जायला लागलो.
आधी सायन्स/आर्ट्स कॉलेज आणि मागे कॉमर्स. त्यामुळे चांगलं १० मिनिटे चालत जायचं होतं. अंधारातून हळूहळू पुढे चालताना अचानक अगदी हळू गाण्याची लकेर ऐकू आली. झालं. घाबरगुंडी उडायला तेवढं बास होतं. मी म्हणाले मैत्रिणीला, 'चल, बाहेर जाऊ. इथे नको थांबायला.' तर तिला इतका उत्साह आलेला...' बघू बघू पुढे जाऊन. नाहीतरी म्हणतच होतीस की काल-एकदा तरी भूत पहायचंच आहे म्हणून... चल चल.
आता मी केविलवाणी. 'अगं नको गं.. इतक्या अंधारात कोण गाणार इथे? नक्की काहीतरी डेंजर असेल.'
मैत्रीण-'असू दे भूत. आता पहायचंच.'
आम्ही दोघी हातात हात घालून आवाजाच्या दिशेने पुढे. आता गाणं जोरात ऐकू येउ लागलं. पण नीटसं कळत नव्हतं गाणं कोणतं आहे.. शिवाय आता पैंजणांचाही आवाज यायला लागला. ते ऐकल्यावर तर थंडीत घाम फुटला. तरी आता भीती, उत्सुकता वाढली. जात राहिलो एक एक वर्ग बघत. नुकतीच कुलुपं उघडलेली होती. पण दारं बंद. एकेक वर्ग उघडताना असली भीती वाटायची की बास. असं वाटायचं की दार आपण उघडायच्या आधी त्या भुतानेच उघडलं दार तर??????????
शेवटी एका वर्गातूनच आवाज येतोय एवढं नक्की कळालं. अगदी शेवटचा वर्ग. अख्खा कॉरिडोर तुडवत गेलो. दरवाजा हळूच उघडला. पाहतो तर आम्हाला सिनिअर असणारी एक मुलगी अत्यंत किनर्या आवाजात 'सख्या रे- घायाळ मी हरिणी' अशी काही किंचाळून गात होती की ज्याचं नाव ते.
एका सेकंदात आमची भीती जाऊन तिथं संताप तयार झाला.
'अगं ए बाई, इतक्या पहाटे कॉलेजात येऊन अशी का घाबरवते इतर मुलांना?'
तर तिचं उत्तर- 'मी लौकर आले ना, तर काय करायचं म्हणून सरळ वर्गाचं दार लोटून घेतलं आणि गायलाच लागले. आणि वरती भीती वाटू नये आपण एकटे आहोत म्हणून पैंजण वाजवायला लागले. म्हणजे लोकच घाबरतील.'
आम्ही दोघी-' कसली भारी आयडिया गं, पण तुला भीती नाही वाटली?
ती-'वाटली ना, म्हणूनच तर असं केलं.'
माझी अत्यंत अबोल मैत्रिण - ' हे खूप भारी आहे पण तू गाऊ नको गं, घाबरवणारं गातेस तू'
मी तिचा बदलणारा चेहरा बघून मैत्रिणीचा हात धरून तिथून सूंबाल्या केला हे सांगणे नकळे. ![]()
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा